नवसाला पावणारी "भक्ताची देवी"

|| जागर शक्तीचा || जागर भक्तीचा ||

नवसाला पावणारी "भक्ताची देवी"

दिल्ली दरवाजा ते माळीवाडा ह्या दोन वेशींच्या मध्ये जेव्हा गाव वसलं होतं त्यावेळी भक्ताच्या देवीचं आणि जेल रोड देवीचं मंदिर अत्यंत प्रसिद्ध होतं. पुढे जस जशी गावाची व्याप्ती वाढली दळण वळणाची साधनं वाढली तशी केडगाव , बुऱ्हाणनगर हि मंदिरं नावारूपाला आली. 

भक्ताच्या देवीचं मंदिरं हे २५० ते ३०० वर्षांपासून प्रसिद्ध आहे.त्याकाळापासून ते आजतागायत कोणाच्याही घरी मंगल कार्य ठरले कि त्याची पहिली पत्रिका  गणपतीला आणि दुसरी पत्रिका भक्ताच्या देवीला देण्याची प्रथा आहे. नवसाला पावणारी देवी असा ह्या देवीचा लौकिक आहे. 

भक्ताच्या देवी बद्दल एक आख्यायिका सांगितली जाते, पूर्वीच्या काळी रंगनाथ भगत  व बाबू भगत कायम माहूरला दर्शनासाठी  असत. पुढे त्यांना देवीने दृष्टांत दिला. तुमचे आता वय झाले आहे तेव्हा आता तुम्ही माहूरला येण्या पेक्षा  तिथेच भुईकोट किल्ल्यात कित्येक वर्षांपासून माझे ठाण आहे तेथे  कुठलीही पूजा अर्चा होत नाही. तेव्हा माझी प्रतिष्ठापना अन्यत्र करा. रंगनाथ भगत बाबू भगत यांनी भुईकोट किल्ल्यातून देवीला हलविले आणि आजच्या स्वामी विवेकानंद चौकातील भगतांच्या  जागी आणून तिची प्रतिष्ठापना केली. याच वेळी किल्ल्यात एक महादेवाची पिंडही सापडली तिची स्थापना अक्षता गणपतीच्या शेजारच्या वाड्यात करण्यात आली आहे. 

तांदळा स्वरूप असलेल्या देवीची स्थापना त्या वाड्यात झाल्यानंतर हळू हळू भाविकांचीही गर्दी वाढू लागली.नवसाला पावणारीदेवी असा तिचा लौकिक वाढू लागला  रंगनाथ भगत बाबू भगत गोविंद भगत (रामदासी) , तान्हा आजी (गुरव) पुढे रामदासी कुटुंबाकडे देवीची पूजा अर्चा आली. गेल्या चाळीस वर्षा पासून कुलकर्णी कुटुंबाकडे पूजा- चर्चेची व्यवस्था आली. 

नवरात्रीत पंचमीला भोंडला खेळण्याची पद्धत या मंदिरात अजूनही सुरु आहे. अष्टमीच्या दिवशी या मंदिरात भळंदाचा कार्यक्रम असतो. या दिवशी ज्यांच्या अंगात देवीचं वारं येत असे लोक मंदिरात येतात भळंद पेटवतात पुढे घागर फुंकण्याचा कार्यक्रम होतो. नवमीला नवचंडी यागाचा आयोजन केले  जाते.

नवरात्रीत घटस्थापनेपासूतर ते नवरात्रोत्सवाचा सांगते पर्यंत सकाळी १०.३० आणि रात्री ८. ३० वाजता देवीची महाआरती होते. तसेच प्रत्येक दिवशी कुंकुमार्चन फलार्चन , हिरण्यअर्चन , फुलार्चन आदी केले जाते. नवरात्रोत्सवा साठी स्वामी विवेकानंद मित्र मंडळ, वाल्मिकी कुलकर्णी , डी. एम. मुळे चष्मावाले आणि रामदासी कुटुंबीय आवर्जून भाग घेतात असे नरेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments