ग्रामीण बाजाचं नेटकं नाटक "स्वप्नवाट"

 ग्रामीण बाजाचं नेटकं नाटक "स्वप्नवाट"

कुठल्याशा एका खेडेगावात सखाराम, रखमा हे दाम्पत्य आणि त्यांचा मुलगा मोहन, त्यांच्या समोरच्या घरात तात्या व त्याचा मुलगा गोलू आणि तिसऱ्या घरात आप्पा आणि त्याची मुलगी वृंदा अशी तीन कुटुंब राहत असतात. गावात सतत पडणारा दुष्काळ कधी ओला तर कधी सुका त्यामुळे शेतीत फारसं उत्पन्न होत नाही. सकाळीच झुंजूमुंजू झाल्यावर वासुदेवाचं येणं ग्रामीण भागातील संस्कृती परंपराच दर्शन घडवत. त्यात सखाराम आणि रखमाचा मुलगा मोहन याचं शिक्षणही रडत खडत बारावी पर्यंत पोहोचलेला असतो तर आप्पाची मुलगी वृंदा हिला गावातले शिक्षण संपल्यावर मोठ्या शहरात जाऊन शिकण्याची  व काहीतरी करून दाखवण्याची जिद्द तिने बाळगलेली असते.मोहन ही मोठ्या शहरात जाऊन काही काम धंदा करावा आणि कुटुंबाला हातभार लावावा या विचारांनी पछाडलेला असतो. मात्र वृंदाचे वडील लग्न झाल्याशिवाय तिला मोठ्या शहरात पाठवण्यास तयार नसतात मोहन चे आई-वडीलही मुलगा शहरात जाऊन काय करेल या भीतीने धास्तावलेले असतात.

एक दिवस सखाराम आणि रखमा तात्याच्या मदतीने आप्पाकडे मोहन आणि वृंदाच्या लग्नाचा विषय काढतात तसा आप्पा आढेवेढे घेऊन मुलीच्या आईच्या मनासारखं करायचं असल्याचं सांगून लग्नास सुरुवातीला विरोध करतो वृंदा मात्र घराच्या दरवाजा आडून हे सगळं गुपचूप ऐकत असते आणि तिच्या मनात एक प्लॅन तयार होतो. 

 वृंदा मोहनला तुलाही मोठ्या शहरात जायचं आहे आणि मलाही शिक्षणासाठी मोठ्या शहरात जायचं आहे. मोहनच्या वयातल्या सर्व मुलांची लग्न झालेली असल्याने सारे गाव त्याला बिन लग्नाचा वळू म्हणून हिणवत असते . तर वृंदाही  ही शिक्षणाचा ध्यास घेतल्याने तिचेही लग्नाचे वय वाढत असते. घरच्यांनी आपल्या लग्नाचा विषय काढला, हे मी ऐकलेल आहे, तेव्हा आपण लग्न करू, पुढे आपले पटत नसल्याचे सांगून वेगळे होऊ. असा प्लॅन सांगून मोहनला लग्नासाठी तयार करते आणि तशी परिस्थिती घडून दोघेही घरच्यांची लग्नाला संमती मिळवतात.

आठ दिवसात दोघांच्या लग्नाचा बार उडवून द्यायचा असल्याने दोन्ही कुटुंबात लग्नाची लगबग सुरू असते. लग्नासाठी दोन्ही कुटुंब पैशाच्या जमवाजवीच्या तयारीला लागतात.  सखाराम घरातली जनावरे विकतो तर आप्पा पैशासाठी शेतजमीन गहाण टाकायला तयार होतो. मोहनच्या लक्षात जेव्हा या गोष्टी येतात तेव्हा वृंदाला या लग्नाच्या प्लॅनमध्ये मी तुझ्याबरोबर नसणार असे सांगतो. तेव्हा वृंदा त्याला ऐनवेळी तू भिऊन घात करशील याची मला कल्पना होतीच असे सांगते.  तेव्हा मोहन माझ्या वडिलांनी जनावरे विकली, तुझे वडील शेत जमीन गहाण टाकायला चाललेत त्या बदल्यात आपण त्यांना काय देणार तर आमचे पटत नाही असे म्हणून आम्ही वेगळे झालो असे सांगणार. हे सगळं ऐकून वृंदाही ही मनातून हादरते. मी आई-वडिलांना नाही फसवू शकत असे मोहन वृंदाला सांगतो.  दोघांची मने परावर्तित होतात शेवटी वृंदा ही मोठ्या शहरात जाऊन शिक्षण घेण्याच्या आपल्या स्वप्नावर पाणी सोडण्यास तयार होते आणि दोघेही लग्न करण्याचा निर्णय घेतात.असे ग्रामीण भागातील सामाजिक समस्येवर बोट ठेवणारं नाटक ६४ महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटक स्पर्धेत कोपरगावच्या संकल्पना फाउंडेशनने "स्वप्नवाट" हे नाटक सादर केलं. 

 या नाटकाचे लेखन डॉक्टर किरण लद्दे यांनी केले होते. त्यांनीच ही संहिता दिग्दर्शित केली. ग्रामीण भागातल्या समोरासमोर राहणाऱ्या तीन कुटुंबांची ही कथा डॉक्टर लद्दे यांनी चांगलीच फुलवली नाटकातील सखारामची भूमिका (गणेश सपकाळ) आणि रखमा (गायत्री कुलकर्णी) यांनी त्यांच्या भूमिका चोख पणे पार पाडल्या,आप्पाच्या भूमिकेत (डॉक्टर योगेश लाडे) आणि वृंदाच्या भूमिकेत (हर्षा बनसोडे) यांनी ठसा उमटविला तर मोहनच्या भूमिकेत (प्रथमेश पिंगळे) यांनी कमी शिकलेला, लग्न रखडलेला तरुण ताकदीने उभा केला. तात्याच्या भूमिकेत (प्राध्यापक गजानन पंडित) आणि गोलूच्या भूमिकेत (प्रतीक गवळी) ठीक वाटले. वासुदेवाच्या भूमिकेत (राहुल वाकळे) यांनी रंगमंचावरील वावरणे सहजगत्या निभावले.

ग्रामीण भागा चे कथानक असल्याने पुरुष पात्रांचे कडक इस्त्रीच्या पायजमा आणि बंडीच्या पेरावात वावरणे थोडसं खटकलं तर मोहनचे  चपला घालून घरात येजा करणे आणि रंगमंचावर वावरणे चुकीचे वाटले.या नाटकाचे नेपथ्य गणेश सपकाळ आणि अमित तिरमखे यांनी अत्यंत सुटसुटीतपणे साकारले तीनही घरांच्या ओसऱ्यांवरच हे नाटक घडत असल्याने एका घराच्या ओसरीवर मांडलेली चूल मात्र कायम रिकामीच दिसली नाटकाची प्रकाशयोजना ही डॉक्टर लद्दे  यांनीच केल्याने या प्रकाश योजनेतून त्यांनी सिनेमॅटिक पद्धतीने ते साकारण्याचा प्रयत्न केला.विशेषतः नाटकातील स्वप्नांचा भाग हा फिल्मी स्टाईल दाखवण्याचा प्रयत्न केला. नाटकाचे संगीत डॉ.मयूर तिरमखे यांनी कथानकाला साजेसे दिले. नाटकाची रंगभूषा डॉ.आस्था तिरमखे यांनी कथानकाला पुरेशी पूरक अशी केली होती. या नाटकाची वेशभूषा मोनिका सपकाळ यांची होती.एकंदरीत ग्रामीण भागाच्या या कथानकांची संकल्पना फाउंडेशनने नेटकेपणाने सादर केले .


(देवीप्रसाद अय्यंगार )

Post a Comment

0 Comments