नेटकं तंत्र,सशक्त अभिनयामुळे देखणा झालेला नाट्यप्रयोग "माझं घर"
विभा दिनेश त्यांची मुलगी राणी आणि दिनेश ची आई यांचं कुटुंब . दिनेश ची ऍड एजन्सी असते. मात्र, करोना नंतर याही व्यवसायाला मंदीचा फटका बसतो. त्यामुळे कॉन्टॅक्टस टिकवण्यासाठी दिनेशची कसरत सुरू असते. विभाही ही नोकरी करत असते . नोकरी करता करताच विभा दैनंदिन जबाबदाऱ्या आणि राणीच्या शाळेतल्या पालक सभा, सासूचे आजारपण त्यांचे औषध पाणी या सगळ्या जबाबदाऱ्या नेटाने पार पाडत असते.
दिनेश ची बहिण उर्मिला कोल्हापूर मध्ये नोकरी करत असते . तिथेच एका तरुणाची तिथे सूत जमलेले असते. तीही दिनेश कडे अधून मधून येऊन जाऊन करत असते. विभाचा भाऊ मधू गुजरात मधल्या भडोच येथे नोकरी करत असतो. तोही अधून मधून विभाकडे येत असतो. त्याचेही लग्न ठरलेले असते.
एक दिवस मधु विभा कडं आल्यानंतर विभा आणि तिची सासू मधूची विचारपूस करतात . मधु दिनेशशीही बोलतो मात्र यावेळी दिनेश मधुच्या प्रश्नांना तिरकस उत्तरे देतो . आणि ऑफिसला जायला निघतो. इतक्यात विभा त्याला जेवणाचा डबा आणून देते ,तर दिनेश, डबा नको म्हणून सांगितलं होतं ना हा काय लो चटपणा आहे असे सांगून डबा सोफ्यावर आदळतो आणि निघून जातो. घडल्या प्रकाराने मधुला दिनेशचे वागणे खटकते मात्र विभा दिनेशची बाजू सावरून घेते.
एक दिवस रात्री दिनेश विभा तुझ्याशी बोलायचं आहे ,असं सांगून उठून बसायला सांगतो. आणि बोलण्याच्या ओघात तिला घटस्फोट मागतो. ते ऐकून विभा हादरते. दिनेश तिला ऑफिस मधल्या नंदिता मुरुडेश्वर नावाच्या तरुणीशी लग्न करणार असल्याचे सांगतो. दिनेश आणि विभामध्ये वादावादी होते. विभा राणीचे कारण पुढे करते दिनेशला कुटुंब न मोडण्याबद्दल विनवते. मात्र दिनेश त्याच्या मता वर ठाम असतो. दुसऱ्या दिवशी हे सारे प्रकरण दिनेशच्या आईला कळते . मात्र ती विभाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते. उर्मिला ही विभा बरोबर असलेल्या बाऊंडिंग मुळे तिच्या पाठीशी आईबरोबर खंबीरपणे उभे राहते. मग विभा माहेरी जाते ,आणि मधु विभाच्या घरी येतो . तेव्हा दिनेशची आई मधुला काय सांगायचे असे दिनेशला विचारते ,तेव्हा दिनेश मधूला सगळे सांगून टाकू असे म्हणतो. मग मधुशी बोलताना दिनेश आमच्या लग्नाला बारा वर्षे झाली आहेत. सुरुवातीची दोन वर्षे छान गेली, तेव्हा मी काढलेल्या पेंटिंग्स वर विभा चर्चा करायची . मात्र, नंतर राणी झाल्यानंतर विभा बदलली आणि तिचा स्वयंपाक घरातील काम ,इतर कामे, ऑफीस यामध्ये पोतेरे झाले. आणि माझ्यासारख्या क्रिएटिव्ह माणसाला हे सारे यंत्रवत जगणे शक्य नव्हते. विभाचा मोठा भाऊ श्रीधर कालच माझ्या ऑफिसमध्ये येऊन दोन तास बसला होता. त्यालाही मी हे सगळं सांगितलं आणि त्यालाही ते पटलं आहे . मग मधु बाहेरच्या खोलीत येऊन बसतो. तेव्हा दिनेशची आई मधुला विचार विभा कडे जाताना मलाही नेशील का? मला राणीला भेटायचे आहे. तुमच्या घराजवळच मी कुठेतरी बसेल तू राणीला घेऊन येशील का? असं विचारते इतक्या डोअर बेल वाजते, आई दार उघडते तर विभा घरात प्रवेश करते. आणि मी इथे कायमचे राहायला आली आहे, असे सासूला सांगून चालेल ना? म्हणून विचारते . बोलण्याच्या ओघात विभा सासूला म्हणते मी आईच्या घरी गेले होते. तिथे सर्व भांड्यांवर तिचीच नावे होती. घरातल्या सगळ्या वस्तूंवर सफाईच्या निमित्तानं तिचाच हात फिरायचा. माझ्या लक्षात आलं की हा तिचा संसार आहे. तिथल्या सगळ्या गोष्टींना तिने माया लावली आहे . तसं इथल्या सगळ्या वस्तूंना मी माया लावली आहे. या वस्तूंवरून माझा हात फिरला आहे . हे माझे घर आहे . हा माझा संसार आहे. दिनेशला दुसरे लग्न करायच आहे, त्याला दुसरा संसार थाटायचा आहे ,तर त्याने इथून जायला पाहिजे .
पुढे काही महिन्यानंतर उर्मिला, विभा ,सासू आणि राणी छान कुठेतरी जाण्याचा प्लान करतात. इतक्यात फोन वाजतो तिकडून दिनेश बोलत असतो. नंदिताला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आहे. दवाखान्यात तिच्याजवळ कोणीतरी असावे म्हणून तो आई दवाखान्यात येईल का ?असं विचारतो. तेव्हा त्याची आई , दवाखान्यात कोणी येणार नाही विभाच्या घटस्फोटानंतर जसा तू तुटक राहिलासना तसाच तुटक रहा असे जोरात बोलते. हा आवाज फोनवरून ऐकून दिनेश फोन ठेवून देतो मात्र उर्मिला आईला समजावते आणि स्वतःच हॉस्पिटलला जाते.
विभा सासूच्या चे डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन झाल्यानंतर तिची काळजी घेत असते. इतक्यात दिनेश आईला भेटण्यासाठी म्हणून तिथे येतो. तो घरातील सजावट पाहून बदललेले पडदे,भिंतीवर लावलेल्या नृत्यांच्या तसबिरी आधी गोष्टी पाहून कौतुक करतो . तेव्हा आई म्हणते हे घर विभाच्या नावावर करून दे. कारण आता तुलाही मुले होतील आणि राणी ही तुझेच नाव लावते त्यातून पुढे वाद होण्यापेक्षा हे घर विभाच्या नावावर करून दे. इतक्यात विभा पैशाचं पाकीट दिनेशला देऊन, हे आईच्या ऑपरेशन साठी तू दिलेले पैसे नकोत . मी माझ्या माणसांचे करायला समर्थ आहे . आणि हो बँकेतल्या लोकांशी माझे बोलणे झाले आहे तेव्हा या फ्लॅटसाठी माझ्या वाट्याची कर्जाची रक्कम चेक आल्यावर तेहि पैसे तुला मिळतील. असे सांगते तेव्हा दिनेश आणि विभा मध्ये वादावादी होते. तेव्हा दिनेशची आई दिनेशला तुला कधीच सांगायचं नाही असं ठरवलं होतं पण तू सांगायला मला भाग पाडतो आहेस म्हणून सांगते असे म्हणून, तू चार वर्षाचा होतास तेव्हा तुझे वडील ही असेच दुसरे लग्न करण्यासाठी माझ्याकडे घटस्फोट मागत होते . तेव्हा आमच्यात वादावादी झाली त्यांनी मला खूप मारलं मात्र सासू-सासरे काहीच बोलले नाहीत. मग मी खूप गयावया केली शेवटी तुला त्यांच्या पायाशी टाकले. मात्र ते त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले आणि म्हणून मी विभाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. हे सगळे ऐकल्यानंतर दिनेशच्या डोळ्यातही पाणी येते.
पुढे काही दिवसांनी रात्री उशिरा उर्मिलाचा फोन येतो आणि ती दिनेशला मुलगा झाल्याची बातमी आईला देते., आणि मी पहाटेपर्यंत पोहोचणार असल्याचे सांगते. मात्र या सगळ्या गडबडीत सासू कोणता दवाखाना आहे विचारायचे विसरते. आणि विभाला मला सकाळी लवकर उठव नव्या आलेल्या जीवाला मी पाहून येते असे म्हणते. सासूबाई दिनेशचे बाळ पाहायला जातात, आणि राणीलाही नेतात. दहा दिवस तिथेच राहतात तेव्हा फोनही करत नाहीत तेव्हा विभाच्या घटस्फोटाच्या वेळी आपल्या पाठीशी ठामपणे उभी असणारी सासू आणि नणंद आज मात्र लगेच तिकडे गेल्या त्यांनी आपल्याला स्पष्टपणे काहीतरी सांगायला पाहिजे होतं , असा विचार विभाच्या मनात येतो आणि तिला वाईटही वाटतं . इतक्यात बेल वाजते मधू येतो . सगळे कुठे आहेत असे विचारतो आणि तुझ्यासाठी गुड न्यूज आहे असं सांगतो . आणि मित्राचं स्थळ आणल्याचे सांगून विभाला लग्नाबद्दल विचारतो. ती नकार देते इतक्यात विभाची सासू घरी येते दिनेशचे बाळ आठ पौंडाचं , गुबगुबीत,गोबर्या गालांचे आहे असे सांगते. सासूला खूप आनंद झाल्याचे तिच्या चेहर्यावर दिसत असते. विभा सासूबाईंना साधा फोन पण केला नाही ,याबद्दल विचारते. तेव्हा ती मी दवाखान्यात गेले तेव्हा बाळाचे करायला कोणीच नव्हते, आज नंदिताच्या घरचे बंगलोर हून आले तेव्हा मी लगेच इकडे आले. खरं जर राणीचाही पाय निघत नव्हता तिलाही बळेच आणले असे सासूबाईंनी म्हटल्यानंतर विभा त्यांना पुन्हा केव्हा जाणार असे विचारते तेव्हा सासूबाई हो पुन्हा जाणार आणि काम झाले की पुन्हा परत इथेच येणार. ,असे न्हवते . मधु विवाह स्थळ आल्याचे आणि विभा नाही म्हणत असल्याचं सांगतो, तेव्हा सासूबाई का नाही म्हणते असे विचारतात. तेव्हा विभा म्हणते मोठ्या कष्टाने या घरात मी माझी मुळे पुन्हा रुजवली आहेत. आता पुन्हा त्यांना खुडायचे नाही. त्याला जर लग्नाचे इतकेच वाटत असेल तर त्यानेच इथे येऊन राहायला हवे, माझ्या घरात. इथे नाटकाचा पडदा पडतो.
64 व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत केक फाउंडेशनच्या वतीने जयंत पवार लिखित 'माझं घर ' हे नाटक सादर करण्यात आलं. या नाटकाचे दिग्दर्शन कल्पना केतन नवले यांनी केलं, त्यांनीच 'माझं घर' या नाटकातील आई ही भूमिका साकारून त्या भूमिकेला ही चांगलाच न्याय दिला. नाटकातील विभा ही भूमिका चैत्राली जावळे यांनी सशक्तपणे उभी केली. दिनेशच्या भूमिकेत नितीन जावळे यांनीही त्यांना तोलामोलाची साथ दिली . नाटकातील उर्मिला (करिष्मा कोठारी जोशी} मधु {माधव भारदे} आणि राणीच्या भूमिकेत (नीलम साठये ) यांनी त्यांच्या भूमिका चोख बजावल्या. मात्र नाटकात विभा बँकेत नोकरी करते की कॉलेजमध्ये की ऑफिसमध्ये नोकरी करते याबद्दल थोडासा संभ्रम निर्माण झाला. नाटकाचे नेपथ्य सुखवस्तु कलाकाराचे घर उभे करण्यात अंजना मोरे या यशस्वी ठरल्या. नीरज लिमकर यांची प्रकाशयोजना नाट्यसंहितेला साजेशी होती. वेदश्री देशमुख यांचे संगीत ,डॉ. स्नेहल सैंदाणे यांनी रंगभूषा आणि प्राजक्ता साठये यांनी केलेली वेशभूषा नाटक संहितेला पूरक अशीच होती . या नाटकातून स्त्रीचं घरामधील अस्तित्व नक्की काय? असतं . स्त्री-पुरुष समानता म्हणजे नक्की काय? सासु सुनेचं नातं नक्की कसं असावं, एखाद्या घटस्फोटीत स्त्रीने जर समाजाला काही प्रश्न विचारले तर त्यावर काही उत्तर आहे का ? या प्रश्नांची उत्तरे या नाटकातून मिळाली. नाट्यसंहिता सादर करताना कलाकारांनी आणि तंत्रज्ञाने घेतलेल्या मेहनतीमुळे प्रयोग चांगलाच देखणा झाला.
(देवीप्रसाद अय्यंगार)
.jpg)




0 Comments