"ए आय" मुळे येणाऱ्या भविष्याचे चित्र दाखवणारे नाटक "लुई दागेरी ते पिकासो"

"ए आय" मुळे येणाऱ्या भविष्याचे चित्र दाखवणारे नाटक 

"लुई दागेरी ते पिकासो" 

थिएटर मध्ये"राधेय" चित्रपटाचे प्रदर्शन सुरू असते ज्यातील शहा नावाच्या निर्मात्याने पहिल्यांदाच आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या माध्यमातून या चित्रपटाची निर्मिती केलेली असते. चित्रपट संपतो तसेच टाइम्स 24 या चॅनेलची अँकर प्रेक्षकांची प्रतिक्रिया घेत असते.चित्रपट पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक त्यांना चित्रपटाबद्दल काय वाटले ते प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत असतात.काही प्रेक्षक ए आय तंत्रज्ञानाच्या वापराचे कौतुक करतात तर,एक वयस्कर प्रेक्षक ए आय तंत्राचा वापर फारसा प्रभावी वाटला नाही यापेक्षा आमच्या काळातले चित्रपट मनाला भावतात अशी नाराजी व्यक्त करून निघून जातात. टाइम्स 24 चॅनलवर जतीन शहांची मुलाखत सुरू असते,ए आय तंत्र वापरून त्यांनी निर्मित केलेल्या चित्रपटावर ते भलतेच खुश असतात.या चित्रपटाने 900 कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याचे ते अभिमानाने सांगतात.शिवाय कलाकार, तंत्रज्ञाचे कोणतेही फाजील लाड न पुरवता चित्रपट निर्मिती करणे शक्य असल्याचे सांगतात.

 एका फाइव स्टार हॉटेलमध्ये "राधेय" चित्रपटाची सक्सेस पार्टी सुरू असते.त्या पार्टीतही जतीन शहा त्यांच्या दिग्दर्शकांचा,एडिटर्सचा,लेखकांचा या यशात मोठा सहभाग असल्याचा सांगतात. त्यावेळी वाधवानी शहाला आम्हालाही कुठे पैसे गुंतवायचे ते कधी कधी कळत नाही असे म्हणतात तर पाटील नावाचे आमदार म्हणतात आम्ही आधी चित्रपटात पैसे लावले पण चित्रपटच पूर्ण झाले नाहीत.पण इथून पुढच्या काळात आपण तिघे मिळून चित्रपट निर्मिती करू.या सक्सेस पार्टीला सांस्कृतिक मंत्री येतात आणि जतिन शहाचा सत्कार करून त्याचे कौतुक करतात. या पार्टीला सुप्रसिद्ध व बुजुर्ग अभिनेता राजमाने ही उपस्थित असतात तसेच पार्टीत राधिका ही चित्रपट सृष्टीत स्थिरावलेली अभिनेत्री तर अभिजीत हा अभिनेताही हजर असतो. त्या पार्टीतच अभिजीतला एक फोन येतो त्यातून त्याला कला दिग्दर्शक सुहासने आत्महत्या केल्याचं कळतं,सुहासने त्याच्या सुसाईड नोटमध्ये एआय तंत्रामुळे चालेना असा झालेला व्यवसाय आणि कर्जबाजारीपणाचे प्रेशर यामुळे आत्महत्या केल्याचं समजतं.ए आय तंत्राचा वापर करून चित्रपट निर्मिती करणाऱ्या जतीन शहाचा अभिजीतला राग यायला लागतो आणि त्या पार्टीतच जतीन शहा आणि अभिजीतची झटापट होते. 

प्रकरण पोलिसात जाते. राधिका आणि अभिजीत यांच्यामध्ये पार्टीत घडलेल्या प्रसंगावरून चर्चा सुरू असते. खरंतर राधिका अभिजीत बरोबर राहून चित्रपटसृष्टीत स्थिरस्थावर होण्याचं स्वप्न रंगवत असते, मात्र झाल्या प्रकरणाने त्यांचे अस्तित्व चित्रपटसृष्टीत धोक्यात आल्याचे ती अभिजीतला सांगते.इतक्यात अभिजीतला चित्रपट नियामक मंडळातून फोन येतो तेव्हा राधिका अभिजीतच्या हातातून फोन हिसकावून घेते आणि शिंदे यांच्याशी बोलते पोलिसात प्रकरण गेल्याने अभिजीत आणि जतीन या दोघांनाही पोलिसांनी बोलावलेले असून त्या अगोदर यातून काही मार्ग काढता येतो का? यासाठी बैठक बोलावल्याचे ते राधिकाला सांगतात तेव्हा राधिका बैठकीचे निमंत्रण स्वीकारून अभिजीतला बैठकीला घेऊन येते असं सांगते. 

चित्रपट महामंडळात बैठक सुरू असते त्यावेळी घडल्या प्रसंगावर अभिजीत आपली भूमिका मांडतो त्याचबरोबर चे सकारण निवेदन करतो. 

तर संकलक बल्लाळ आपली भूमिका मांडतात चित्रपट संकलन करताना एका छोट्याशा खोलीत बसून आम्ही संकलन करत असतो मात्र चित्रपट हिट झाला की नाव मात्र नट नट्यांचे होतं.आमचे कष्ट मात्र कोणालाच दिसत नाहीत आमची स्वप्न त्या एडिट रूममध्येच कोमेजून जातात मात्र एआय तंत्रज्ञाना मुळे आम्हाला चांगले दिवस येतील,म्हणून या नट्यांच्या आता पोटात दुखतंय. जतीनही या संकलकाच्या मताला दुजोरा देत आपली भूमिका मांडतात.सरते शेवटी राजमाने बोलताना एआय तंत्रज्ञान हे माणसाने सांगितल्या बरहुकूम काम करेल, त्याला भावभावना नसतील, असे सांगून मी  लुई दागेरे यांनी कॅमेऱ्याचा शोध लावल्यानंतर तत्कालीन चित्रकार कलावंतां वरही बेकारीची कुऱ्हाड कोसळली मात्र तेव्हा सुद्धा पिकासो सारख्या चित्रकारांना स्वतः च्या वेगळ्या शैलीचा वापर करून चित्रकलेचा प्रभाव कायम राखला,आणि आता सुद्धा ए आयच्या वापर करून चित्रपट निर्मिती केल्याबद्दलच्या विरोधात हॉलीवुड मध्ये एक आंदोलन करण्यात आले.जेव्हा केव्हा एखाद्या तंत्राचा वापर सुरू होतो तेव्हा कुठल्यातरी एका क्षेत्रावरच्या तंत्राच्या प्रभावामुळे तसा परिणाम होत असतो.मात्र यातच त्या तंत्रावर मात करून आपले अस्तित्व टिकवण्याचा जे प्रयत्न करतात त्यांना यशही मिळते असे सांगून राजमाने वादातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात.मात्र यात काहीच नाट्य घडत नसल्याने प्रयोग संथ गतीने पुढे सरकला.इतक्यात निवेदिकेने भारतातील एका चित्रकाराचे चित्र ५७ कोटी रुपयांना विकले  तर एम एफ हुसेन यांचे चित्र १३७ कोटी रुपयांना विकले गेल्याची घोषणा करते.इथेच पडदा पडतो.   

     आजकाल संगणक युगाच्या येण्याने पारंपारिक पद्धतीने काम करणाऱ्या वर्गावर जशी बेकारीची कुऱ्हाड कोसळली तसेच एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चित्रपट निर्मितीमुळे चित्रपट सृष्टीतील अनेक तंत्रज्ञानवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली.असा विषय घेऊन ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत डॉ.श्याम शिंदे लिखित व दिग्दर्शित "लुई दागेरी ते पिकासो" हे नाटक सादर करण्यात आलं.

अभिजात कला ते तंत्रज्ञान या वादावर भाष्य करण्यात दिग्दर्शक श्याम शिंदे आणि त्यांना सहाय्य करणारे अंजना पंडित व अविनाश कराळे हे विषयाची मांडणी करण्यात यशस्वी झाले.नाटकाच्या सुरुवातीलाच कर्ण व अर्जुन यांच्या युद्धाचा प्रसंगात प्रकाश झोतांच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करण्यात प्रकाशयोजनाकार विक्रम गवांदे आणि ओम वाळके यशस्वी झाले.दीपक मोहोळ आणि सुधीर देशपांडे यांनी साकारलेले थिएटरचे प्रांगण, हॉटेल आणि महामंडळाचे कार्यालयाचे नेपथ्य सुटसुटीत वाटले,कल्पेश शिंदे आणि गीता शिंपी यांनी संहितेला पूरक असे संगीत दिले,रंगभूषाकार चंद्रकांत सैंदाणे आणि कुंदा शिंदे यांनी दिलेली वेशभूषा संहितेला साजेशी अशीच होती.या नाटकातील भूमिका सर्वच कलावंतांनी चोखपणे पार पाडली.त्यात फिल्म अँकर पायल कोरके, चॅनल अँकर सायली धुमाळ, पार्टी अँकर अंजना पंडित, जतीन शहा यांची पत्नी जागृती पाटील आणि राधिकेच्या भूमिकेतील आकांक्षा शिंदे या उठून दिसल्या.कर्णाच्या भूमिकेतील सुनील लामदाडे,कृष्णाच्या भूमिकेतील शिवाजी रणसिंग, अर्जुन (गणेश पवार),जतीन शहा (अविनाश कराळे), वाधवानी (अजय कुमार पवार), पाटील (डॉ.काशिनाथ सुलाखे पाटील) ,लेखक जोशी (प्राध्यापक सुनील कात्रे), मोहिते (आकाश मुनफल), देसाई (राजकुमार मोरे), राजमाने (सागर अधापुरे), अभिजीत (गणेश देशपांडे) बल्लाळ (कल्पेश शिंदे) दीपक (ओंकार बोथेकर) कॅमेरामन (रियाज शेख) आणि अन्य कलावंतांनीही त्यांच्या त्यांच्या भूमिका चोखरितीने पार पाडल्याने नाटकाचा प्रयोग नेटक्या रीतीने सादर झाला.

अश्याप्रकारे भविष्याचे चित्र दाखवणारे हे नाटक ठरले.नाटकाच्या प्रारंभीच "कुरुक्षेत्र" या वेब सिरीज मधील कर्ण अर्जुन युद्धाच्या प्रसंगातून एआय च्या माध्यमातून साकारलेल्या प्रसंगातील नाटकाला सुरुवात होते.मात्र दुसऱ्या अंकात नाटकाला परिसंवादाचे स्वरूप आल्याने नाटक काहीसे रेंगाळले नाटकात अपेक्षित नाट्य घडत नसल्याने नाटक गती घेऊ शकले नाही. 

(देवीप्रसाद अय्यंगार)

Post a Comment

0 Comments