कौटुंबिक समस्यांवर बेतलेलं नाटक "पिसाळा"

 कौटुंबिक समस्यांवर बेतलेलं नाटक "पिसाळा" 

गावात इंदू तिचा मुलगा महेश आणि सून स्वाती आणि खंड्या  नावाचा त्यांचा कुत्रा असं कुटुंब राहत असतं. इंदूचा नवरा निघून गेल्याने लहानग्या महेश साठी इंदू गावात राहून काबाडकष्ट करते आणि महेशला वाढवते महेश शहरात शिकायला जाऊन आलेला असतो.  तसं पोटापाण्यासाठी एक दोन व्यवसायही करतो त्या दुधाच्या आणि वायरिंग च्या व्यवसायात त्याला अपयश येतं, आणि त्यात तो कर्ज बाजारी होतो. 

महेश शिकायला शहरात गेल्यामुळे, त्याने लहानपणी हट्टाने एक कुत्र्याचं पिल्लू पाळलेलं असतं. इंदू त्या कुत्र्याला जीव लावते.  त्यामुळं दिवसभर गावातकुठेही फिरलं तरी भाकरी खायच्या वेळी खंड्या घरीच येत असतो. त्यामुळे इंदू आणि  खंड्यात प्रचंड जवळीक निर्माण होते.पुढे महेश शिकून गावात येतो तसं त्याच स्वातीशी लग्न होतं.  स्वाती त्याला मनोमन साथ देत असते मात्र त्यांच्या घरी पाळणा हललेला नसतो.याची सल स्वातीच्या मनात असते.त्यामुळे ती काहीहीकरून आई होण्याचं स्वप्न उराशी बाळगून असते. तिच्या आणि  महेश मधल्या सामंजस्याने ते कृत्रिम गर्भ धारणा (आय व्ही एफ) करून घेण्याचा विचार करतात.

गावात महेशचा मित्र जग्या महेशला जमीन विकून टाक,कर्ज फेड,आणि उरलेले पैसे शेयर मार्केट मध्ये गुंतवण्याचा सल्ला देतो. महिन्याला चाळीस पन्नास हजार रुपये व्याज येईल त्यावर छान मौज करून आयुष्य जग अशी स्वप्न दाखवत असतो.जमिनीसाठी माझ्याकडे गिऱ्हाईक आहे मात्र इंदूला जमीन विकण्याची गोष्ट मान्य नसते आणि जग्याचा कावेबाजपणा ती ओळखून असते त्यामुळे इंदू जमीन विकण्याच्या विरोधात असते.

एके दिवशी गावातील एक पिसाळलेलं कुत्रं खंड्याला येऊन चावतं.  खंड्याला वाचवायला महेश जातो, तसं त्या कुत्र्याचा दात महेश च्या हाताला लागतो.जखमी खंड्याची अवस्था पाहून दोन दिवसांनी महेश आपल्या डॉक्टर मित्राला बोलावतो . मात्र, डॉक्टर सर्व विचारपूस केल्यानंतर कुत्र चावल्यानंतर २४ तासात उपचार करायचे असतात.  आता ह्याला २ दिवस होऊन गेले.  त्यामुळं खंड्या पिसाळण्याची जास्त शक्यता आहे मी त्याला इंजेक्शन देतो.  मात्र त्याची खात्री देत नाही असे सांगतो. 

शेजारचा मुलगा साई खंड्यासाठी एक भाकरी घेऊन येतो.खंड्याला भाकरी द्यायला जातो, तसा खंड्या त्याच्यावर भुंकतो तर इंदू म्हणते अरे त्याच्या जवळ जाऊ नको. याआधी साई आणि त्याचा मित्र खंड्या बरोबर खेळत असतांना त्यांनी खंड्याची शेपूट ओढलेली असते, त्यामुळे खंड्या त्यांच्यावर चिडल्याच साई इंदूला सांगतो . त्यावर  हे प्राणी माणसावरील विश्वासामुळे त्यांच्याशी चांगले वागत असतात, त्याला थोडा वेळ दे त्याचा राग निवळला कि तो तुझ्याशी पहिल्यासारखा वागेल असे सांगते.तेव्हड्यात साईची आई तिला गावात बचतगट म्हणत असतात, ती येते आणि साईला धाकधपटशा दाखवून घरी नेण्याचा प्रयत्न करते . इतक्यात स्वाती मुलावर रागावू नका हो, असे म्हणते.  तेव्हा बचतगट स्वातीला मुल नसण्यावरुन हिणवते आणि खंड्याकडे बघून त्याच्या तोंडाला लाळ सुटली आहे त्याला इंजेक्शन देऊन मारून टाका असे म्हणून निघून जाते. 

महेशनं जमीन विकण्याचं पक्क केलेलं असतं मात्र इंदू जमिनीच्या कागदपत्रांवर सह्या करायला तयार नसते यावरून आई आणि मुलामध्ये वाद होत असतात. स्वाती मात्र या वादातही महेशच्या बाजूने बोलत असते. रागाच्या भरात महेश इंदूला तुझ्या अश्या नन्नाचा पाढा लावल्यामुळे बाबा आपल्या सोडून गेले पण जातांना माझ्यासाठी जमीन ठेऊन गेलेत ना असं बोलल्याने इंदू चांगलीच दुखावली जाते. तुला लहानाचं मोठं करतांना मीच तुझी बाप झाले आणि त्यामुळंच तू आज आईलाच मारून टाकलस.  असं म्हणते आणि बाहेरची कुत्री येऊन घरातल्या कुत्र्याला चावल्यावर ते पिसाळलं, तस बाहेरच्या माणसांमुळं घरातली माणसंही पिसाळल्यागत वागायला लागलीत.आण ती कागदपत्र करते मी सही असं त्राग्याने म्हणते. 

सही केलेली कागदपत्र महेश जग्याला देतो आणि पैश्यांची मागणी करतो तसं जग्या काही कारण सांगून दोन दिवसात पैसे देतो असे म्हणतो.दोन दिवसानंतर महेश जग्याला फोन लावतो जग्याचा फोन बंद असतो. मग महेश जग्याला शोधण्यासाठी पोलिसात जातो आणि इतक्यात बातमी येते अहिल्यानगर मधील एका शेयर बाजारातील एजेंट ने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातलेला आहे. त्यात प्रमुख आरोपी फरार असल्याचं सांगितलं जात. 

महेशला आपण केलेल्या चुकीचा पश्चाताप होतो.आई आपल्याला सांगत होती कि जग्याच्या नादाला लागू नकोस पण आपण ऐकलं नाही त्या पश्चातापाच्या भरात महेश स्वातीकडे जातो.  आणि तिला सगळी हकीकत सांगून आईला सांगण्याबद्दल विनवतो. अखेर दोघेही आईकडे जातात आणि तिला हकीकत सांगून तिची माफी मागतात. 

असं कथानक असलेलं पिसाळा हे नाटक राजगड प्रतिष्ठान बोधेगाव च्या कलाकारांनी सादर केलं या संहितेचं लेखन पवन पोटे यांनी केलं असून,प्रतीक अंदुरे यांच दिग्दर्शन असलेल्या या नाटकात त्यांना पवन पोटे यांनी दिग्दर्शन सहाय्य केले,गाव आणि तिथल्या वातावरणाची निर्मिती कारण्यासाठी कीर्तनाचा आधार घेऊन संत तुकाराम, संत एकनाथ महाराज आणि संत ज्ञानेश्वर यांच्या अभंगांचे निरूपण तीन कीर्तनकारांच्या माध्यमातून कथानक पुढे सरकतं यातील कीर्तनकारांच्या भूमिका तनिष्का देशमुख, तनिष्क भंडारी आणि ज्ञानेश्वरी म्हसे यांनी उत्तमरित्या साकारल्या.महेश च्या भूमिकेतील अथर्व धर्माधिकारी यांनी अत्यंत समरसतेने निभावली,तर त्यांना स्वातीच्या भूमिकेत अपूर्वा काळपुंड यांनी उत्तम साथ दिली, इंदूच्या भूमिकेतील आई हि व्यक्तिरेखा राखी गोरखा यांनी त्यांच्या सकस अभिनयातून उत्तम वठवली, साईराज गार्डे या बालकलाकाराने साईच्या भूमिकेतून आपला ठसा उमटवला. डॉक्टरच्या भूमिकेत रणवीर पालवे आणि जग्याच्या भूमिकेत पृथ्वी सुपेकर आणि लक्ष्मणच्या भूमिकेत ओम सैंदाणे यांनी आपापल्या भूमिका चांगल्या निभावल्या.टाळकरीच्या भूमिकेत सुकन्या गर्जे आणि मित्राच्या भूमिकेत अथर्व शहा ठीक वाटले. 

या नाटकाचे नैपथ्य तनिष्क भंडारी यांचं होतं त्यांनी ग्रामीण भागातील बैठकीची खोली आणि अंगण सुटसुटीत उभे केले होते, या नाटकाचं संगीत सिद्धेश्वर उंडाळकर आणि संगीत संयोजन नाटकाच्या कथानकाला साजेस असं होतं. नाटकाच्या प्रकाश योजनेची जबाबदारी चेतन ढवळे यांनी समर्थ पाने सांभाळली 

 नाटकाची रंगभूषा राखी गोरखा यांनी तर वेशभूषा तनिष्का देशमुख यांनी कथानकला साजेशी केली होती. 

एकूणच वेगळ्या धाटणीचं कथानक असलेलं हे नाटक प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाल.                                                                                           

  (देवीप्रसाद अय्यंगार )

Post a Comment

0 Comments