।। जागर शक्तीचा ।। जागर भक्तीचा ।।
अडीच शक्तीपीठांचा वास असलेले नगरचे सप्तशृंगी मंदिर
सारडा गल्लीतून गंज बाजार कडे जाताना मधल्या छोट्याशा रस्त्यात सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे हे मंदिर सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचे असून येथे रेणुका देवी कालिका देवी आणि सप्तशृंगी अशी अडीच पीठे आहेत.दोनशे वर्षापुर्वी मूळचंद दौलतराम गौड यांना हे मंदिर आंदण म्हणून मिळाल असल्याचं सांगितलं जातं शहरातील अन्य देवी मंदिरांप्रमाणे हेही मंदिर अत्यंत जागृत देवस्थान आहे.
या मंदिरात भिंतीवर कोरल्या प्रमाणे सप्तशृंगी मातेची अष्टभुजास्वरूपातील मूर्ती असून ती सिंदूरवर्ण आहे तर कालिमातेची कृष्णवर्णीय मूर्ती ही त्या शेजारीच आहे . या देवी मंदिरातील रेणुका देवीचा तांदळा अत्यंत प्रसन्न हसतमुख असून या मंदिरात गेल्यावर अत्यंत प्रसन्न वाटते. कन्हैयालाल शंकरलाल फुलडहाळे हे पुजारी म्हणून काम पाहायचे त्यांच्या पश्चात त्यांची मुलं पुजारी म्हणून काम पाहतात .
मंदिरात चैत्र पौर्णिमा चैत्री नवरात्र अश्विन नवरात्र हे उत्सव साजरे केले जातात अश्विन नवरात्रामध्ये भजनी मंडळ यांचे कार्यक्रम होतात त्याच बरोबर रोज सायंकाळच्या वेळी दांडिया नृत्यही केले जाते. अष्टमीला देवीचा होम असतो.
नवसाला पावणारी देवी असल्याने अनेक लोक येथे येऊन नवस-सायास करतात आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर नवसात बोलल्याप्रमाणे नवसपूर्ती ही केली जाते नुकतच पुण्यातील एका भाविकाने नवसपूर्ती म्हणून देवीला सोन्याचे डोळे अर्पण केले आहेत, असे अनेक अनुभव भक्तांना आले असल्याचे निर्मला. फुलडहाळे यांनी सांगितले.
यंदा करोना च्या प्रादुर्भावामुळे मंदिरात भजन नृत्य आधी कार्यक्रमांना आळा घालण्यात आला असल्याने सामाजिक अंतरपथ्याचे नियम पाळूनच कार्यक्रम केले जातात, यात सकाळी सहा वाजता आरती, दुपारी बारा वाजता नैवेद्य ,संध्याकाळी नऊ वाजता आरतीअसे दैनंदिन पूजनाचे कार्यक्रम होत आहेत.
0 Comments