'डिंक' चा देखणा प्रयोग

होप फाउंडेशनचे  सामाजिक  विषयावर भाष्य करणारे नाटक 

'डिंक' चा देखणा प्रयोग

श्रेयस आणि सायली हे सुखवस्तू दांपत्य दोघेही जण नोकरी करतात.  त्यांच्या लग्नाला पाच वर्षे झालेली आहेत .  त्यांना मुल बाळ नसते, मुल वाढवणे ही एक जबाबदारी असते त्यामुळे नोकरीच्या कामात व्यत्याही येऊ शकतो. स्वच्छंदीपणे फिरण्यावर बंधने येऊ शकतात आणि मुलं असली तरी ती  मोठी झाल्यावर आपल्या आई-वडिलांबरोबर राहतीलच याची शाश्वती नाही.  असे एक जवळचेच उदाहरण त्यांच्यासमोर असते या सगळ्या गोष्टींमुळे या दंपत्याने मूल जन्माला न घालण्याचे निर्णय पक्का केलेला असतो.  

श्रेयस आणि सायली च्या लग्नाचा वाढदिवस असतो.  सीमा आणि शरदला संध्याकाळी पार्टी करण्यासाठी सायली घरी बोलावते, पार्टी रंगात येते, तेव्हा सीमा सायलीला ड्रिंक नको मी प्रेग्नेंट आहे, असे सांगते त्यावर सायली तिला अनेक प्रश्न विचारते.  सायली आम्ही मुल जन्माला घालणार नसल्याचा निर्णय घेतल्याचे सांगते.  त्यांचीही बोलाचाली सुरू असतानाच श्रेयसची आई दरवाजात उभी  असते.  श्रेयसच्या आईला पाहून सायलीला धक्का बसतो त्या अचानक आल्याने सायली त्यांच्यावर मनातून नाराज असते.  दुसऱ्या दिवशी श्रेयस ऑफिसला जायला निघतो इतक्यात त्यांची आई तुझ्या वडिलांचे श्राद्ध जवळ आले आहे म्हणून मी इथे आले आहे असे सांगते.  तेव्हा संध्याकाळी आपण या विषयावर बोलू असे सांगून श्रेयस ऑफिसला निघून जातो. . आई सायलीला विचारते तुमच्यापैकी नेमका दोष कोणात आहे सायलीला हा प्रश्नच कळत नाही तेव्हा त्या सांगतात काल संध्याकाळी मी तुमचे बोलणे ऐकले होते, तुम्हाला मुलच होणार नाही, तेव्हा सायली आईला सांगते की दोष आमच्या दोघातही नाही आम्ही "डिंक" म्हणून राहण्याचा निर्णय घेतला आहे डिंक म्हणजे डबल इन्कम  नो किड्स . श्रेयसची आई सायलीला शेवटी हा तुमचा निर्णय आहे मी आक्षेप घेणार नाही असे सांगते.

श्रेयस आणि सायलीचे नोकरी करियरवर लक्ष असते सायली वर्क फ्रॉम होम करत असते.  ती एका एआय  प्रोजेक्ट वर काम करत असते . मात्र एक दिवस तिला कंपनीतून बॉसचा फोन येतो की कंपनीच्या क्रॉस कटिंग च्या धोरणाने तुम्हाला ही  नोकरी गमवावी लागत आहे .  सायली या प्रसंगाने खचते. 

सुनिता घर स्वच्छ करत असताना सायली तिला दोन दिवस न येण्याचे कारण विचारते . तेव्हा सुनीता प्रेग्नेंट असल्याचे सांगते. एक मूल असताना दुसऱ्याची जबाबदारी तुला पेलणार आहे का असं सायली सुनीताला विचारते.  त्यावर घरात माणसं जास्त असली की मन रमतं  असं सुनिता उत्तर देते.  सायलीला आता वेळ कसा घालवायचा असा प्रश्न पडलेला असतो आणि तिला आतून एकटेपणाची जाणीव होऊ लागते.  समोर राहणारी सान्वी  नावाच्या छोट्या मुलीला तिची आई घेऊन येते .  बाहेर जायचं असल्याने थोडा वेळ सांगवीला तुमच्याकडे ठेवू का असं विचारते आणि सान्वी  सायलीकडे थांबते.  तो दिवस सान्वी  बरोबर अत्यंत मजेत जातो.  एक दिवस सकाळीच शेजारचे काका श्रेयस कडे येतात आणि ट्रांजिस्टर बिघडल्याचे सांगतात.  श्रेयस म्हणतो काका आता मोबाईल मध्ये पण गाणी  ऐकता येतात ,आणि आमच्याकडे तर अलेक्सा आहे ती सांगेल ते गाणे लावते ,आणि अजून तुम्ही अजूनही ट्रांजिस्टरवर गाणी ऐकता?  तेव्हा काका श्रेयसला सांगतात ट्रांजिस्टर वर गाणे ऐकण्याची मजाच काहीऔर  असते.  निवेदकाचा आवाज ऐकला की कोणीतरी आपल्याशी संवाद साधतं  असा भास होतो . शिवाय अचानकपणे कुठले गाणे वाजेल याची उत्सुकता लागून राहते ,हे सर्व मोबाईल मध्ये होत नाही ना.   मी संध्याकाळी ट्रांजिस्टर रिपेअर करून आणतो असंच श्रेयस काकांना सांगतो. 


सायली आणि श्रेयसची आई बोलताना सायली ही मनातून आपल्याला मूल  व्हावे असे वाटत असल्याचं सांगते, पण मुळात मी झाल्यानंतर माझ्या आई-वडिलांची झालेली ओढाताण मला नको वाटत होती, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला होता.  त्यावर श्रेयसची आई सायलीला मुलांसाठी होणारी ओढाताण त्यासाठी त्यांच्यासाठी करावा लागणारा त्याग यातूनच आई-वडिलांना खरं सुख मिळतं असे सांगून आई होण्यासाठी तू श्रेयसला बोललीस का त्याचे  मन वळव असे ते सांगते. 

एक दिवस सायली श्रेयस जवळ मूल जन्माला घालण्याबद्दलचा विषय काढते तेव्हा श्रेयस सुरुवातीला आढेवेढे घेतो.  मूल जन्मास  घालण्यासाठी नकार देतो. एक दिवस सीमा आणि शरद बाळाला घेऊन येतात सायली बाळ हातात घेते आणि छातीशी कवटाळते. सुनिताशी  प्रेग्नेंसी बद्दल बोलताना प्रेग्नेंसीत काय वाटते बाळाच्या हालचाली बद्दल जाणून घेते . त्यामुळे तिच्या मनात बाळाबद्दल अजून जास्त  ओढ निर्माण होते.

आजच्या जगात मूल जन्माला घालून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी श्रेयस ला त्याची भीती वाटत असते.  त्यातच काकांच्या उतार वयातही त्यांचा मुलगा त्यांच्याबरोबर नाही अशा अनेक गोष्टी श्रेयस सायलीला  सांगून वारंवार कल्पना देतो की मूल नको जन्माला घालायला, मात्र श्रेयसचा  प्रत्येक मुद्दा सायली खोडून काढते शेवटी नाईलाज होतो श्रेयस आणि सायली आई-बाबा होण्याचा निर्णय घेतात. 

सायली आणि श्रेयस आईला फोन करतात सायली आई होणार असल्याची गोड बातमी आईला देतात.आणि येताना डिंक लाडू घेऊन ये असे सांगतात.   

अलीकडच्या काळात वाढती महागाई न पेलणाऱ्या जबाबदाऱ्या त्यात नोकरी व करिअर करण्याची वृत्ती तरुण दांपत्यांमध्ये बळावत आहे.  त्यातूनच काही दांपत्य "डिंक" (ड्वेल इन्कम नो कीड) राहण्याचा निर्णय घेताना दिसतात.  या गंभीर सामाजिक  विषयावर भाष्य करणारे "डिंक " हे नाटक नगरच्या होप फाउंडेशनच्या कलापथकांनी सादर केले.  शैलेश देशमुख लिखित व दिग्दर्शित " डिंक 'ही संहिता आणि प्रमुख भूमिकेतही शैलेश देशमुखच   असल्याने हा प्रयोग अतिशय नेटका पद्धतीने सादर करण्यात आला.  सायलीच्या भूमिकेत अमृता बेडेकर आणि आईच्या भूमिकेत मेघमाला पठारे यांनी कसदार अभिनय केला त्यांना काकांच्या भूमिकेत अभय गोले, शरद च्या भूमिकेत किरण डिडवाणीया ,सीमाच्या भूमिकेत डॉ.  श्रावणी नवले ,सुनीताच्या भूमिकेत शर्वरी अवचट,सान्वीच्या आईच्या भूमिकेत श्रेया सुवर्ण फाटकी आणि  सान्वीच्या भूमिकेत सई लोंढे विशेष भाव खाऊन गेली.  अंजना मोरे यांनी सुरेख नेपथ्य उभारून सुखवस्तू घर दाखवण्यात त्या  यशस्वी झाल्या ,तर   वेशभूषा शीतल देशमुख आणि रंगभूषा चंद्रकांत सैंदाणे यांनी नाटकाच्या संहितेला   साजेशी केली. नीरज लिमकर यांची प्रकाशयोजना वाखाणण्याजोगी होती तर आशुतोष नेवसे यांचे संगीत संयोजन कथानकाला  साजेसे होते . या नाटकात दिग्दर्शकाने केलेले सिन  कंपोझिशन हे नाटकाचे बलस्थान ठरले एकूण "डिंक" चा  प्रयोग देखणा झाला.

                                                                                                      देवीप्रसाद अय्यंगार 

Post a Comment

0 Comments