सामाजिक विकृतीवर भाष्य करणारं नाटक 'अय'
एक नवीनच लग्न झालेलं जोडपं चाळीत राहत असते. या चाळीत होम मिनिस्टर चा खेळ सुरू असतो. वैशाली मात्र त्या स्पर्धेला न जाता घरातूनच त्यांनी सांगितलेल्या स्पर्धा प्रश्नांचे प्रकार घरात करून स्वतःला आजमावत असते. इतक्यात तिचा नवरा आनंद घरी येतो. तोही वैशाली बरोबरच्या खेळात सहभागी होतो. खाली रंगलेल्या होम मिनिस्टरच्या खेळातील दोघी स्पर्धाकांना अमिताभ बच्चनच्या चित्रपटाची जास्तीत जास्त नावे लिहा असा प्रश्न येतो. तसा आनंद आणि वैशाली सुद्धा खोलीत हा खेळू लागतात. स्पर्धेचा निकाल जाहीर होतो. एका बाईने आठ नावे लिहिलेली असतात. तर दुसऱ्या बाईने 12 नावे लिहिलेली असतात. मग आनंद स्वतःचा शर्ट काढून त्यावर लिहिलेली नावे मोजतो तर ती सतरा भरतात, तेव्हा, बघ तू जर स्पर्धेत भाग घेतला असतास तर तू जिंकली असतीस असे म्हणून वैशालीला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न आनंद करतो. पण वैशाली चाळीत कोणाशीही फारशी मिसळत नसते. कारण ती मुकी असते. तर आनंद बोलताना अडखळणारा असतो.
नवीनच लग्न झाले असले तरी अजून त्या दोघात पुरेशी जवळीक निर्माण झालेली नसते. आनंद जेव्हा जेव्हा तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती पुरुषांच्या भीतीमुळे त्याला लांब लोटत असते. या साऱ्या प्रकाराला वैतागून आनंद वैशालीच्या वडिलांना फोन करून बोलावून घेतो . वैशालीचे वडील घरी आल्यानंतर वडिलांना मुलीशी बोलता यावे म्हणून आनंद मंदिरात जाण्याचे कारण सांगून घराबाहेर पडतो. वडील वैशालीशी काही बोलायला मात्र कचरत असतात. मात्र तरीही ते आनंद खूप चांगला माणूस आहे. लहानपणी तुझ्यावर गुदरलेला प्रसंगाची मी त्याला कल्पना दिली. तेव्हा आनंदने मला फक्त एवढेच सांगितलं की झाल्या प्रसंगात वैशालीचा काय दोष. आणि लग्न म्हणजे नवरा बायको दोघेच नव्हे तर मुलेबाळे आणि त्यांचे संगोपन या काही जबाबदाऱ्याही असतात असे वैशालीला सांगतात मात्र, वैशाली पुरुषांच्या सहवासाला घाबरत असल्याने या गोष्टीसाठी तयार नसते अखेर वैशालीचे बाबा वैतागून चल बॅग घे आणि माझ्याबरोबर चल असे म्हणतात. तितक्यात आनंद घरात येतो आणि त्या दोघांनाही थांबवतो. तसंच वैशाली चे वडील वैतागून तिला आई नसल्याने माझ्यात काही बोलण्याची हिंमत उरलेली नाही ,आणि घडलेल्या प्रसंगांने तर मला तिच्याशी डोळ्यात डोळे घालून बोलताही येत नाही असे म्हणतात. यात तुमच्यावर अन्याय कशासाठी त्यापेक्षा मी तिला घरी घेऊन जातो असे सांगतात. त्यावर आनंद आता हा माझ्या घरातील प्रश्न आहे त्याचे उत्तर मीच शोधेन असे म्हणतो वैशालीचे बाबा निघून जातात.
आनंद या क्षणापासून बायकोला खंबीर बनवण्याचा निर्णय घेतो. एकदा आनंद घरी येतो तेव्हा लगेच वैशाली दार उघडते तेव्हा आनंद वैशालीला सांगतो कोणी आले तर असं पटकन दार उघडायचं नाही. आधी कोण आहे असं विचारायचं, आणि बाहेरून उत्तर आल्यावरच दरवाजा उघडायचा. प्रात्यक्षिक म्हणून तो घराबाहेर जातो आणि दरवाजा वाजवतो तेव्हा वैशाली 'अ 'असं विचारते तेव्हा आनंद बाहेरूनच 'य ' असे उत्तर देतो, ती दरवाजा उघडते तसे आत येऊन आनंद तिला म्हणतो वा छान कोडवर्ड जमला आपला.
चाळीत शेजारीच डहाळे काकू राहत असतात. त्याही अधून मधून वैशालीकडे येऊन तिच्याशी गप्पा मारत असतात . तर त्यांचा मुलगा छबु कायम वैशालीकडे येत असतो . आणि या नात्या कारणाने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असतो. छबू पोलीस खात्यात पीएसआय बनण्यासाठी प्रयत्न करत असतो पण त्याची नजर मात्र वैशालीवर असते.
चाळीतल्या त्या घरात एक भाजीवाला भैय्या ही येत असतो. आणि शेजारी राहणारा सविस्तर नावाचा भोळा मुलगाही येत असतो. आनंदचा मात्र या सविस्तर नावाच्या मुलावर प्रचंड विश्वास असतो. त्यामुळे आनंद त्याला कुठे बाहेर जायचं असेल तर सविस्तरला वैशालीजवळ ठेवून त्याला छबु वर लक्ष ठेवण्यास सांगत असतो .
वैशाली आणि आनंद यांच्यातील दुरावा काहीसा कमी होऊ लागतो. अशाच एके दिवशी आनंद घरी नसताना छबु वैशालीशी लगट करण्याचा प्रयत्न करतो. इतक्यात सविस्तर तेथे येतो, झाला प्रकार तो आनंदच्या कानावर घालतो. आनंदही या घटनेमुळे अस्वस्थ होतो . आणि एक दिवस वैशालीशी बोलता बोलता या सगळ्या प्रकारात तुम्ही बायकाच जबाबदार असता. घडणाऱ्या घटना मूकपणे सहन करता यातूनच अशा लोकांची हिंमत वाढत जाते असे सांगून तुम्ही प्रतिकार करायला शिका असे बजावतो. झाल्या प्रकारानंतर वैशालीही छबुला काहीसे घाबरून राहू लागते. मात्र छबु आनंदशी झाल्या प्रकाराबद्दल बोलून माफी मागत असतो. मात्र आनंद मला या विषयावर काहीही बोलायचं नाही असे सांगून विषय संपवतो. तर वैशाली ही मनाने खंबीर होण्याचा आणि प्रतिकार साठी सज्ज राहण्याचा प्रयत्न करत असते. काही दिवसानंतर छबुराव पुन्हा एकदा वैशालीच्या घरात घुसतो आणि गर्लफ्रेंडचं कारण पुढे करतो . पुन्हा एकदा वैशालीशी लगट करून तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी छबुच्या घरचे देव-देव करण्यासाठी बाहेर गेलेले असतात आणि ते संध्याकाळ शिवाय घरी येणार नाहीत म्हटल्यावर तो या संधीचा गैरफायदा घेण्याच्या इराधाने वैशालीला मिठीत घेऊन गोड बोलायचा प्रयत्न करतो. आपल्याशिवाय इथे कोणीच नाही असे म्हणत रडणाऱ्या वैशालीला तो कवटाळण्याचा प्रयत्न करतो . मात्र वैशाली ओरडून त्याचा प्रतिकार करते. तिचा चिडलेला अवतार पाहून छबू तेथून काढता पाय घेतो आणि इतक्यात आनंद बाहेरून येतो . तेव्हा वैशाली खलबत्ता घेऊन त्यात शेंगदाणे रागाने कुटत असते, झाला प्रकार कळल्यावर आनंदलाही वैशालीने प्रतिकार केल्याचा विलक्षण आनंद होतो तिथेच नाटकाचा पडदा पडतो.
समाजात वाढत असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या विकृतीवर भाष्य करणारं 'अय ' हे नाटक नगरच्या नाट्यमल्हार प्रतिष्ठानने सादर केले. या दोन अंकी नाटकाची संहिता आणि दिग्दर्शन संदीप दंडवते यांचे होते. संदीप दंडवते यांनीच नाटकातील आनंद ही मध्यवर्ती भूमिका समर्थपणे पेलली ,बोलताना अडखळणारा आनंद त्यांनी त्यांच्या संवादफेकीतून आणि अभिनयातून चांगला रेखाटला. तर वैशालीची भूमिका आश्विनी अंचवले - कुलकर्णी यांनी त्यांच्या क सदार अभिनयाने, मुक्या स्त्रीची भूमिका असल्याने कंठातून निघणारे काही स्वर, हावभाव ,देहबोलीतून अत्यंत सशक्तपणे उभी केली . तर सविस्तरच्या भूमिकेत प्रदीप वाळके हा अतिशय भोळे पणाचे प्रश्न विचारून विनोदी संवादातून छाप सोडून गेला. तर छबुच्या भूमिकेत पवन पोटे यांनी आपल्या रगेल आणि रंगेल पणाची प्रतिमा छान वटवली, डहाळे काकूच्या भूमिकेत प्रिया तेलतुंबडे चांगल्या वाटल्या, तर वैशालीच्या वडिलांच्या भूमिकेला गणेश लिमकर यांनी न्याय दिला. भैय्याच्या भूमिकेत प्रतीक अंदुरे हा भाजीवाला भैय्या म्हणून चपखल वाटला. प्राजक्ता दंडवते आणि पौर्णिमा वाघ या दोघी त्यांच्या दोन प्रवेशात सहजगत्या वावरल्या .
नाटकातील चाळीच्या घराचे नेपथ्य प्रमोद जगताप यांनी हुबेहूब साकारले होते. तर समर्थ जोशी आणि अंतरा वाडेकर यांचे संगीत संयोजन संहितेला साजेस होत. गायनातून पवन नाईक यांनी समायोजित चीजा गायल्या. आबा सैदाने यांनी कथानकाला साजेशी रंगभूषा केली. तर गौरी देशपांडे यांनी साकारलेल्या वेशभूषा नाट्यसंहितेला पूरक होत्या एकंदरीत 'अय ' च्या प्रयोगाला प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली.
देवीप्रसाद अय्यंगार





0 Comments