नगर टुडे बुलेटीन 02-02-2021

नगर टुडे बुलेटीन 02-02-2021

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सरळ सेवा भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या 

एन.सी.टी.व्हीं.टी.  (दिल्ली बोर्ड प्रमाणपत्र) नसल्यामुळे 500 उमेदवारांना हजर करण्यास टाळाटाळ

ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांना  मागणीचे निवेदन : राहुरी येथे २१ फेब्रुवारीला संघटनेचे सेमी अधिवेशन होणार 

                                                                                                                                                                          वेब टीम  नगर :  महावितरण मधील उपकेंद्र सहाय्यकांची सरळ सेवा भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या एन.सी.टी.व्हीं.टी.  दिल्ली बोर्ड प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांची महावितरणमध्ये नियुक्ती रखडली आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्यावतीने राहुरी येथे राज्याचे ऊर्जामंत्री प्राजक्तदादा तनपुरेयांची भेट घेऊन मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेचे भाऊसाहेब भाकरे, आर.पी थोरात, ताराचंद कोल्हे, अनिल शिरसाठ, गुलाब डोंगरे, बाळासाहेब वामन, भास्करराव तरटे, दत्तात्रय थोरात, सोमनाथ शिंगटे, श्‍याम वाकळे, बापूसाहेब जगदाळे, अमोल सांगळे आदी उपस्थित होते.                             

विद्युत महावितरण आने तत्कालीन विद्युत मंडळांमध्ये जेव्हा जेव्हा सरळ सेवा भरती झाली तेव्हा एन.सी.टी.व्हीं.टी.  दिल्ली बोर्ड प्रमाणपत्र  नसतानाही प्रोविजनल प्रमाणपत्राच्या आधारे रुजू करून घेतले आहे त्या धर्तीवर आता ही पाचशे उमेदवारांना महावितरणमध्ये हजर करण्यास टाळाटाळ करत आहे ही बाब ऊर्जा राज्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले असता त्यांनी तत्काळ महावितरण कंपनीचे संचालक भालचंद्र खंडाईत यांना भ्रमणध्वनीद्वारे आदेशित केले की 1 फेब्रुवारी 10 वाजता सह्याद्री अतिथी गृहात संपूर्ण माहितीसह उपस्थित रहावे व या बैठकीमध्ये संघटनेला खात्री आहे उद्या चर्चेत मागील भरती मध्ये जसे प्रोविजन प्रमाणपत्र द्वारे उमेदवारांना रुजू करून घेतले तसेच आताही तसा निर्णय होईल व सध्या कोरोना या काळात व्यापक महाअधिवेशन न घेता सेमी अधिवेशन चे निमंत्रण ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना दिले असता त्यांनी ते स्वीकारले व 21 फेब्रुवारी रोजी राहुरी येथे अधिवेशनास उपस्थित राहण्यास सहमती दिली. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोरोना प्रादुर्भाव ओसरताच लोकशाही दिन उपक्रम पुन्हा सुरु

  जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या थेट संवादाने तक्रारदारांच्या चेहर्‍यावर उमटले समाधानाचे भाव

 वेब टीम नगर : कोरोना संसर्गाच्या काळात स्थगित करण्यात आलेला लोकशाही दिन आजपासून पूर्ववत सुरु झाला. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा हा उपक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी यावेळी लोकशाही दिनात आलेल्या तक्रारदारांशी संवाद साधत त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या. प्रशासकीय पातळीवर दाद मागितल्यानंतर त्याची तात्काळ दखल घेत कार्यवाही करण्याच्या सूचना प्रत्यक्ष जिल्हाधिकारी यांनीच दिल्याने तक्रारदारांच्या चेहर्‍यावरही समाधानाचे भाव उमटले.

तब्बल ९-१० महिन्यांनंतर आज प्रथमच लोकशाही दिन उपक्रम आयोजित करण्यात आला. यासाठी अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. सुरुवातीला यापूर्वी आलेल्या तक्रारींचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी घेतला. संबंधित विभागांनी त्यांच्याकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याचा जलदगतीने निपटारा करण्याचा आणि त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी लोकशाही दिनात तक्रार मांडण्यासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी त्यांचा विषय समजावून घेतला तसेच संबंधित विभागप्रमुखाला त्या तक्रार अर्जाची प्रत देत त्यावर तातडीने कार्यवाहीच्या सूचना दिल्या. तसेच, नागरिकांनीही लोकशाही दिनाचे बदललेले स्वरुप लक्षात घ्यावे. सुरुवातीला तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या तिसर्‍या सोमवारी होणार्‍या लोकशाही दिन उपक्रमात त्यांच्या समस्या-अडचणी मांडाव्यात. त्या समस्यांच्या अनुषंगाने तालुका पातळीवरील विभागांनी दिलेल्या उत्तराने समाधान झाले नसेल तर तेथील टोकन क्रमांकासह जिल्हास्तरीय लोकशाही दिनात समस्या मांडावी, असे सांगितले.

या लोकशाही दिनात न्यायप्रविष्ट विषयांसंदर्भातील तक्रारी दाखल करु नये. केवळ वैयक्तिक विषयांच्या अनुषंगाने कोणत्या विभागासंदर्भातील समस्या आहे, त्या अनुषंगाने अर्ज करावा, असे यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी  निचित यांनी सांगितले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

  मंगळवारी महफिले मुशायऱ्या चे आयोजन

वेब टीम नगर : कांग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त तन्जीम-ए-उर्दु अदब अहमदनगर व अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्यावतीने मंगळवार दि.  २ फेब्रुवारी २०२१ रोजी संध्याकाळी ७ वाजता सर्जेपुरा येथील रहमत सुलतान सभागृह येथे महफिली मुशायरा चे आयोजन करण्यात आले असल्याचे काँग्रसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष सय्यद खालील यांनी सांगितले.

या मशायरा मध्ये ज्येष्ठ कवी आणि साहित्यक आ.  लहू कानडे यांच्या उपस्थितीत व शहर जिल्हा अध्यक्ष अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे किरण भाऊ काळे यांच्या अध्यक्षतेत मुशायरा होणार असुन, अहमदनगर मधील सर्व स्थानिक कवी आपल्या रचना सादर करणार आहे. तरी या मुशायरा मध्ये गजल रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सैय्यद खलील यांनी केले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 बालहक्काबद्दल  जनजागृती आवश्यक

हनिफ शेख : बजाज क्राय प्रकल्पांतर्गत वंचित विकास संस्था आयोजित चर्चासत्रात वंचित घटकातील बालकांच्या प्रश्‍नावर विचारमंथन

वेब टीम नगर : बालहक्क व त्याबद्दल जनजागृती आवश्यक आहे. बालविवाह, बालगुन्हेगार, बालभिक्षुक, वंचित बालकांची आकडेवारी चिंताजनक आहे. या बालकांना मुख्य प्रवाहत आनण्याची सर्व समाजाची व शासनाची प्रमुख जबाबदारी आहे. यासाठी शासन नियंत्रण, संस्था व पालक एकत्र येणे गरजेचे असून, याशिवाय या बालकांचा विकास करता येणार नसल्याची भावना जिल्हा बालकल्याण समिती अध्यक्ष हनिफ शेख यांनी व्यक्त केली.

बजाज क्राय प्रकल्पांतर्गत वंचित विकास संस्थेच्या वतीने (खंडाळा) जिल्ह्यातील वंचित दुर्बल घटकांच्या अहवालावर घेण्यात आलेल्या चर्चासत्राचे उद्घाटन जिल्हा बालकल्याण समिती अध्यक्ष शेख यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. शहरातील टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार सुधीर लंके, गटशिक्षणाधिकारी वैभव देशमुख, उपशिक्षणाधिकारी चंद्रकांत सोनार, वंचित विकास संस्था खंडाळाचे राजेंद्र काळे, निलेश लोळगे, अ‍ॅड. अशोक अलकुटे, सर्जेराव शिरसाठ, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी खेडकर, बाळासाहेब साळवे आदी उपस्थित होते.            

या चर्चासत्रात वंचित दुर्बल घटकांच्या प्रश्‍नावर विचारमंथन करण्यात आले. दुर्बल घटकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. तसेच अल्पवयीन मुलांचे शिक्षण, संरक्षण, बालमजुरी, अल्पवयीन मुला-मुलींचा विवाह आदी अनेक प्रश्‍नाबाबत चर्चा करण्यात आली. वंचित विकास संस्था (खंडाळा) दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण व संरक्षणावर कार्य करते. या विद्यार्थ्यांना प्रवाहात आनण्यासाठी संस्थेचे कार्य सुरु असल्याचे राजेंद्र काळे यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पथ विक्रेता अधिनियमाची अंमलबजावणी व्हावी

कापड बाजार, मोची गल्ली व घास गल्लीतीला पथविक्रेत्यांनी घेतली जिल्हाधिकारींची भेट 'त्या 'संघटनेवर कारवाई करण्याची मागणी

 वेब टीम नगर : कोरोनाच्या संकटातून सावरणार्‍या शहरातील पथ विक्रेत्यांना आर्थिक व मानसिक त्रास देणार्‍या हिंदूराष्ट्र सेनेवर कारवाई व्हावी व महापालिकेकडून शहरातील कापड बाजार, मोची गल्ली व घास गल्ली या मुख्य बाजारपेठेत पथ विक्रेता अधिनियमाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीचे निवेदन कापड बाजार, मोची गल्ली व घास गल्ली पथ विक्रेते संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी तथा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना देण्यात आले. पथ विक्रेत्यांनी सदर प्रश्‍न मांडला असता जिल्हाधिकारी भोसले यांनी या संदर्भात महापालिकेत बैठक घेण्यात येणार असून, पथ विक्रेत्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी साहेबान जहागीरदार, रमेश ठाकूर, अकलाख शेख, इरफान मेमन, जुनेद शेख, नवेद शेख, यासीन पवार, इम्रान शेख, फैरोज शेख, नरेश नारंग, जाकीर शिकलकर आदींसह हॉकर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजार, मोची गल्ली व घास गल्ली या भागात अनेक वर्षापासून पिढ्यानपिढ्या अनेक पथविक्रेते विविध वस्तूंची विक्री करुन आपला उदरनिर्वाह करीत आहे. कोरोनाच्या टाळेबंदीत सदर पथविक्रेत्यांना मोठा त्रास झाला. सर्वांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. शासनाकडून पथविक्रेत्यांना कोणत्याही प्रकारची मदत जाहीर करण्यात आलेली नाही. आर्थिक संकटातून सावरण्यासाठी व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पथविक्रेत्यांनी प्रमाणिकपणे आपला व्यवसाय पुन्हा सुरु केला आहे. मात्र हिंदूराष्ट्र सेनेसारखे जातीयवादी प्रवृत्तीच्या संघटना वारंवार या भागातील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करुन शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत आहे. या भागातील स्थानिक नागरिक, व्यापारी व महिलांना कोणताही त्रास नसताना आर्थिक हित साधण्यासाठी हीच संघटना या भागातील अतिक्रमण काढण्याचा मुद्दा वारंवार उपस्थित करीत आहे. या संघटनेतील अनेकांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असून, या संघटनेच्या काही पदाधिकार्‍यांना तडीपार करण्यात आले आहे. तर काहींवर खंडणी वसूल करण्याचे गुन्हे दाखल आहेत. सर्वसामान्य हॉकर्स बांधवांना मानसिक व आर्थिक त्रास देण्याच्या उद्दीष्टाने सदर संघटनेचे कार्यकर्ते पत्रकबाजी करीत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. तर शहरात इतर भागात मोठ्या धेंड्यांची पक्की बांधकामांचे अतिक्रमण असताना या संघटनेला वारंवार गोर-गरीब अल्पसंख्यांक समाजाचे अतिक्रमण दिसत असल्याचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला आहे.

केंद्र शासनाने पथ विक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) अधिनियम १ मे २०१४ रोजी संपूर्ण देशात लागू केला. सदर कायद्यान्वये विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास संरक्षण दिलेले आहे. हा कायदा लागू झाल्यापासून सहा महिन्याच्या आत रस्त्यावरील पथ विक्रेत्यांचे सर्व्हेक्षण करुन हॉकर्स व नो हॉकर्स झोन तयार करुन पथ विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी परवाना देण्याची कार्यवाही करण्याचे सुचित केले आहे. परंतु अहमदनगर महापालिकेकडून सदर अधिनियमाची कोणत्याही प्रकारे अंमलबजावणी झालेली नाही. हॉकर्स संघटनेचा २०१० पासून महापाकिकेकडे पाठपुरावा करीत आहे. महापालिकेने याबाबत सर्वेक्षण करुन तातडीने शहरातील कापड बाजार, मोची गल्ली व घास गल्ली या मुख्य बाजारपेठेत पथ विक्रेता अधिनियमाची अंमलबजावणी करुन हॉकर्सना व्यवसाय करण्यासाठी संरक्षण देण्याची मागणी कापड बाजार, मोची गल्ली व घास गल्ली पथ विक्रेते संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्पर्धेच्या युगात उतरण्यासाठी विद्यार्थ्यांनी कला, क्रीडासह चौफेर ज्ञान घेऊन सज्ज व्हावे 

क्रीडा अधिकारी दिपाली बोडखे : मार्कंडेय शाळेत विद्यार्थ्यांच्या कला व क्रीडा दालनाचे उद्घाटन

वेब टीम नगर : पद्मशाली विदया प्रसारक मंडळाच्या गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विदयालय तसेच प्रा.बत्तीन पोट्यान्ना प्राथमिक विद्यालयाच्या संयुक्तपणे शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी कला व क्रीडा दालनाचे उद्घाटन करण्यात आले.

क्रीडा अधिकारी दिपाली बोडखे-मंगलारम यांच्या हस्ते या कला व क्रीडा दालनाचे शुभारंभ झाले. तसेच संस्थेचे नवनिर्वाचित विश्‍वस्त राजेंद्र म्याना आणि जितेंद्र वल्लाकटी यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ विश्‍वस्त शरद क्यादर,अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम, उपाध्यक्ष विलास पेद्राम, सचिव डॉ.रत्ना बल्लाळ, खजिनदार जयंत रंगा, क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वज्रेश्‍वरी नोमुल, उमरी (जि. नांदेड) येथील नगरसेवक गोणेवार, वैशाली नराल, विद्यालयाचे मुख्याध्यापक दिपक रामदिन, उपमुख्याध्यापक पांडुरंग गोणे, शिक्षक प्रतीनिधी प्रा.भानुदास बेरड, जेष्ठ अध्यापिका निता गायकवाड, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीनिवास मुत्त्याल, शिक्षक प्रतीनिधी परदेशी मॅडम आदींसह अध्यापक-प्रध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

क्रीडा अधिकारी दिपाली बोडखे-मंगलारम म्हणाल्या की, शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा क्षेत्राकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. शालेय जीवनात स्वत:मधील क्षमता व आवड ओळखून त्या दिशेने वाटचाल करण्याची गरज आहे. कला, क्रीडा क्षेत्रातही उत्तम करिअर घडविता येतो. पालकांनी विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता स्पर्धेच्या युगात उतरण्यासाठी कला, क्रीडासह चौफेर ज्ञान घेऊन सज्ज होण्याचे आवाहन त्यांनी केले. कला शिक्षक नंदकुमार यन्नम व आशा दोमल यांनी कला व क्रीडा दालन उभारण्यासाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. ज्युनि.कॉलेजचे प्रा.अनिल आचार्य यांनी शालेय स्टेजच्या रंगकामासाठी आर्थिक मदत दिली. पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापक दिपक रामदिन यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल विष्णु रंगा यांनी केले. आभार प्रा. बत्तीन पोटयान्ना विदयालयाचे मुख्याध्यापक श्रीनिवास मुत्याल यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पतसंस्थांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा 

 आ.सुधीर तांबे यांचे आश्वासन : नाशिक विभागीय पतसंस्थांच्या सहकार संवाद कार्यशाळेस मोठा प्रतिसाद

वेब टीम नगर :  पतसंस्थांमुळेच राज्याच्या अर्थकारणाला गती मिळत आहे. राज्यातील सहकार चळवळ सावकारी नष्ट करण्याचे काम करत आहे. पतसंस्था फेडरेशनचे काका कोयटे व सर्व पदाधिकारी खुप तळमळीने काम करत प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करत आहे. पतसंस्थांचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी सरकारने चांगली यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे. नियामक मंडळ आणणे हाही निर्णय सरकारने चुकीचा घेतला आहे. कर्ज वसुलीच्या बाबतीतही कायद्यात सुधारणे होणे अवश्यक आहे. ठेवींना विमा संरक्षण नसल्याने नगरमधील स्थैर्यनिधी सारख्या योजना सर्व जिल्ह्यात राबवल्या गेल्या पाहिजेत. पतसंस्था फेडरेशनने मांडलेल्या सर्व मागण्या अत्यंत रास्त आहेत. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन करणे योग्य आहे. मात्र राज्यातील पतसंस्थांना आंदोलन करण्याची वेळ येत कामा नये यासाठी मी स्वतः महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कडे सर्व समस्यांचा पाढा वाचणार आहे. एव्हढेच नव्हेतर सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मंत्री थोरातांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या मुख्यामंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक घेवून मार्ग काढू. महाआघाडीचे सरकार पतसंस्थांचे सर्व प्रश्न निश्चित सोडवेल, असे आश्वासन आ. सुधीर तांबे यांनी दिले.

          राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशन व नगर जिल्हा पतसंस्था स्थैर्यनिधी सहकारी संघाच्या वतीने नाशिक विभागातील पतसंस्थांच्या सहकर संवाद कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी आ. सुधीर तांबे बोलत होते. प्रथम सत्रात कार्यशाळेचे उद्घाटन विभागीय सहनिबंधक राजेंद्र शहा यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा, पतसंस्था स्थैर्यनिधी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे, पतसंस्था फेडरेशचे महासचिव शांतीलाल सिंगी, कर्याध्यक्ष राजुदास जाधव, उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव, खजिनदार दादाराव तुपकर आदींसह नगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील पतसंस्थांचे सुमारे ७०० प्रतिनिधी उपस्थित होते.

          यावेळी काका कोयटे म्हणाले, राज्यातील सहकारी पतसंस्थांमधून आता लवकरच स्वतःचे सहकार क्रेडीट कार्ड, मोबाईल क्यूआर कोड मार्फत व्यवहार अशा अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त सेवा ग्राहकांसाठी सुरु करणार आहे. मात्र राज्य सरकार कडून आम्हाला सहकार्य मिळत नाहीये. बँकांच्या ठेवींना विमा संरक्षण आहे, मग पतसंस्थांच्या ठेवींना का नाही ? पतसंस्थांवर नियामक मंडळ लादून अंशदान वसूल करण्याचा जाचक निर्णय सरकारने घेतला आहे. त्यास आमचा तीव्र विरोध आहे. पतसंस्थांच्या अनेक मागण्यांकडे वर्षानुवर्ष प्रत्तेक सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता शांत न बसता सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही बेमुदत आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या धर्तीवर राज्यातील सर्व पतसंस्था येत्या एप्रिल महिन्यात मुंबईत बेमुदत मोठे आंदोलन करणार आहे. राज्यातील हजारो पतसंस्थांचे लाखो पदाधिकारी व कर्मचारी मंत्र्यालायावर धडक देणार आहे. आ.सुधीर तांबे हे पतसंस्था चळवळीतील कार्यकर्ते आहेत. त्यांनी आमच्या समस्या सरकार पर्यंत पोहचाव्यात.

          यावेळी सहनिबंधक राजेंद्र शहा यांनी बहुमोल मार्गदर्शन करत सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. फेडरेशन कार्याध्यक्ष राजुदास जाधव यांची यवतमाळ जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल तसेच उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव यांची बुलढाणा जिल्हा भाजपच्या सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा यांनी प्रास्ताविकात आंदोलनात्मक भूमिका मांडली.

          पतसंस्था फेडरेशनच्या व्यवस्थापिका सुरेखा लवांडे यांनी सुत्रसंचलन केले, स्थैर्यनिधी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी आभार मानले. यावेळी फेडरेशनसंचालक गोविंद अग्रवाल, अॅड. अंजली पाटील, नारायणराव वाजे, नगर जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष साबाजी गायकवाड, नंदुरबार फेडरेशनचे अध्यक्ष डॉ.कांतीलाल टाटीया, धुळे फेडरेशनचे अध्यक्ष अरुण महाले आदी उपस्थित होते.  संगमनेर तालुका फेडरेशनचे अध्यक्ष बापूसाहेब टाक व संग्राम पतसंस्थेचे अध्यक्ष राणीप्रसाद मुंदडा यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

आपणच आपली पाठ थोवावून घेवू : काका कोयेटे

करोना लॉकडाऊन काळात राज्यातील पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांनी मिनी एटीएमच्या माध्यमातून सर्वसामन्य ग्राहकांना घरपोच आर्थिक सेवा दिली. एकाही राष्ट्रीयकृत किंवा सहकारी बँकेने असे काम केले नाही. मात्र पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांची कोणीच दाखल घेत पाठ थोपटली नाही. म्हणून आपणच आपली आपली पाठ थोपवून घेवूया, असे म्हणत सर्वाना आपली पाठ थोपवण्यास काका कोयटे यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

केंद्राच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ बुथस्तरावरील नागरिकांपर्यंत पोहोचावा 

मनोज पांगरकर : भाजपच्या भिंगार मंडलात बुथ संपर्क अभियानात प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर 

वेब टीम नगर : सक्रिय कार्यकर्त्यांचे प्रचंड असे जाळे भारतीय जनता पक्षाचे वैभव आहे. जनसामान्यांच्या अडीअडचणीत भाजपचे कार्यकर्ते धावून जात असतात. बूथ पातळीवर सूक्ष्म नियोजन करताना प्रत्येकाने घराघरात भाजपचा राष्ट्रवाद पोहचेल असं काम करणे अपेक्षित आहे. केंद्राच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ बुथस्तरावरील नागरिकांपर्यंत पोहोचावा. संघटनशक्तीच्या जोरावरच सशक्त, आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास भाजपचे नगर जिल्हा प्रभारी मनोज पांगरकर यांनी व्यक्त केला.

भाजपच्या बुथ संपर्क अभियानांतर्गत भिंगार मंडलाचे  कार्यकर्ता प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना पांगरकर बोलत होते. यावेळी  शहर जिल्हाअध्यक्ष महेंद्र ऊर्फ भैय्या गंधे, संघटन सरचिटणीस ॲड. विवेक नाईक, युवाअध्यक्ष महेश तवले, सरचिटणीस आशिष आनेचा,शहरजिल्हा उपाध्यक्ष शिवाजी  दहिहंडे, सरचिटणीस  महेश नामदे,तुषार पोटे, शहर कार्यकारिणी सदस्य  लक्ष्मीकांतजी तिवारी,

 भिंगार मंडल अध्यक्ष वसंत राठोड, नगरसेविका शुभांगी  साठे, ज्येष्ठ कार्यकर्ते दामोदर माखीजा, बाळासाहेब पतके

युवा अध्यक्ष किशोर कटोरे, महिला आघाडी अध्यक्षा ज्योत्स्ना  मुंगी, वैशाली कटोरे, उपाध्यक्ष संतोष हजारे, राजु दहिहंडे, सुरेश तनपुरे,  गणेश साठे, सरचिटणीस  ब्रिजेश लाड, सुरज रवे, खजिनदार   आनंद बोथरा,गौतम कांबळे,कवित रासने, सौरभ रासने,  कमलेश धर्माधिकारी, स्वप्नील शेलार,सचिन फिरोदिया, शिवकुमार वाघुंबरे, विनायक फल्ले, खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक संदीप हाके, प्रितम तागडकर   आदी उपस्थित होते.

महेंद्र गंधे म्हणाले की, करोना काळात नगर शहरासह भिंगार मंडलात भाजपने लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी योगदान दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय धीरोदात्तपणे देशाला करोना महामारीत योग्य दिशा दिली. बूथ संपर्क अभियानातून केंद्राचं हेच काम आपल्याला घरोघरी पोहचवायचे आहे. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे कृषी कायदे उत्तम असताना विरोधक भ्रम निर्माण करायचा प्रयत्न करीत आहे. हे थांबविण्यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने कायदे समजून घेत लोकांमध्ये जागृती केली पाहिजे. भिंगार परिसरात प्रधानमंत्री पथविक्रेता स्वनिधी योजनेच्या लाभापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न केले पाहिजे. भिंगार मंडलाला संपूर्ण ताकद देण्याचं काम पक्षाकडून होईल अशी ग्वाही त्यांनी दिली. 

प्रास्ताविकात वसंत राठोड यांनी सांगितले की, भिंगार मध्ये कोरोना काळात किराणा माल वाटप, नागरिकांना हाॅस्पिटलची मदत,अर्सेनिक गोळ्याचे वाटप, पी. एम. केअर फंड गोळा करणे तसेच कोरोना योद्ध्यांचा सन्मान, पोलिस कर्मचारी, बॅंक कर्मचारी, स्वच्छता कामगारांचा सत्कार असे उपक्रम यशस्वीपणे राबवून जनतेशी संवाद साधला.

 प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहात फळवाटप, वृक्षारोपण करण्यात आले.तसेच आत्मनिर्भर भारत अंतर्गत पथविक्रेता स्वनिधी योजनेचा शुभारंभ करून सुमारे 500 नागरिकांना लाभ मिळवून दिला. त्यात एलओआरचे वाटप खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचे हस्ते करण्यात आले. 

प्रायव्हेट होम फायनान्स कंपन्यांकडुन पीएमएवाय स्कीमचे अनुदान मिळत नसल्याच्या तक्रारी आल्यास त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले,दुधदरवाढ आंदोलन, मंदिर उघडण्यासाठी आंदोलन, अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन कार्यक्रमात संघ कार्यकर्ते याबरोबर फिरून चांगला निधी गोळा केला.

याअगोदर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधान मंत्री मुद्रा योजना,आयुष्य माननीय भारत अशा अनेक योजना राबवल्या.

कॅन्टोनमेट प्रशासनाने घेतलेल्या स्वच्छ पंधरवडा कार्यक्रमात कापडी पिशव्या वाटप,प्लास्टिकबंदीसाठी प्रबोधनात्मक स्टीकर लावले.

सूत्र संचालन महेंद्र जाधव यांनी केले. आभार किशोर कटोरे यांनी मानले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आप के द्वार हरिद्वार- गायत्री परिवाराचे देशभर अभियान

 वेब टीम नगर : यंदाच्या कुंभमेळ्याचे पर्व हरिद्वार उत्तराखंड येथे सुरू असून पहिले शाहीस्नान येत्या ११ मार्च महाशिवरात्रीला आहे.  त्यानंतर १२ ,१४ व २७ एप्रिल असे एकूण चार शाहीस्नान असून ते सूर्योदयापूर्वी हरिद्वारच्या गंगानदीत होणार आहे.  मात्र यापूर्वी कुंभमेळ्याला जशी लाखोंची  उपस्थिती होती,तसं यावेळी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर असणार नाही.  त्यामुळे देशातील भाविकांना घरच्याघरी या चारही शाहीस्नानाचा मुहूर्त साधता यावा म्हणून हरिद्वारच्या गंगानदीचे  पवित्र जल घरोघरी छोट्या  बाटलीतून देण्याचे अभियान अखिल विश्व गायत्री परिवाराचे सदस्य राबविणार आहेत.

हर हर गंगे घर घर  गंगे अशा घोषणा देत गायत्री परिवाराचे अठरा रथ सर्वत्र जाऊन पवित्र गंगाजल भाविकांना उपलब्ध करून देणार आहेत जे कधीच कुंभ मेळ्याला  गेलेच नाहीत आणि यंदाही जाण्यासाठी अडचण आहे, अशा लोकांना  दीनदुबळ्या भाविकांनाही याचा खरा लाभ होणार आहे.  कोरोनाचे सावट असल्याने कुंभमेळ्याला जाणाऱ्या लाखो भाविकांची गर्दी यंदा असणार नाही.  मात्र, त्याही भाविकांना घरच्या घरी गंगाजल  उपलब्ध करून देता येईल.  या अभियानामुळे देशातील करोडो भाविकांना शाही स्नानाचा मूहूर्त घरीच साधता येईल.

अभियानाच्या नियोजनासाठी देशात विविध ठिकाणी विशेष सभा बैठका होत असून २६ जानेवारी रोजी वाघोली जिल्हा पुणे येथील गायत्री परिवार केंद्रावर विभागीय बैठक आयोजित केली होती.  त्यावेळी ही माहिती देण्यात आली.  केंद्राच्या इमारतीवर राष्ट्रध्वज फडकावून  सलामी देण्यात आली.  राष्ट्रगीत म्हणण्यात आले, असा प्रजासत्ताक दिन  मी प्रथमच साजरा  होताना पाहिला. राष्ट्रपुरुषांच्या  प्रतिमांना यावेळी पुष्पमाला अर्पण करण्यात आल्या. यानंतर सभेचे कामकाज सुरू झाले यावेळी  देवता प्रसाद शर्मा ,योगीराज बल्की, अंगद सहानी, परमेश्वर साहू ,कृष्णकुमार महाजन आदी हरिद्वारच्या प्रतिनिधींसह  पुणे विभागातील सदस्य उपस्थित होते . नगरहून जयंत पाटील, विश्वनाथ गाडळकर, श्री शर्मा ,गणेश रिसे, काशिनाथ मोडे या बैठकीला उपस्थित होते.

शताब्दी वर्ष

गायत्री परिवाराला यंदा शंभर वर्षे पूर्ण झाल्याने २०२१ हे शताब्दी महोत्सवाचे वर्ष आहे . यंदाचा कुंभमेळा हरिद्वार येथे ११व्या वर्षी आला आहे . गायत्री परिवारासाठी हा दुग्धशर्करा योग आहे 'मन चंगा तो काठवत मे गंगा' या संतवाणीची  प्रचिती अभियानाच्या निमित्ताने संबंधितांना होईल जल हे मूळ पवित्र असते ते अस्वच्छ होते जल्  स्वच्छ ठेवणे त्याचे पावित्र्य राखणे आपल्या हाती आहे.  तसा  संदेश ह्या निमित्ताने देता येईल अभियानात सर्व भाविकांनी सहभागी होऊन गंगाजलाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

अश्वमेध यज्ञ

जानेवारी २०२१ मध्ये अश्वमेध यज्ञ होणार होते पण आता जानेवारी २०२२ मध्ये हा उपक्रम मुंबईत होणार आहे.  गेल्या वर्षापासून गायत्रीमंत्र लेखनाचे अभियान सदस्य घरोघरी करीत आहेत, त्या लेखन वह्याचे संकलन होणार आहे.

पौष  पौर्णिमा नऊकुंडी यज्ञ

केडगाव शिवाजीनगर येथील योगेश्वरी देवी मंदिरासमोर नऊकुंडी गायत्री यज्ञ करून पौष  पौर्णिमा साजरी करण्यात आली.  २७ जोडपे हवनासाठी बसले होते तर वीस -पंचवीस जणांनी आहुती देत  या उपक्रमात सहभाग घेतला.  पिवळसर भगवी वस्त्र परिधान करून गायत्री सदस्य यावेळी उपस्थित होते.  कोरोनाचे  संकट जगातून नाहीसे व्हावे विविध समस्यांचे निराकरण व्हावे, प्रत्येकाच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली . यज्ञामुळे प्रदूषण मुक्त वातावरण आणि चांगले आरोग्य यामागे असल्याचे  श्री चंद्रकांत तात्या देशमुख (भिंगारकर) यांनी व्यक्त करतांना सांगितले.  चांगदेव थोरात, पंकज गांधीनी आदिनी यावेळी परिश्रम घेतले यावेळी अखण्ड ज्योति मासिकासह गुरुदेव श्री पंडित श्रीराम शर्मा यांच्या छोट्या पुस्तिकांचे  मोफत वाटप करण्यात आले.

स्वातंत्र्यसेनानी संस्थापक

गायत्री परिवाराची स्थापना गुरुदेव वेदमूर्ती तपोनिष्ठ पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी केली ते स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होते व धर्माचे पालन करत समाजात समानता निर्माण करण्याचा प्रयत्न गुरुदेव शर्मा यांनी केला त्यांचे विपुल साहित्य आणि ग्रंथसंपदा देशभराच्या गायत्री शाखेत वाचकांसाठी उपलब्ध आहे . हम सुधरेंगे तो युग  सुधरेगा असं ते म्हणत प्रत्येक व्यक्ती स्वतःहून चांगलं वागू लागला तर जग  सुधारण्यास वेळ लागणार नाही आणि देशाच्या सीमा आपल्याला तालुका जिल्हा राज्यांच्या  सीमे सारख्या होतील असा स्नेह निर्माण होईल, यासाठी गायत्री परिवाराचे कार्य जगभरात विखुरलेले आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

सहजयोग ध्यान करीत असल्यानेच सौम्याला चित्र काढता आले


मा.नगरसेविका वीणा बोज्जा : सौम्या जाधव हिचा सहजयोग परिवाराच्या वतीने सत्कार

वेब टीम नगर : कलारंग अकॅडमी च्या तीन दिवसीय रांगोळी कार्यशाळेत चित्रकार सुजाता औटी पायमोडे यांच्या मार्गदर्शना खाली. प. पु.श्री माताजी निर्मला देवी यांचे आतीवास्तववादी व्यक्तीचित्र  रेखाटणारी सहजयोगी सौम्या जाधव हिचा सत्कार सहजयोग परिवाराच्या वतीने मा.नगरसेविका वीणाताई बोज्जा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहजयोगी अंबादास येन्नम, गणेश भुजबळ, कुंडलिक ढाकणे, श्रीनिवास बोज्जा, सुनंदा येन्नम, डॉ. अश्विनी जाधव व प्रशिक्षक सुजाता पायमोडे उपस्थित होते.

     सौम्या जाधव ही डॉ. सचिन जाधव यांची कन्या असून सुरभी हॉस्पिटल चे संचालक डॉ. दीपक जाधव यांची पुतणी आहे. सौम्या हि अवघ्या १० वर्षांची सर्वात लहान कलाकार असून  तिची ही पहिलीच रांगोळी आहे. मी जरी मार्गदर्शन केले असले तरी त्यासाठीची ताकद तिला श्री माताजीनी दिली असे प्रशिक्षक सुजाता पायमोडे म्हणाल्या. सौम्या ही ५ वी इयत्तेत कर्नल परब विद्यालया मध्ये शिक्षण घेत असून  तीने ३ दिवस एकूण  ३०तास मन एकाग्र करून हे चित्र काढले असून असा चमत्कार करणं तसं कठीणच आहे. तिला सहजयोग परिवाराकडून संपूर्ण भारत भरातून तिचे कौतुक होत आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments