गौतम निधीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचा शपथविधी उत्साहात
राजेंद्र दर्डा यांच्या अध्यक्षस्थानी, तर जैन कॉन्फरन्स चे बाबूशेठ बोरा यांच्या प्रेरणादायी उपस्थितीत गौतम निधीचा सोहळा उजळला
पुणे : जैन समाजातील एकता, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा उत्कृष्ट संदेश देणारा गौतम निधीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा पुण्यातील वर्धमान सांस्कृतिक केंद्र येथे प. पू. उपाध्याय प्रवीणऋषीजी म.सा. यांच्या मंगल सान्निध्यात अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्यात राष्ट्रीय अध्यक्षपदी पंकज फुलफगर, महामंत्रीपदी नितीन संकलेचा, महाराष्ट्र राज्य प्रमुखपदी संतोष ललवाणी, राज्य महामंत्रीपदी पवन भंडारी, पुणे जिल्हा प्रमुखपदी सुरेश गांधी तर जिल्हा महामंत्रीपदी जितेंद्र मुनोत यांची नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री राजेंद्र दर्डा होते, तर अहिल्यानगरचे समाजसेवक व अखिल भारतीय श्वेतांबर स्थानकवासी जैन कांफ्रेंस चे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक बाबूशेठ बोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. कार्यक्रमास राष्ट्रीय निमंत्रक सुनिल नहार, राष्ट्रीय संयोजक अनिल नहार, चातुर्मास समितीच्या स्वागत अध्यक्षा राजश्री पारख तसेच पुणे शहर जितो प्रमुख इंद्रकुमार छाजेड यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
या प्रसंगी आपल्या आशीर्वचनांत प. पू. प्रवीणऋषीजी म.सा. म्हणाले, “गौतम निधीची प्रगती दिवसेंदिवस वाढत आहे. नवीन अध्यक्ष पंकज फुलफगर यांच्या नेतृत्वाखाली संस्था समाजोपयोगी कार्यात नवे आदर्श निर्माण करेल.”
आपल्या मनोगतात राजेंद्र बाबू दर्डा म्हणाले, “गौतम निधीच्या माध्यमातून सेवा, शिक्षण आणि विकास या तिन्ही क्षेत्रांत जैन समाजाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. समाज uplift करण्याची ताकद या संस्थेमध्ये आहे. अतिशय योग्य नेतृत्व पंकज फुलफगर यांच्या रूपाने संस्थेला लाभले आहे.”
या वेळी अशोक बाबूशेठ बोरा यांनी गौतम निधीच्या संकल्पनेविषयी मनोगत व्यक्त करताना सांगितले की —“गौतम निधी कलश ही अत्यंत प्रेरणादायी कल्पना प. पू. प्रवीणऋषीजी म.सा. यांच्या संकल्पनेतून साकारली गेली आहे. प्रत्येक जैन परिवाराने आपल्या घरात हा कलश ठेवावा आणि दररोज काही ना काही अनुदान भावपूर्वक जमा करावे, हाच यामागील हेतू आहे. महिन्याच्या शेवटी या सर्व घरांतील कलशांमधून जमा झालेली ही रक्कम एकत्र केली जाते आणि ती शैक्षणिक, धार्मिक तसेच सामाजिक कार्यासाठी उपयोगात आणली जाते. हे केवळ दान नाही, तर समाजाच्या उत्थानासाठी प्रत्येक घराचा थेंबाथेंब एकत्र येऊन तयार होणारा महासागर आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “गौतम निधी हे केवळ आर्थिक उपक्रम नसून, ते विश्वास, श्रद्धा आणि एकतेचे प्रतीक आहे. प्रत्येक समाजबांधवाने या सेवायज्ञात तन, मन आणि धनाने सहभागी व्हावे, हीच खरी गुरूदेवांच्या शिकवणीची पूर्ती ठरेल.”
या शपथविधी सोहळ्याने जैन समाजात एकतेचा, सेवाभावाचा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रकाश कोचेटा यांनी केले, तर आभार प्रदर्शन महामंत्री नितीन संकलेचा यांनी केले.
संपूर्ण देशभरातून आलेल्या एक हजाराहून अधिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत भावपूर्ण आणि यशस्वीपणे संपन्न झाला.



0 Comments