रेल्वे अधिकारी लाच घेताना जाळ्यात; सीबीआयची कारवाई

रेल्वे अधिकारी लाच घेताना जाळ्यात; सीबीआयची कारवाई

वेब टीम नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला सीबीआयच्या पथकाने सोमवारी १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई मध्य रेल्वेच्या विभागीय कार्यालयात पहिल्या माळ्यावर करण्यात आली. या कारवाईमुळे रेल्वे वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

अखिलेश चौबे असे या अधिकाऱ्याचे नाव असून, ते वरिष्ठ मंडळ यांत्रिक अभियंता या पदावर कार्यरत आहेत. रेल्वेतर्फे दुरांतोची स्वच्छता, गाडीच्या शौचालयांत पाणी भरण्याचे कंत्राट देण्यात आले होते. त्या कामाची देखभाल व जबाबदारी चौबे यांच्याकडे होती. हे काम ज्या कंत्राटदाराला देण्यात आले होते त्याचे बिल पारित झाले नव्हते. हे बिल मंजूर करण्याचे अधिकार चौबे यांच्याकडे होते. चौबे यांनी या कंत्राटदाराला बिल मंजूर करण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केली. त्याशिवाय बिल मंजूर होणार नव्हते. अखेर, त्रस्त झालेल्या कंत्राटदाराने याबाबत थेट सीबीआयकडे तक्रार केली. मिळालेल्या तक्रारीची सीबीआयने खात्री करून घेतली व सोमवारी डीआरएम कार्यालयात सापळा रचला. कंत्राटदाराकडून १० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या सीबीआयच्या पथकाने चौबे यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments