विरोधीपक्ष आक्रमक;भाजपाने प्रतिसभागृह चालविले
वेब टीम मुंबई : यंदाच्या पावसाळी अधिवेशनात अपेक्षेप्रमाणे राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाचं आक्रमक धोरण पाहायला मिळालं. सोमवारी पहिल्या दिवशी विधानसभेत झालेल्या राड्यानंतर आज दुसऱ्या दिवशी भाजपाकडून विधानभवनाबाहेर प्रतिसभागृह चालवण्यात आलं. भाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाचा यावेळी निषेध करत भाजपाच्या अनेक सदस्यांनी आक्रमक भाषणं देखील केली. मात्र, भाजपाच्या या पवित्र्यावर काँग्रेसकडून परखड टीका करण्यात आली आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी यासंदर्भात ट्वीट करत भाजपावर निशाणा साधला आहे. “देवेंद्र फडणवीसांचं डोळा मारणंच सारंकाही सांगून जातं”, असा खोचक टोला देखील सचिन सावंत यांनी या ट्वीटमध्ये मारला आहे.
सचिन सावंत यांनी भाजपाच्या प्रतिसभागृहाच्या प्रकारावर आणि त्यानंतरच्या आक्रमक पवित्र्यावर, तसेच सोमवारच्या राड्यावरून टीका केली आहे. “भाजपाचे विरोधीपक्ष म्हणून वर्तन अत्यंत हिडीस आहे. काल खुलेआम धमक्या, शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. आज विधिमंडळाच्या आवारात माईक आणि स्पीकरचा वापर ते कसा करू शकतात? संविधानिक जबाबदारी व लोकशाही मूल्यांचा हा पूर्णपणे अनादर आहे. देवेंद्र फडणवीसजींचं डोळा मारणं सर्व काही सांगून जातं!” असं सचिन सावंत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
…आणि फडणवीसांनी मारला डोळा!
आपल्या ट्वीटसोबत सचिन सावंत यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीवरील व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीस डोळा मारताना दिसत आहेत. प्रतिसभागृहाचा प्रकार प्रशासनाने मोडीत काढल्यानंतर माध्यमांशी बोलताना आक्रमक झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर शेवटी बाजूला उभ्या असलेल्या व्यक्तीकडे बघून डोळा मारल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. त्यावरून सचिन सावंत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
भाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून आक्रमक होत भाजपानं आज विधानभवनाच्या बाहेर प्रतिसभागृह भरवलं. या मुद्द्यावर सभागृहात तीव्र आक्षेप घेण्यात आला. विधानभवन परिसरात माईक, स्पीकर वापण्यावर आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर तालिका अधिकारी भास्कर जाधव यांनी माईक आणि स्पीकर काढून घेण्याचे, तसेच भाजपाच्या या प्रतिसभागृहाचं लाईव्ह टेलिकास्ट बंद करण्याचे आदेश दिले. या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या भाजपाच्या आमदारांनी तिथेच घोषणाबाजी करायला सुरुवात केली.
0 Comments