नगर बुलेटीन

 नगर बुलेटीन 

कार्यकर्त्यांनी गाव पातळीवरील सर्व समावेषक विषय हाताळले पाहिजेत 

 प्रा. किसन चव्हाण.: वंचित च्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे प्रदान

वेब टीम नगर : पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पदाची हवा डोक्यात शिरू न देता आपले पाय जमिनीवर ठेवून गाव पातळीवर समाज हिताचे कामे केली पाहिजेत असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्रा. किसन चव्हाण यांनी केले. 

वंचित बहुजन आघाडीच्या अहमदनगर दक्षिण मधील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान व सत्कारनिमित्त आयोजित बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या दिशाताई शेख यांच्या अध्यक्षतेखाली नगर येथे झालेल्या या बैठकीत ते बोलत होते. 

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे, जिल्हा महासचिव योगेश साठे, जेष्ठ सल्लागार प्रा. जीवन पारधे यांच्यासह नवनियुक्त पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना किसन चव्हाण म्हणाले की, कार्यकर्त्यांनी गाव व तालुका पातळीवर ग्राम पंचायत, पंचायत समिती, तहसिल कार्यालय, पोलिस स्टेशन, कृषी विभाग, वीज मंडळ, अशा कार्यालयात सर्व सामान्य माणसांची रखडलेली कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा. गाव निहाय, दलित, मुस्लिम, आदिवासी, भटके विमुक्त, मायक्रो ओबीसी, त्याच बरोबर गरीब मराठा अशा सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते जोडावेत. गाव पातळीवर बूथ कमिटी स्थापन कराव्यात. निवेदने, धरणे, आंदोलन, उपोषणे, मोर्चा, रस्ता रोको अशा लोकशाही मार्गाने सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी समाज माध्यमांचा योग्य वापर करून प्रश्न सोडवावेत. सर्व समावेश सार्वजनिक विषय हाताळावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

प्रदेश प्रवक्त्या दिशा ताई शेख म्हणाल्या की, वंचित बहुजन आघाडीमध्ये महिला कार्यकर्त्यांनाही विविध निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घ्यावेत. महिला, पुरुष व युवकांसाठी, बचत गट स्थापन करून विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. विविध शासकीय योजनांचा गोर गरीब जनतेला लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. अहमदनगर दक्षिण व उत्तरेमध्ये योग्य तो समन्वय साधावा. आज झालेल्या नियुक्त्या म्हणजे आपल्यावर पडलेली जबाबदारी योग्य पध्दतीने पार पाडणे हे कार्यकर्त्यासमोरील खरे आव्हान आहे. या आव्हानाला समर्थपणे समोरे जावे. 

आपल्या प्रास्तविक पर भाषणात वंचित चे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे म्हणाले, सत्तेत जाणे हे आपले उद्दिष्ट आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीपासून या प्रक्रियेस प्रारंभ करून पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगर पालिका व विधानसभा अशा सर्व निवडणुका आपण स्व बळावर लढणार आहोत. गाव पातळीवरील हाडोळा मधील इनामी जमिनी ताब्यात घेऊन त्या जमिनीवर शेळी, गाय, म्हैस, म्हैस पालन, कुक्कुटपालन, मच्छीपालन असे व्यवसाय सुरू करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. असे ते म्हणाले. 

यावेळी योगेश साठे, बंन्नू शेख, संतोष गलांडे, बाळासाहेब कांबळे, अरविंद सोनटक्के, प्यारेलाल शेख, फिरोज पठाण, चंद्रकांत नेटके, नंदकुमार गाडे, चंद्रकांत डोलारे, प्रा. जीवन पारधे, सुनिल बाळू शिंदे, वसंत नितनवरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. 

सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या बैठकीस दत्तात्रय अंदुरे, ज्ञानदेव उच्छे, भाऊ साळवे, लखन घोडेराव, जगू गायकवाड, महेंद्र थोरात, सोमनाथ भैलुमे, सोन्याबापू वरगे, जिल्हा संघटक फिरोज पठाण,  भाऊ साळवे, अमर निरभवणे, सुनिल भिंगारदिवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून या बैठकीस प्रारंभ झाला. वंचित चे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांनी प्रास्ताविक केले. भगवान राऊत यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब कांबळे यांनी आभार मानले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जुन्या गीतांच्या गोडव्यामुळे आजही मोठया प्रमाणात पसंती -अ‍ॅड.अमिन  धाराणी

     वेब टीम नगर : गीत-संगीत आज असे झाले आहे की, या शिवाय कोणाचीही करमणुक होतच नाही. टीव्हीवर सुद्धा गीतांच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात रसिक बघतात. अनेक युवा कलाकार सुद्धा जुन्या गीतांनाच पसंती देतात,  सादरीकरण करतात त्याचे एकमेव कारण म्हणजे गाण्यांच्या गोडव्यांमुळे त्याकडे रसिक मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात, असे प्रतिपादन संगीतप्रेमी अ‍ॅड. अमीन धाराणी यांनी केले.

     म्यूज़िकल स्टार्स फेसबुक लाईव्हच्यावतीने महान कलाकार दिलीप कुमार यांच्या 98 व्या वाढदिवसानिमित ‘सुहाना सफर’ या गीतांची महेफिल रहेमत सुलतान सभागृहात शासनाच्या नियमानुसार आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संगीतप्रेमी सईद खान, मनोज डफळ, संजय माळवदे, विकास खरात, शौकत विराणी आदि उपस्थित होते. या कार्यक्रमात अ‍ॅड.अमीन धाराणी, अँड.गुलशन धाराणी, सुनिल भंडारी, दिपा भालेराव, किरण उजागरे, समीर खान, डाँ.रेश्मा चेडे, राजु सावंत, सुनिल तेलतुंबडे आदिंनी गीते सादर केली.

     या महेफिलीत जुनी गीते सादर करुन रसिकांना जुन्या काळच्या आठवणी व सिनेमाच्या आठवणींना गायकांनी उजाळा दिला. टाळ्यांच्या गजरात या हौसी कलाकारांचे संपूर्ण सभागृहाने कौतुक केले. शाबासकीची थाप दिली व बक्षिसांचाही वर्षाव केला.

     अशा सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबीद दुलेखान यांनी उत्तमरित्या शेर-शायरी करुन रसिकांना गीतांशी जोडण्याचे काम केले. आभार कार्यक्रमाचे टेक्निशियन साहिल धाराणी यांनी मानले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

गंधर्व थिटे याच्या गणितीय सूत्राला शासनाकडून मान्यता

    वेब टीम  नगर : अहमदनगर येथील वसंत टेकडी जवळील स्टेट बँक कॉलनी येथील गंधर्व दत्तप्रसाद थिटे या विद्यार्थ्याने संशोधित केलेल्या ‘फाईडिंग द व्हॅल्यू ऑफ ऍन इन्टीग्रल ऑफ एनी निगेटीव्ह नंबर टू द पॉवर ऑफ द इन्टीग्रेशन व्हेरिएबल’ या गणितीय सूत्राला केंद्र शासनाच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या कॉपीराईट ऑफिसकडून नुकतीच मान्यता प्राप्त झाली आहे.

     गंधर्व थिटे याच्या संशोधनामुळे गणित विषयावरील एका नवीन संकल्पनेला चालना मिळणार आहे. त्याने नुकतीच 12 वी विज्ञान शाखेची परिक्षा उत्तीर्ण झाला असून अभियांत्रिकी शिक्षणाच्या तयारीत आहे. इंग्रजी लेखक, कवी दत्तप्रसाद अनिल थिटे आणि प्रा.सौम्या थिटे यांचा तो मुलगा आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ओबीसी आरक्षणास धक्का न लावता मराठा 

समाजाच्या आराक्षणाला शिवराष्ट्र सेना पक्षाचा पाठिंबा   वेब टीम  नगर : सध्या महाराष्ट्रभर विविध समाज हे आरक्षाणासाठी आंदोलन करत आहेत. त्यात प्रामुख्याने मराठा समाजाच्या आराक्षणाचा मुद्दा सध्या गाजत आहे. त्याचबरोबर ओबीस समाजही रस्त्यावर उतरत आहेत. त्या अनुषंगाने विविध आंदोलनही होत आहेत. परंतु हे सर्व थांबून ओबीसी आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे शिवराष्ट्र सेना पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे यांनी जाहीर केले.

     शिवराष्ट्र सेना पक्षाची नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकित विविध विषयांवर चर्चा होऊन आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भुमिका स्पष्ट केली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे, भैरवनाथ खंडागळे, राधाकिसन कुलट, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष विजय पितळे, रत्ना नवसुपे आदि उपस्थित होते

     मराठा समाजास शैक्षणिक व नोकर्‍याच्या ठिकाणी आरक्षण मिळाल्यास समाजातील ज्यांच्याकडे बुद्धी कौशल्य आहे, परंतु आरक्षणामुळे त्याचा लाभ त्यांना मिळत नाही, अशांना आरक्षणाने फायदा होईल. त्याच बरोबर मराठा समाजातील अनेक होतकरु तरुण केवळ आरक्षणामुळे मागे राहिले आहेत. हा त्यांच्यावरील अन्याय दूर होईल.

     काँग्रेस-राष्ट्रवादी- शिवसेना महाआघाडी सरकार बरोबरच इतरही पक्ष मराठा समाजाच्या आराक्षणास अनकुल आहेत. परंतु सर्वांनी एकत्रित प्रयत्न करुन कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, अशा स्वरुपाचे आरक्षण मराठा समाजास देण्यात यावी. परिणामी सध्या सुरु असलेले मोर्चे, आंदोलने थांबून जो पोलिस व प्रशासनावर ताण पडत आहे तो तणाव निर्माण होणार नाही. प्रत्येक समाजात सलोख्याचे वातावरण राहील. त्यामुळे प्रत्येक समाजाच्या शिक्षण, व्यवसाय यांनाही चालना मिळून राज्य प्रगतीपथवर राहील, असा विश्‍वास शिवराष्ट्र सेनेचे पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे यांनी व्यक्त केला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सामाजिक उपक्रमातून सकारात्म भाव निर्माण होतो

डॉ.गोपाळघरे : तेजज्ञान फौंडेशनच्या रक्तदान शिबीरास प्रतिसाद

   वेब टीम  नगर : तेजज्ञान फौंडेशनच्यावतीने हॅपी थॉटस्  बिल्डिंग, कल्याणरोड येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी होमिओपॅथिक तज्ञ डॉ.सोमिनाथ गोपाळघरे, नगरसेवक शाम नळकांडे, सचिन शिंदे, राजेंद्र सांगळे, सुभाष दिघे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी डॉ.सोमिनाथ गोपाळघरे म्हणाले, प्रत्येकाने आपल्या जीवनात समतोल विकास साधण्यासाठी हॅपी थॉटस्चा अवलंब करणे गरजेचे आहे. त्यामुळे मन:शांती निर्माण होऊन मनुष्यातील नकारात्मकता निघून जाते. समाजाविषयी सकारात्म भाव निर्माण होतो. याच भावनेतून तेजज्ञान फौंडेशन कार्य करत आहे. आज कोरोनाच्या काळात एकीकडे जिथे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमतरता भास आहे. कोरोनाच्या भीतीमुळे रक्तदात्यांचे रक्तदान खूप प्रमाणात कमी झाल्यामुळे आज अनेक रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भारत आहे. आज अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे. यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, मित्र मंडळ यांनी एकत्रितपणे या समस्येवर मात  करण्यासाठी रक्तदान करण्याची गरज आहे. तेजज्ञान फौंडेशनने सामाजिक दायित्व जपत केलेल्या रक्तदान शिबीरामुळे समाजातील जागृती होऊन रक्तदात्यांची संख्या वाढेल असा विश्‍वास डॉ.गोपाळघरे यांनी व्यक्त केला.

     याप्रसंगी शाम नळकांडे, आज रक्ताची गरज ओळखून तेजज्ञान फौंडेशनने एका विचाराने प्रेरित होऊन रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. आपल्या रक्तदानाने कोणाचातरी जीव वाचू शकतो, यासाठी रक्तदान करणे आवश्यक आहे.

     यावेळी सचिन शिंदे यांनी हॅप्पी थॉटस्चे कार्य हे नेहमीच समाजाभिमुख असते. आताच्या रक्तदानसारख्या उपक्रमामुळे समाजातील रक्ताची गरज भागविण्याचे काम केले आहे. अशा उपक्रमांना आपले नेहमीच सहकार्य राहील, असे सांगितले.

     रक्त संकलनाचे कार्य जनकल्याण रक्तपेढीच्यावतीने करण्यात आले. या शिबीरात ६०रक्तपिशव्यांचे संकलन झाले. यावेळी मान्यवरांचे सरश्रींचे पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन राजेंद्र सांगळे यांनी केले तर आभार सुभाष दिघे यांनी मानले. रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी तेजज्ञान फौंडेशनच्या साधकांनी परिश्रम घेतले. 


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पक्षकाराच्या न्यायासाठी न्यायाधीश आले कोर्टाबाहेर....

अहमदनगर महालोक अदालतमधील घटना

    वेब टीम  नगर : मनातील इच्छाशक्ती कृतीत उतरली की, कर्तव्याचे समाधान मिळते. या उक्तीप्रमाणे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये पक्षकारामधील वाद संपुष्टात आणण्यासाठी आणि सामोपचाराने तडतोड व्हावी, याकरिता एक सकारात्मक पाऊल उचलून अहमदनगर येथील वरिष्ठ स्तर न्यायाधीश  सोनल एस.पाटील यांनी एका वृद्ध असहाय्य महिला पक्षकाराकडे स्वत: जाऊन न्याय दिला.

     या विषयी सविस्तर हकीकत अशी की, अहमदनगर जिल्हा न्यायालयात  वकिल संघ व विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. येथील चौथे सह दिवाणी न्यायाधीश यांचे न्यायालयात एक दिवाणी दावा प्रलंबित होता. दरम्यान कुटूंबातीलच वाद असल्याने आपआपसात तडजोड होऊन वाद प्रलंबित होता. दरम्यान कुटूंबातीलच वाद असल्याने आपआपसात तडजोड होऊन वाद विषय संपुष्टात आणावा, अशी दोन्ही पक्षकारांची तयारी झाली. त्यानुसार वादी व प्रतिवादी यांनी परस्पर संमतीने वकिलामार्फत लोक न्यायालयात सदरचे वाद प्रकरण तडजोडीसाठी ठेवले. हे प्रकरण जिल्हा न्यायालयाच्या इमारतीमधील तिसर्‍या मजल्यावरील पॅनल समोर नेमण्यात आले. तडजोडीचा अर्ज सादर केल्यानंतर अर्जातील कथनाबाबत दोन्ही पक्षकाराची सत्यापन पडताळणी होण्यासाठी आणि खात्री करुन घेण्यासाठी पक्षकाराची उपस्थिती आवश्यक होती. परंतु सदर दाव्यातील प्रतिवादी असलेली महिला वृद्ध व जिना चढण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम नसल्याने तिला चार चाकी गाडीत बसवून आणलेले आहे, असे वकिलांनी पॅनल समोर सांगितले. पॅनल प्रमुख न्यायमुर्ती सोनल एस.पाटील यांनी हा पेच सोडवण्यासाठी तात्काळ पार्किंगमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि पॅनल सदस्य अ‍ॅड.अरुणा उनवणे-राशिनकर, अ‍ॅड.दीपा झांबरे, उपस्थित असलेले अ‍ॅड.सुनिल मुंदडा यांच्यासह प्रत्यक्ष पार्किंगमध्ये जाऊन कायद्याप्रमाणे खात्री केली आणि पक्षकाराच्या इच्छेनुसार वाद विषयामध्ये तडजोड करुन दावा निकाली काढला.

     अशाप्रकारे लोक न्यायालयाचा मूळ उद्देश सफल व्हावा आणि न्यायप्रविष्ट प्रकरणामधील कटूता कमी होऊन तडजोडीच्या माध्यमाने न्याय संस्थेवरील अतिरिक्त ताण कमी होण्यासाठी न्यायिक अधिकार्‍यांनी उचित पाऊल उचलून पक्षकाराच्या न्यायासाठी सोयीस्कर भुमिका घेत सामाजिक बांधिलकी जपली अशी चर्चा वकिल वर्गात झाली. यापूर्वीही एका लोक न्यायालयात फायनान्स कंपनी आणि कर्जदार यांचा वाद मिटवण्यासाठी कर्जदारास पैसे जमवूनही काही रक्कम कमी पडली. त्यावेळी न्यायाधीश सोनल पाटील यांनी पॅनल प्रमुख असतांना सामाजिक भावनेतून पुढाकार घेऊन तो वाद मिटवला होता.

     यावेळी अ‍ॅड.डी.एस.घोलप, अ‍ॅड.ए.एस.कोल्हे, पार्किंगमध्ये उपस्थित असलेले इतर वकिल, न्यायालयीन कर्मचारी, पोलिस आदि उपस्थित होेते. या घटनेचे विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा न्यायाधिश रेवती देशपांडे यांनी कौतुक केले. 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्वच्छता जनजागृतीचा उपक्रम अनुकरणीय 

महेंद्र गंधे : भिंगार भाजपच्या वतीने कापडी पिशव्यांचे वाटप व प्लॅस्टिक मुक्तिची शपथ

वेब टीम नगर : करोना महामारी मुळे आपल्याला स्वच्छतेचे महत्व समजले आहे. रोग- राईला लांब ठेवण्यासाठी सर्वत्र स्वच्छता असणे गरजेचे झाले आहे. प्रत्तेकाने आपल्या घर पासून स्वच्छतेस सुरवात केल्यास आपले शहर स्वच्छ होण्यास वेळ लागणार नाही. देशाच्या प्रगतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातात झाडू घेवून स्वच्छता अभियान सुरु केले आहे. या अभियानात सर्व नागरिकांनी सहभागी होत आपल्या घरापासून स्वच्छतेस सुरवात करावी. भाजपच्या भिंगार मंडलाच्या वतीने स्वच्छ व प्लॅस्टिक मुक्त भिंगार होण्यासाठी सुरु केलेले जनजागृती अभियानाचे इतरांनी अनुकरण करावे, असे प्रतिपादन शहर भाजपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी केले.

          भिंगार छावणी परिषदेच्या वतीने १५ डिसेंबर पर्यंत भिंगार शहरात स्वच्छता पंधरवडाचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छता अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टीच्या भिंगार मंडलाच्या वतीने अध्यक्ष वसंत राठोड यांच्या संकल्पनेतून प्लॅस्टिक मुक्त भिंगार होण्यासाठी नागरिकांना कापडी पिशाव्याचे वाटप शहर भाजपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेले छावणी परिषदेचे स्वच्छता निरिक्षक रमेश साके व गणेश भोर यांनी उपस्थित सर्वांना भिंगार शहर स्वच्छ व प्लॅस्टिक मुक्त ठेवण्याची सामुहिक शपथ दिली. यावेळी भिंगार छावणी परिषदेच्या सदस्य शुभांगी साठे, भाजपाचे माजी मंडल अध्यक्ष शिवाजी दहींडे, गणेश साठे, महिला आघाडी अध्यक्षा ज्योत्सना मुंगी, भिंगार युवा मोर्चा अध्यक्ष किशोर कटोरे, शहर युवा अध्यक्ष महेश तवले, ब्रिजेश लाड आदींसह नागरिक उपस्थित होते.

          प्रास्ताविकात वसंत राठोड म्हणाले, भिंगार मध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कायम लोकाभिमुख उपक्रम राबवले जात आहेत. नुकतेच छावणी परिषदेच्या वतीने शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानच्या समाप्ती निमित्त भिंगार भाजपच्या वतीने नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप करून भिंगार शहर प्लॅस्टिक मुक्त होण्यासाठी जनजागृती केली आहे. त्यास नागरिकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

          यावेळी भाजपच्या वतीने जनजागृतीचे स्टीकर दुकानांमध्ये व घरांना लावण्यात आले. किशोर कटोरे यांनी आभार मानले. यावेळी प्रा. त्रीझा रॉक, सौरभ रसाने, संतोष हजारे, शुभम गवळी, सुमित राठोड, मनोज ननवरेअदि कार्यकर्ते उपस्थित होते.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नेत्र तपासणीबरोबर सुपर स्पेशालिटी शस्त्रक्रियेचे भविष्यात प्रयोजन

डॉ.सुनिल पोखरणा : कोव्हिड प्रादुर्भावानंतर प्रथमच सिव्हील हॉस्पिटलमध्ये मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया विभाग सुरु

नगर - कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून सिव्हील हॉस्पिटलमध्ये मार्च महिन्यांपासून नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया विभाग हा बंद

ठेवण्यात आला होता. तो मंगळवारपासून सूरु करण्यात आला असून, सर्व नेत्र रुग्ण व गरजूंनी मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा, तपासणीचा, डोळ्यावरील ऑपरेशनचा व बाह्यरुग्ण तपासणीचा फायदा घ्यावा, असे आवाहन सिव्हील सर्जन डॉ.सुनिल पोखरणा यांनी केले.

याप्रसंगी अति.जिल्हा शल्स चिकित्सक डॉ.महावीर कटारिया, वैद्यकिय अधिकारी डॉ.मनोज घुगे, नेत्र शल्यचिकित्सक डॉ.संतोष रासकर, नेत्रतज्ञ डॉ.भुषण

अनभुले, डॉ. अजिता गरुड, नेत्रचिकित्सक अधिकारी डॉ.अशोक गायकवाड, सेविका सुजाता चक्रनारायण, योगेश सोनटक्के आदि उपस्थित होते.

डॉ.पोखरणा पुढे बोलतांना म्हणाले, नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया या सर्व मोफत असून, त्यात औषधे, रुग्णांचे जेवण, शस्त्रक्रिया, काळा चष्मा, भिंगरोपण हे

सर्व मोफत दिले जाते. रुग्णाला एक दिवस अ‍ॅडमिट ड्रेसिंगसाठी केले जाते. भविष्यात सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेत्र रोगाच्या संदर्भातील सुपर स्पेशालिटी

शस्त्रक्रिया उदाहरणार्थ रिटायनल सर्जरी, अत्याधुनिक काचबिंदू शस्त्रक्रिया, नेत्ररोपण शस्त्रक्रिया, तिरळेपणावरील सर्जरी या सुविधा सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न असून, नेत्र विभागाचे भविष्यात विस्तारीकरण करण्याचे प्रयोजन आहे. जेणे करुन जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्णांना या रुग्णसेवा फायदा करुन घेता येईल व यात निश्‍चित आम्हाला यश येईल, अशी आशा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीगणेश, श्री सरस्वती व लक्ष्मी मातेच्या प्रतिमेचे सिव्हील सर्जन डॉ.सुनिल पोखरणा यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. नारळ

वाढवून या रुग्णसेवेचा शुभारंभ करण्यात आला. आज राजूर तालुका अकोले येथून आलेल्या सहा रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यावरील आवश्यक शस्त्रक्रिया देखील पार पडल्या. शेवटी डॉ.मनोज घुगे यांनी आभार मानले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अभिप्राय नोंदणीत राज्यात प्रथम क्रमांक पटकावणार्‍या ओबीसी सेलचे अमित खामकर यांचा विशेष सन्मान

वेब टीम नगर :  राष्ट्रवादी पक्षाच्या अभिप्राय नोंदणीत राज्यात प्रथम क्रमांक पटकावणार्‍या ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर यांचा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. तर नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, संभाजी पवार, उद्योजक जय दिघे व आल्हाट यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, नगरसेवक विपुल शेटीया, राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, महिला राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षा रेशमा आठरे, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, निलेश इंगळे, गणेश बोरुडे, संतोष ढाकणे, मनोज नन्नवरे, माऊली जाधव, मनोज गुंजाळ, मोहन गुंजाळ आदि उपस्थित होते.  

राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षात युवकांचे उत्तमपणे कार्य सुरु आहे. अभिप्राय नोंदणीत राज्यात प्रथम क्रमांक पटकाविण्याचा बहुमान नगरला मिळाला असून, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. राष्ट्रवादी हा युवकांचा पक्ष म्हणून समाजकारणाला महत्त्व देऊन प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकारी कार्य करीत आहे. शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली युवकांचे संघटन विकासाला चालना देत असल्याचे त्यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शाळेवर चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांच्या पूर्णवेळ नियुक्तीस स्थगिती देणारा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करण्याची मागणी

वेब टीम नगर : शाळेवर असलेल्या चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांच्या पूर्णवेळ नियुक्तीस राज्य सरकारने स्थगिती देणारा ११ डिसेंबरचा शासन निर्णय निर्गमीत केला असून, या अन्यायकारक शासन निर्णयाची अहमदनगर जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर होळी करण्यात आली. तर हा शासन निर्णय रद्द करण्यासाठी निदर्शने करण्यात आली. यावेळी सेवक संघाचे अध्यक्ष भिमाशंकर तोरमल, पुणे विभागीय सचिव गोवर्धन पांडुळे, सरकार्यवाह भानुदास दळवी, माध्यमिक शिक्षक संघाचे आप्पासाहेब शिंदे, महेंद्र हिंगे, शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे, भाऊसाहेब थोटे, नाना डोंगरे, पी.एस. गोसावी, व्ही.ए. हराळे,  एस.एस. शिंदे, एन.आर. जोशी, व्ही.एस. मोहिते, दिलीप कदम आदिंसह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये शिपाई, प्रयोगशाळा परिचर, नाईक, पहारेकरी, सफाई कामगार, कामाठी, चौकीदार, व सुरक्षारक्षक इत्यादी चतुर्थ श्रेणीतील पदे भरण्यास शिक्षण विभागाने शासन निर्णयाद्वारे स्थगिती दिली आहे. शाळेची साफसफाई, शाळेची प्रार्थना, तासिका मधील सुट्टीची घंटा वाजविणे, शिक्षण विभागातील कामाची कागदपत्रे पोहोचविणे, प्रशासनात व अध्यापन प्रक्रियेत सहकार्य करणे, विद्यार्थी व शिक्षकांना आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यास मदत करणे इत्यादी कामाची धुरा शिपाई व अन्य चतुर्थश्रेणी कर्मचारी सांभाळत असतात. चतुर्थ श्रेणीतील पदे न भरण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतल्यामुळे याचा परिणाम शाळेवर होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच राज्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. सदर मागण्या तातडीने सोडून राज्य सरकारने शिक्षकेतर कर्मचार्‍यांना दिलासा देण्याचे निवेदनात म्हंटले आहे.

११ डिसेंबर२०२०चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांना बाबतचा अन्यायकारक शासन निर्णय तातडीने रद्द करून, शासन नियुक्त समितीने शिफारस केल्यानुसार शिक्षकेतर कर्मचार्‍यांची अनुकंपासह तात्काळ पदभरती करण्यात यावी, माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी बक्षी समितीने शिफारस केल्याप्रमाणे दहा, वीस, तीस वर्षानंतरचा लाभ तात्काळ लागू करण्यात यावा, माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी२४वर्षाच्या लाभाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी, राज्यातील सर्व जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे प्रलंबित पदोन्नतीस व अनुकंपा नियुक्तीस तात्काळ मान्यता देण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे नायब तहसिलदार राजेंद्र दिवाण व जिल्हा परिषदेत माध्यमिकचे शिक्षणाधिकारी रामदास हराळ यांना देण्यात आले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

दिल्ली ते मुंबई जी टू जी राईडसाठी जस्मित वधवा रवाना

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिल्या शुभेच्छा : वधवा करणार अहमदनगरचे प्रतिनिधित्व

वेब टीम नगर : दिल्ली ते मुंबईदरम्यान १९ ते २४ डिसेंबरला होणार्‍या जी-टू-जी सायकल राईडमध्ये नगरचे उद्योजक जस्मित वधवा यांनी सहभाग नोंदविला आहे. या राईडमध्ये संपूर्ण देशातून फक्त ४० जणांनी सहभाग घेतला असून, वधवा अहमदनगरचे प्रतिनिधित्व करणार आहे. या प्रवासासाठी नगरमधून रवाना होणारे वधवा यांना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी मेजर गौरव शर्मा, मेजर आर.एस. जोधा, हरजितसिंह वधवा, धनेश खत्ती, अतुल डागा, प्रीतम भागवानी, दिनेश भाटिया, अमित आंदोत्रा, महेश भाटे, मनोज चोपडा, राहुल ओझा, महेश गोपालकृष्णन, किशोर फिरोदिया, प्रदीप पेंढारे, आकाश भन्साळी, श्याम वाघुंबरे, महेश चव्हाण, डॉ. संजय असनानी, प्रशांत मुनोत आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी भोसले यांनी दिल्ली ते मुंबईदरम्यान होणार्‍या जी-टू-जी सायकल राईडची माहिती घेऊन सायकल चालविण्याचा आनंद घेतला. जी-टू-जी सायकल राईडमध्ये 1 हजार 460 किलोमीटरचे अंतर पाच दिवसांमध्ये सायकलवर पूर्ण केले जाणार आहे. जी-टू-जी म्हणजे दिल्ली येथील इंडिया गेट ते मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाचा, असा सायकलप्रवास असणार आहे. यात दररोज २८० किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्याचे आव्हान नगरचे जस्मित वधवा यांच्यासमोर असणार आहे. शून्य डिग्री ते४० डिग्री तापमान, वाहतूक, रस्ता या सर्व बाबींचा त्यांना सामना करावा लागणार आहे.

अभियंता असलेले जस्मित यांचा या सायकल राईडमध्ये गरिबांसाठी ना नफा-ना तोटा तत्त्वावर मेडिकलचे दालन सुरू करण्याचा संकल्प केला आहे. जस्मित वधवा यांनी ही राईड यशस्वी पणे पूर्ण करणार असल्याचा आत्मविश्‍वास व्यक्त करीत नगरला आणखी एक मनाचा तुरा रोवनार असल्याचे मत व्यक्त केले. उद्योजक नरेंद्र फिरोदिया, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप आणि तिरंगा फाऊंडेशने त्यांना या राईडसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

एच.पी.व्ही.  लस घेतल्याने गर्भाशय पिशवीच्या तोंडाचा कर्करोग समूळ नष्ट करता येवू शकतो – डाँ. अभिजित वांडेकर

वेब टीम नगर : आजच्या धावत्या युगात प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्या कडे दुर्लक्ष करीत आहे. अनेक वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त झालेले रुग्ण दिसून येतात. आजारांबद्दल असणारी अजाणता आणि गैरसमज यामुळे आरोग्य धोक्यात आल्याचे  लक्षात येते. आज भारतात दरवर्षी ३०००० हजार पेक्षा जास्त अधिक महिलांना गर्भाशय पिशवीचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे.  एच.पी.व्ही. (Human Papilloma Virus) तपासणी करून वेळीच प्रतिबंधात्मक लस दिल्याने  पिशवीच्या तोंडाच्या कॅन्सरची धोका टळू शकतो. एच.पी.व्ही. लसीकरणाने पिशवीचा तोंडाचा कर्करोग समूळ नष्ट करता येवू शकतो असे प्रतिपादन केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डाँ. अभिजित वांडेकर यांनी केले.

कॅन्सर पेशंट एड्स असोसिएशन, मुबई, विखे फौंडेशन हॉस्पिटल आणि   स्नेहालय संचलीत केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एच.पि.व्ही. लसीकरण उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मा. प्रवीण मुत्याल (सदस्य, बाल कल्याण समिती, अहमदनगर), डॉ. गणेश मिसाळ (बालरोग तज्ञ, विखे फौंडेशन हॉस्पिटल), डॉ. तनु चौधरी, (विखे फौंडेशन हॉस्पिटल), डॉ. रुचा टिपरे  (विखे फौंडेशन हॉस्पिटल), डॉ. काजल जैन, (विखे फौंडेशन हॉस्पिटल), डॉ. अम्रता पायगुडे (विखे फौंडेशन हॉस्पिटल), स्नेहालय संस्थेचे अध्यक्ष संजय गुगळे, सचिव राजीव गुजर आणि वरिष्ठ सहसंचालक अनिल गावडे  आदी  मान्यवर  उपस्थित होते. डाँ. वांडेकर  पुढे म्हणाले  की, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपल्या कामाबरोबर आरोग्याकडे लक्ष देणेही  महत्वाचे आहे. १० जानेवारी २०२० रोजी घेण्यात आलेल्या एच.पी.व्ही. तपासणी शिबिरामध्ये देह व्यापार्यातील बळी १८० महिला, स्नेहालयातील १४० निराधार बालिका आणि स्नेहाधार प्रकल्पातील ४५ निराधार महिलांनी सह्भागीत होऊन आपली चाचणी करून घेतलेली होती. आज त्याचाच पहिला टप्पा म्हणून स्नेहालयातील निराधार बालिकांना एच.पी.व्ही. लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आले. २५  डिसेंबर २०२० पर्यंत एच.पी.व्ही. तपासणी व चाचणी करणाऱ्या सर्व महिलाआणि बालिकांना  एच.पी.व्ही. लस देण्यात येणार आहे.

महिलांचे आरोग्य हा आजही भारतात दुर्लक्षित विषय आहे. त्यामुळे स्नेहालयाने आयोजित केलेले हे  एच.पी.व्ही. लसीकरण निराधार बालिकांसाठी आणि शोषित महिलांसाठी वरदानच ठरेल, असे डॉ. गणेश मिसाळ  यांनी आपल्या मनोगतात सांगितले. येथून पुढे देखील अश्या उपक्रमांना विखे पाटील फौंडेशन हॉस्पिटल  नेहमीच सहयोग करेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. शिबिराच्या समारोप प्रसंगी स्नेहालयाचे संजय गुगळे यांनी संवाद साधतांना वंचित घटकातील महिलांसाठी व्यसनमुक्तीचा नवीन प्रकल्प सुरु करण्यात येईल असे सांगितले. अश्या प्रकारच्या लसीकरण मोहिमेमध्ये तसेच या नवीन प्रकल्पात  जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत शेंबडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार समाधान धालगुडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विष्णू कांबळे, विजय गायकवाड, बेबी केंगार, स्वाती बोरगे, सुवर्ण रहाणे, सोनाली लीमजे, संदीप क्षीरसागर, नितीन मोरे, महेश आगरवाल, यशवंत कुरापट्टी, दीपक बुरम, राहुल देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शेतकरी जन आंदोलनाचे दिल्लीतून नेतृत्व करण्यासाठी युवा शेतकऱ्यांचे अण्णा हजारेंना साकडे;

हजारो तरुण शेतकऱ्यांचा दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्याचा संकल्प

वेब टीम राळेगण सिद्धी  : देशातील शेतकऱ्याला कायमस्वरूपी मोडून काढण्याचे काम केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांमुळे होणार आहे. यामुळे आमची पीढी बरबाद होईलच पण आमच्या इथून पुढे जन्माला येणा-या शेतकऱ्यांच्या सगळ्या पीढ्या देखील बरबाद होणार आहेत. तेव्हा जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकर्‍याला या बरबादी पासून वाचण्यासाठी आता आपणच दिल्लीमध्ये उपोषणाला बसावे, असे साकडे नगर, पारनेर तालुक्यातील तरुण शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन घातले आहे. 

तरुण सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांची समक्ष भेट घेऊन शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे मांडले. ॲड. योगेश गेरंगे यांच्यासह ॲड.अनिल धाडगे, ॲड. अजिंक्य काळे, सुनील आंबडे, शंकर चव्हाण, तुषार बांडे, प्रशांत जाधव, संदीप माळी, रवींद्र गीते, दिलीप पवार, रोहिदास पाटील, सतेज साळी आदी तरुण शेतकरी यावेळी उपस्थित होते. 

यावेळी हजारे यांना गळ घालताना तरुणांनी हजारे यांच्याकडे शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी लवकरात लवकर दिल्लीमध्ये आपण उपोषणाला बसावे यासाठी आग्रह धरला. शेतकऱ्यांना कोणीही वाली उरलेला नसून हजारे हेच आता शेतकऱ्यांना पर्यायाने देशाला वाचवू शकतील, असा विश्वास यावेळी तरुणांनी व्यक्त केला.

मागील सुमारे वीस दिवसांपासून कडाक्याच्या थंडीमध्ये दिल्लीच्या सीमेवरती हजारो, लाखो शेतकरी तळ ठोकून आहेत. परंतु देशातील शेतकरी आंदोलकांना अण्णा हजारे यांच्या सारखे सक्षम आणि प्रभावी नेतृत्व मिळाले तरच केंद्र सरकारचे डोके ठिकाणावर येईल, अशी बाजू यावेळी तरुण शेतकऱ्यांनी मांडली. नुकत्याच झालेल्या देशव्यापी भारत बंदला अण्णांनी देखील एक दिवसीय उपोषण करत पाठिंबा दिला होता. याबद्दल अण्णांचे आभार मानण्यात आले. 

नगर जिल्ह्यातून हजारो तरुण शेतकरी दिल्लीला जाण्याच्या तयारीत

यावेळी बोलताना ॲड. योगेश गेरंगे म्हणाले की, देशातील तरुण शेतकरी आता हवालदिल झाला आहे. तो संतप्त झाला आहे. अण्णांनी या आंदोलनाचे नेतृत्व हाती घेतल्यास अण्णांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीकडे कूच करत अण्णां समवेत नगर जिल्ह्यातून तरुण शेतकरी हजारोंच्या संख्येने उपोषणासाठी जाण्याचा आमचा संकल्प आहे. 

गेरेंगे पुढे म्हणाले की, महात्मा गांधींच्या नेतृतवाखाली  जनसहभागातून झालेल्या चळवळीमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. अण्णा देखील या देशातील तरुणांसाठी आदरस्थानी आणि आशास्थानी आहेत. आता फक्त अण्णाच या आंदोलनाला देशव्यापी जन आंदोलनाचे स्वरूप प्राप्त करून देत शेतकऱ्यांना वाचवू शकतात. 

यावेळी अण्णा हजारे यांनी तरुण शेतकऱ्यांची बाजू समजावून घेत या बाबतीमध्ये लवकरच शेतकरी हिताची भूमिका मी घेईल असे आश्वासन दिले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments