।। जागर शक्तीचा ।। जागर कर्तृत्वाचा ।।

      ।। जागर शक्तीचा ।। जागर कर्तृत्वाचा ।। 

       स्वरांगणातल्या किमयागार अंजली-नंदिनी गायकवाड


                 सा रे ग म प लिटील चॅम्प  या स्पर्धेची अंतिम फेरी जयपूर येथे सुरु होती. या स्पर्धेला आणि त्यातील स्पर्धकांना मोठी लोकप्रियता मिळत होती त्यामुळे या स्पर्धेच्या वेळेत देशभरातीलच नव्हे तर विदेशातील प्रेक्षकही दूरदर्शन संचा समोर खिळलेले असायचे. विशेषतः नगरकर... अर्थात त्याला कारणही तसंच होते.नगरची अंजली गायकवाड ही अवघ्या ७ वर्षांची चिमुकली अंतिम फेरीत पोहोचली होती.आणि आज ती कसं  गाते या बद्दल सर्वांनाच उत्सुकता होती.

               क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा आणि जवळ येणारी निकालाची वेळ या साऱ्याची  प्रतीक्षा संपून मान्यवर अतिथींनी निकाल जाहीर करायला सुरवात केली, आणि सरते शेवटी या स्पर्धेतील विजेते पदाचा मुकुट  अंजली गायकवाडच्या शिरावर स्थिर झाला. तस अख्या नगर शहराच वातावरण बदलून गेल. अंजली गायकवाड सा रे ग म प लिटील चॅम्प या स्पर्धेची विजेती ठरली हा क्षण नगरकरांनी दिवाळी सारखा साजरा केला फटाक्यांची आतिषबाजी ,अंजली आणि तिचे कुटुंबीय नगरला पोहोचल्या नंतर भव्य मिरवणूक काढून केलेलं जंगी स्वागत नगरकरांनी आपल्या डोळ्यात आणी मोबाईल मध्ये साठवून ठेवलं .

                 नगरच्या संगीत क्षेत्रा बाबत सांगायचं झाल तर अत्यंत प्रयोगशीलतेने  ते विकसित झाल. ज्या काळात आजच्या सारखी साधन सामुग्री नसतानाही मोठ्या गायकांची गायकी पुण्या-मुंबईत जाऊन ऐकायची सुरावटींची टिपण काढायची ती अभ्यासून रियाज करायचा अश्या परिस्थितीतून नगर शहर-जिल्ह्याचीसंगीत क्षेत्राची वाटचाल सुरु झाली. मात्र आज संगीतच उत्तम प्रशिक्षण देणाऱ्या संगीताची जोपासना करणाऱ्या अनेक संस्था कार्यरत आहेत.अंजली-नंदिनी गायकवाड भगिनींनी संगीत सम्राट ही स्पर्धा आणि अंजलीन सा रे ग म प लिटील च्याम्प ही स्पर्धा जिंकून नगरच्या संगीत क्षेत्राच्या वाटचालीवर मनाचा शीरपेच चढविला आहे.

                 अनेक विद्यार्थी अंगद गायकवाड यांचे कडे संगीताचे धडे गिरवायला येतात त्यच वेळी आजूबाजूला रंगणाऱ्या रेंगाळणाऱ्या अंजली-नंदिनी वर संगीताचे सुरांचे संस्कार नकळत पणे होतच होते.नंदिनी अवघ्या पाच वर्षांची असताना गायला लागली तर अंजली त्याही पेक्षा लवकर अगदी चौथ्याच वर्षी गाऊ लागली. या दोन्ही भगिनींची संगीतातील कारकीर्द अवघ्या तीनचार वर्षाची मात्र एवढ्या अल्प काळात त्यांनी अनेक स्पर्धा तर गाजवल्याच शिवाय अनेक स्पर्धातून बक्षीस मिळवली आणि आपल्या गायकीनं  प्रेक्षक, श्रोते ,परीक्षकांना थक्क करून सोडल. नव्हे या स्वरांगणातल्या अद्भुत सुरांच्या त्या किमयागार ठरल्या.

                अगदी अल्लड वयातल्या या दोघी भगिनी. नंदिनी मृदू आवाजाची मात्र तीची स्मरणशक्ती,आकलन शक्ती तल्लख असल्याचे अंगद गायकवाड यांनी निरीक्षणातून हेरलं.एकूणच संगीतातील चांगली समज नंदिनीला आहे. शब्दातला नेमका भाव तिला कळतो हे जाणवलं.वयाच्या पाचव्या वर्षी नंदिनीने सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं “ आकाश पांघरून जग शांत झोपले ” ही काहीशी गंभीर रचना वडिलांना  गाऊन दाखवली त्यांनीही तिचं कौतुक करत तिच्या गाण्यावर थोडी मेहनत घेतली,आणि त्या वर्षीच्या रावसाहेब पटवर्धन बालमहोत्सवात या गाण्याच्या सादरी करणातून प्रेक्षकांची दाद तर मिळवलीच शिवाय पुरस्कारही पटकावला.   

              अंजली तर त्याही पेक्षा लवकर गाऊ लागली. खणखणीत आवाज त्यात चंचलता असे दुहेरी मिश्रण असल्याने तीही तिही नंदिनी सारख उत्तम गाऊ शकेल असाही विश्वास अंगद गायकवाड यांना होता. त्या वयातच अंजली छोट्या छोट्या बंदिशी सहज गाऊ लागली. “ तुम बिन मोरी कौन खबर ले,मोरे गिरिधारी ” ही पारंपारिक चालीतली पिलू रागातली बंदिश अगदी बिनचूक पणे गात अनेक मैफिलीतून प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवून कौतुकास पात्र ठरत असतानाच लातूरच्या अष्टविनायक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत “ वृन्दावनी वेणू ” ही गवळण सादर करून त्या स्पर्धेत उपविजेती ठरली, अर्थात वयात बसत नसल्याने तिचा विजेते पणाचा मान हुकला. तिथेच तिचा सन्मान सुरेश वाडकरांच्या हस्ते करण्यात आला. त्या दोघींशी बोलण्याच्या ओघात तुमचे आवडते गायक कोण असा प्रश्न आला त्यावेळी शास्त्रीय संगीतात किशोरी आमोणकर,कौशिकी चक्रवर्ती, मालीनी राजूरकर, पद्मावती शाळीग्राम, व्यंकटेश कुमार,शोभा गुर्टू, नजाकत अली, सलामत अली ही नाव आली तर सुगम संगीतात ,लता मंगेशकर , आशा भोसले, श्रेया घोशाल , अरजित सिंग अशी नावे या दोघींनी पटापट सांगितली. वास्तविक पहाता अंजली-नंदिनीच्या वयातल्याच काय तर त्यांच्याहून मोठ्या असलेल्या पिढ्यातील बहुतांश लोकांना यातली काही नाव माहितही नसतील, वर उल्लेखलेल्या गायकांची गायकी व इतरही नवी जूनी गाणी त्यांना आवडत असल्याने रेडीओ ,मोबाईल मधून त्या ऐकत असतात, त्यातूनही गायकीतल्या हरकती, नजाकती लक्षात ठेऊन त्या रीयाजातून गिरवल्या जातात.

       स्थानिक ,जिल्हास्तरीय-राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धांमधील शेकडो पारितोषिके अंजली-नंदिनीच्या बावनकशी यशाची साक्ष देतात.त्यामुळेच चित्रवाहिन्यांवरच्या रियालिटी शोमधूनही या दोघी भगिनींना वाइल्ड कार्ड मधून प्रवेश मिळाला. हे ही या दोघींचे वैशिष्ठ्य म्हणावे लागेल. या दोन्ही भगिनींनी देशभरातील होणाऱ्या स्पर्धांमधून आलटून पालटून बक्षिसे मिळवल्याचे दिसते.त्याचे एकच उदहरण द्यायचे तर लखनौ येथे होत असलेल्या “ लखनौ क्लासिक व्हॉइस ऑफ इंडिया ” च्या स्पर्धेची २०१५ सालची विजेती नंदिनी ठरली तर २०१६ साली याच स्पर्धेचा जेतेपदाचा मान अंजलीने पटकावला.

“संगीत सम्राट”या स्पर्धेत दोघींना एकत्रितपणे गायनाची संधी असल्याने अंजली-नंदिनी या स्पर्धेत सह भागी झाल्या. तर सारेगमप लिटील चॅम्पस या स्पर्धेत ही दोघी सहभागी होणार होत्या मात्र संयोजकांनी त्या दोघींच्या गायनाचे महत्व लक्षात घेऊन एकाच कुटुंबातील दोन बहिणींमध्ये स्पर्धा करणे बरोबर नाही असा मुद्दा पुढे आल्याने नंदिनीने या स्पर्धेबाहेर रहाण्याचे ठरविले. मात्र अंजलीच्या यशात नंदिनीचा वाटा हा अत्यंत मोलाचा आहे.

     गेल्या तीन-चार वर्षापासून अंजली-नंदिनीची यशस्वी घौडदौड जोमाने सुरु आहे. या पुढील काळातही शास्त्रीय संगीताची बैठक असलेल्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा त्या दोघींचा मानस आहे. अगदीच पोरसवदा वय  असलेल्या अंजली-नंदिनी यांनी अगदी लहान वयात मिळवलेले यश हिमालया एवढे उतुंग आहे. मात्र अजूनही या मुलींचे पाय जमिनीवर आहेत. आजही अंजलीला मैत्रिणींसोबत खेळायला खूप आवडते. वेळ मिळाला कि पोहायला जाण्याचा छंद ती जोपासते. तर नंदिनीला अभ्यासात रुची असली तरी शास्त्रीय संगीतातच करियर करायचे आहे.आजवरच्या त्यांच्या यशाकडे पाहता भविष्यातही त्या संगीत क्षितिजावर अखंडितपणे झगमगत रहातील यात शंका नाही. 

                                                अंजली मनस्वी कलाकार     

                    अंजलीचे वडील अंगद गायकवाड हे मूळ लातूरचे , २००८ साली अखिल भारतीय गांधर्वसंगीत  अलंकार परीक्षेत ते देशभरातून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्या निमित्त अरुण निगवेकरांच्या हस्ते त्यांचा  सन्मानही झाला. नगरमधील सुदाम गडकर हे तबला वादक संगीत शिकण्यासाठी म्हणून दर पंधरवड्याला लातूरला जायचे. तेथेच सुदाम गडकर आणि अंगद गायकवाड हे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचे. नगरच्या पेमराज गुगळे कनिष्ठ महाविद्यालयात संगीत शिक्षकाची जागा भरावयाची असल्याने सुदाम गडकरींनी अंगद गायकवाड यांच्याकडे विचारणा केली. संगीत शिक्षकाच्या नोकरी निमित्ताने ते नगरला आले. नगरमधेही त्यांनी संगीत शाळा सुरु केली. व्यावसायिक संगीत कलावंत व्हावे अशी त्यांची मनापासून इच्छा होती.अंजली-नंदिनी गायला लागल्या पासून त्यांनी त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले.स्वतःला जरी व्यावसायिक कलावंत होता आले नाही ,तरी अंजली-नंदिनीच्या यशामुळे मी खूप समाधानी आहे, असे ते म्हणतात.

                   अंजली-नंदिनीला रियालीटी शो मध्ये पाठवण्याबाबत अंगद गायकवाड यांच्या मनाची द्विधा मनस्थिती झाली होती.यापूर्वीच्या रियालिटी शोज बद्दल त्यांचा व्यक्तिगत अनुभव फारसा चांगला नसल्याने आणि स्पर्धेतून मधेच पडताना मुलींच्या मनावर होणारा परिणाम आदी गोष्टींचा विचार करून शिवाय शास्त्रीय संगीताची बैठक असलेल्या अंजली-नंदिनीच्या गायकीची शिस्त बिघडेल अशा अनेक प्रश्नांनी त्यांना घेरलेले होते. सरगम प्रेमी मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रा.राम शिंदे व अन्य स्नेहींशी चर्चा केल्यानंतर मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांचे संगीत त्यांचे संगीत क्षेत्रातील गुरु पंडित शांताराम चीगरी  गुरुजी यांना भेटून त्यांनी परवानगी दिल्या नंतरच या मुलीना रीयालीटी शो मध्ये भाग घेण्यास उद्युक्त केले. 

                                                   आईचे मोठे योगदान 

अंजली नंदिनीच्या या सांगीतिक वाटचालीमध्ये त्यांची आई मनीषा गायकवाड यांची मोठे योगदान आहे. कधी काळी भजने, हरीपाठ, गाण्या पर्यंतच संबंध असलेल्या मनीषा यांना लग्नानंतर अंगद यांच्या संगीताचा परीस स्पर्श लाभला मग त्यांनीही संगीताचे कित्ते गिरवीत संगीतातल्या चार परीक्षा दिल्या अंजली-नंदिनीच्या रियालिटी शो स्पर्धांच्या सहभागात त्याच या मुलींबरोबर सातत्याने असायच्या स्पर्धेच्या परीक्षकांनी दिलेले गाणे यु टयूब वर शोधायचे, ते अंजलीला ऐकवायचे अंजली ते वडिलांना गाऊन दाखवायची वडिलांनी सूचना दिल्या बरहुकुम मनीषा मुलींकडून तयारी करून घ्यायच्या. लिटील चॅम्प  स्पर्धेच्या वेळी तर अंजलीला मनीषाताई आणि नंदिनी या दोघींचे मार्गदर्शन मिळाले. संगीताच्या चार परीक्षा पास केल्यानंतरही आज मी उत्तम गाते असे नाही मात्र मुलींच्या गाण्यात त्या कुठे चुकतात हे नेमके पणाने सांगण्याइतका आत्मविश्वास त्यांच्यात आला आहे. घरातून असलेले सांगीतिक वातावरण आणि दोन्ही मुलींची शास्त्रीय संगीताची झालेली पक्की बैठक यामुळेच अंजलीने अंतिम फेरीत “ नजर जो तेरी लागी,मै दिवानी हो गई” , छल्ला वल्ला , मै कोल्हापूर से आइ हू , या तीनही गाण्यांबरोबर अगोदर गायलेल्या काही गीतांमधील हरकती नजाकतीं मुळे पाकिस्तानातील संगीत क्षेत्रातील जाणकारांनी अंजलीला भरभरून दाद दिली.    

Post a Comment

3 Comments

  1. वा, क्या बात है। अंजली आणि नंदिनी या दोन्हीही भगिनी अतिशय मनस्वी आणि नैसर्गिक कलाकार आहेत. खूप कमी वयामध्ये त्यांनी गायन कलाकारांसाठी एक छान आदर्श उभा केला आहे. भविष्यात या मुलींकडून रसिकांच्या खूप अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी त्या नक्कीच सक्षम आणि समर्थ आहेत.
    देवीप्रसाद अय्यंगार यांच्या नगर टुडे ने अतिशय सुरेख शब्दांकन करुन त्यांच्या कारकिर्दीचा आढावा मांडला आहे. अंजली आणि नंदिनी या दोघींनाही अनेक अनेक शुभाशिर्वाद.
    राम ज.शिंदे
    संस्थापक सदस्य आणि अध्यक्ष
    सरगमप्रेमी मित्र मंडळ नगर

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. अंजली आणि नंदिनी यांचा मला व माझ्या परिवाराला सार्थ अभिमान आहे. लातूरकर म्हणले की आणखीनच आनंद द्विगुणीत होतो. पुढील वाटचालीस तुम्हा दोघींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा, व सरांना नमस्कार.💐💐💐

    - सुनील टाक. लातूर

    ReplyDelete
Emoji
(y)
:)
:(
hihi
:-)
:D
=D
:-d
;(
;-(
@-)
:P
:o
:>)
(o)
:p
(p)
:-s
(m)
8-)
:-t
:-b
b-(
:-#
=p~
x-)
(k)