राजेश टोपे यांना सलाम


जन्मदात्री आई आय सी यु मध्ये ,अन लेकाची  धडपड जनतेसाठी 

राजेश टोपे यांना सलाम

वेब टीम मुंबई ,दि. १९- महाराष्ट्रात ‘कोरोना व्हायरस’ हातपाय पसरु लागल्यामुळे आरोग्यमंत्री या नात्याने राज्याची काळजी घेण्याची जबाबदारी खांद्यावर असताना राजेश टोपे यांना आणखी एक काळजी सतावते आहे. विविध व्याधी जडलेली जन्मदात्री गेल्या २० दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत आहे. परंतु कर्तव्यात कसूर न करता टोपे जनतेच्या हिताला प्राधान्य देताना दिसत आहेत.
बॉम्बे हॉस्पिटलच्या आईसीयूमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्रींवर उपचार सुरु आहेत. मात्र कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या बैठका, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा, पत्रकार परिषद अशा व्यस्त वेळापत्रकामुळे राजेश टोपे यांना जराही उसंत मिळत नाही. कर्तव्यदक्ष राजेश टोपे यांना आईची विचारपूस करायला जाण्यासाठीही फारच कमी वेळ मिळतो. ‘दिव्य मराठी’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राजेश टोपे यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या.

राजेश टोपे एअरपोर्टवर जाऊन प्रवाशांच्या स्क्रीनिंग व्यवस्थेची पाहणी करतात, डॉक्टरांचे कौतुक करतात, काम करताना काय अडचणी येतात, याची विचारपूसही करतात. कस्तुरबा रुग्णालयात पाहणी करणे, राज्यातील रुग्णांचा आढावा घेणे, आजार पसरु नये, यासाठी खबरदारी घेणे, अशी कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी असंख्य कामे त्यांना पाहावी लागतात. मात्र या गडबडीत कौटुंबिक अरिष्टाकडे पाहण्यास त्यांना पुरेसा वेळही मिळत नाही.
राजकीय गुरु शरद पवारांनी किल्लारीत झालेल्या भूकंपावेळी केलेलं काम माझ्यासाठी आदर्श असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. शरद पवारांच्या संस्कारामुळे जबाबदारीला प्राधान्य देण्याचं माझं धोरण आहे. किल्लारी भूकंपावेळी पवार साहेबांना स्वत: पुढाकार घेऊन पुढे होऊन परिस्थितीचा सामना करताना पाहिलंय, तेच संस्कार माझ्या मनावर झालेत, असं टोपे म्हणाले.
मुलगा म्हणून आईची आवश्यक ती काळजी घेता येत नसल्याची खंत आहे. पण लढाईत सेनापतीने पुढाकार घेऊन इतरांना प्रोत्साहन देणं गरजेचं असतं, असं राजेश टोपे म्हणतात.

Post a Comment

0 Comments