इंधन वाहतूक करणाऱ्या टॅंकरचा अपघात ,स्फोटात १४७ जणांचा अंत
मृतदेह ओळखूही येईनात ;इंधन गोळा करायला आलेले स्थानिक स्फोटात मरण पावले.
अबुजा: इंधनाची वाहतूक करणाऱ्या टँकरचा स्फोट झाल्याची घटना नायजेरियात घडली आहे. टँकरला अपघात झाल्यानंतर आसपासच्या भागातील लोक इंधन चोरण्यासाठी जमले. टँकरमधून वाहून जाणारं इंधन ते गोळा करत होते. तितक्यात इंधनाच्या टँकरचा स्फोट झाला. त्यात १४७ जणांचा मृत्यू झाला. घटना उत्तर नायजेरियात घडली. स्फोटात जखमी झालेल्यांनैा जवळच्या रुग्णालयांत उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. स्थानिक रहिवासी टँकरमधून सांडलेलं इंधन गोळा करतेवेळी स्फोट झाल्याची माहिती आपत्कालीन सेवा विभागाकडून देण्यात आली.स्थानिक पोलीस प्रवक्ते लॉन ऍडम यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाची घटना मध्यरात्रीच्या सुमारास जिगावा राज्यातील माजिया नगर परिसरात घडली. राज्यमार्गावर धावत असलेल्या टँकर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे टँकर उलटला. यानंतर मोठ्या प्रमाणात इंधन गळती सुरु झाली. स्थानिक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी इंधन गोळा करण्यात सुरुवात केली. त्याचवेळी आग भडकली. पुढच्या काही सेकंदांमध्ये मोठा स्फोट झाला.
टँकरच्या स्फोटात १४० जणांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह सामूहिकपणे दफन करण्यात आल्याची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन एजन्सीचे प्रमुख नुरा अब्दुल्लाही यांनी 'असोशिएट प्रेस'ला दिली. या घटनेनं माजिया परिसरावर शोककळा पसरली असून स्थानिकांनी मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार केले, असं अब्दुल्लाही यांनी सांगितलं.
टँकरमधून सांडणारं इंधन गोळा करणारे स्फोटात होरपळले. त्यांचे मृतदेह ओळखण्यापलीकडे गेले. आफ्रिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश अशी नायजेरियाची ओळख आहे. देशात अपघाताच्या घटना वारंवार घडत असतात. माल वाहतुकीसाठी असलेली रेल्वे यंत्रणा पुरेशी सक्षम नसल्यानं बरीचशी वाहतूक रस्ते मार्गानं चालते. वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्यानं अपघाताच्या घटना सातत्यानं घडतात.
नायजेरियात इंधनाची बहुंताशपणे रस्ते मार्गानं चालते. इंधन टँकर अपघातग्रस्त होण्याच्या आणि त्यानंतर नागरिकांनी इंधन चोरी करण्याच्या घटना बऱ्याचदा घडतात. सरकारनं इंधनावरील अनुदान संपुष्टात आणलं आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात इंधनाच्या किमती तिपटीनं वाढल्या आहेत. त्यामुळेच टँकरला अपघात झाल्यानंतर त्यातून अनेकदा इंधन चोरी केली जाते.
0 Comments