प्रतिकूल परिस्थितीवर मात करत 'कल्पना कदम' ठरली देशाची शान!
मूकबधिर विद्यार्थ्यांची मार्गदर्शिका ते कझाकिस्तान येथील 'वर्ल्ड युथ गोलबॉल चॅम्पियनशिप'मध्ये भारतीय संघाची कर्णधार; प्रेरणादायी प्रवास
अहिल्यानगर : जन्मा बरोबर आलेले अपंगत्व आणि प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने तोंड देत अहिल्यानगरच्या ‘अनामप्रेम’ संस्थेत घडलेल्या कल्पना कदम हिने आपल्या कर्तृत्वावर संपूर्ण देशात जिल्ह्याचे व राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे. एका डोळ्याने अंधत्व असतानाही तिने हार मानली नाही. आज ती मूकबधिर विद्यार्थ्यांची शिक्षिका म्हणून यशस्वी वाटचाल करत असून, आता थेट कझाकिस्तान येथे होणाऱ्या 'वर्ल्ड युथ गोलबॉल चॅम्पियनशिप'मध्ये भारतीय गोलबॉल संघाची कर्णधार (कॅप्टन) म्हणून देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील साप्ती या लहान गावातून आलेल्या कल्पनाला सुरुवातीला आरोग्याच्या अनेक समस्या होत्या. मात्र, ‘अनामप्रेम’ संस्थेच्या विश्वस्त डॉ. मेघना मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने स्वतःला सावरले. संस्थेच्या आश्रयाने तिने आपले शिक्षण पूर्ण करून D.Ed. ची पदवी मिळवली. मूकबधिर मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तिने पुण्यातून दोन वर्षांचा कठीण साइन लँग्वेज (Sign Language) कोर्स पूर्ण केला. आज ती रेसिडेन्शिअल कॉलेजमध्ये मूकबधिर विद्यार्थ्यांना कला शाखेचे सर्व ६ विषय अत्यंत सहजतेने आणि हसतमुखाने शिकवत आहे.
केवळ शिक्षणातच नव्हे, तर खेळाच्या मैदानातही तिने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. संस्थेचे संचालक अभय रायकवाड यांच्या प्रेरणेने तिने गोलबॉल या खेळात पाऊल ठेवले. आपल्या मेहनतीच्या जोरावर तिने राज्य पातळीवरून देश पातळीपर्यंत मजल मारली. उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिला सन २०२५ मध्ये 'राष्ट्रीय खेळाडू' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तसेच, नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या 'नॅशनल पॅरा योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप २०२५-२६' मध्ये तिने सुवर्णपदक पटकावले आहे. तिच्या या गौरवास्पद प्रवासात तिला 'निवेदिता प्रतिष्ठान'चा 'ललना कलारत्न' यासह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
अफाट यश आणि पुरस्कार मिळूनही कल्पनाच्या स्वभावात यत्किंचितही अहंकार नाही. संस्थेतील अंध मुलींना मदत करणे आणि मूकबधिर मुलांसाठी विविध कार्यक्रमांत साइन लँग्वेजमध्ये आनंदाने अनुवाद करणे, हे तिच्या रोजच्या जीवनाचा भाग आहे.
तिच्या या उज्ज्वल प्रवासात अनामप्रेमचे अध्यक्ष इंजि. अजित माने, पालक डॉ. प्रकाश शेठ, मार्गदर्शक आणि विविध संस्था-प्रशिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. क्रीडा क्षेत्रात भारताचा तिरंगा फडकवण्यासाठी सज्ज झालेल्या कल्पना कदम हिच्या या प्रेरणादायी प्रवासाचे सर्वत्र कौतुक होत असून, भविष्यातील तिच्या आंतरराष्ट्रीय मोहिमेसाठी तिला विविध स्तरांतून मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.



.jpg)
0 Comments