बदललेल्या जीवनशैलीमुळे हॉस्पिटल्स् हाऊसफुल्ल : चकोर मुळे

 बदललेल्या जीवनशैलीमुळे हॉस्पिटल्स्  हाऊसफुल्ल : चकोर मुळे 

नगर - बदललेल्या जीवनशैलीमुळे हॉस्पिटल्स् बाराही महिने हाऊसफुल्ल असलेली दिसतात यास प्रगती म्हणायचे का? असा आत्मचिंतन करायला लावणारा सवाल वेदमूर्ती श्री चकोर गुरू मुळे यांनी  श्रोत्यांच्या पुढ्यात ठेवला.

येथील सनातन धर्मसभेच्या शारदीय व्याख्यानमालेचे पुष्प कर्मकांड आणि ग्रहशांती या विषयावर गुंफताना ते बोलत होते. देवी शारदेच्या प्रतिमेचे पूजन आणि आरती करून प्रवचनाचा श्रीगणेशा करण्यात आला. पौरोहित्य वेदमूर्ती श्री‌.उमेश वाळुंजकर आणि वेदमूर्ती श्री. बंडोपंत मुळे यांनी केले. 

धर्मसभेचे मंत्री श्री‌.दिनकर देशमुख आणि खजिनदार श्री.उमेश नगरकर यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष हभप श्री.निळकंठ महाराज देशमुख यांनी परिचय करून दिला. विश्वस्त श्री.समीर उपाध्ये, श्री.उदय वैकर, ऍड . अच्युतराव पिंगळे, अनंतराव देशपांडे, विश्व हिंदू परिषदेचे नगर जिल्हा धर्माचार्य संपर्क प्रमुख तथा प्रवचनकार श्री.मिलिंद महाराज चवंडके, संतोष बारसे, श्रीमती मालतीताई मुळे, कमलताई काळे, सुनंदाताई जगनाडे,   जयाताई घुटाळ, मनिषाताई दळवी, मायाताई देशमुख, सुरेखाताई देशपांडे, प्रतिभाताई मुळे, आदींसह शहराच्या विविध भागातील प्रतिष्ठित भाविक उपस्थित होते. 

वेदमूर्ती श्री चकोर गुरू मुळे पुढे म्हणाले, आज सर्व उत्तम सुविधा सहज उपलब्ध असताना माणूस सुख-शांती-समाधान शोधतो, ही वस्तुस्थिती आहे. विधीवत कर्माने शांती प्राप्त होते, हे लक्षात घेतले पाहिजे. प्राणायामाने शरीरातील दोष नष्ट होतात. शरीर निरोगी रहाते. मृत्यू टाळता येतो. कुलदैवत आणि कुलस्वामिनीच्या संकल्पपूर्वक पूजनाने सर्व संकटांचा परिहार होतो. इस्टेटसाठी रक्ताचे नाते तोडणारे,   इतरांना त्रास देण्यात आनंद मानणारे पाहून आपल्याच दु:ख होते. शत्रू बुध्दी विनाशाय असा व्यापक विचार हिंदू संस्कृती करते. 

आपल्या घराण्यातील कुलधर्म परंपरा, रूढी, रितीरिवाज अत्यंत श्रध्देने जतन करत दैनंदिन सत्कर्म करत राहिले तर आयुष्य सुकर होते.

समाजकारण, राजकारण, तीर्थयात्रा, व्यवसाय असे सर्व पातळ्यांवर काम करणारे घरातील देवांना मात्र विसरतात! दररोज आपल्या देवघरातील देवांना नैवेद्य दाखवून मगच भोजनास बसण्याची सवय घरातील सर्वांनी लावून घेवून घरातील शांती, सुखाचा मार्ग प्रशस्त झाल्याचे अनुभवावे. दैनंदिन कर्म करताना आपल्याला कोणताही दोष लागणार नाही याची काळजी घेत करा. आपण भगवंताच्या सृष्टीत रहातो, यांचे सतत स्मरण ठेवा. यज्ञयागादी सोहळ्यात सहभागी होऊन जीवनाचा आनंद घ्या, असे आवाहन करताना वेदमूर्ती श्री चकोर गुरू मुळे यांनी यज्ञ मंडपासह शास्त्रोक्त यज्ञकुंड, स्थापित देवता, संकल्प, आवाहन, आवर्तन, पूर्णाहुती यामधील बारकावे नेमकेपणाने सांगितले. उपस्थितांना ते अधिक भावले.


Post a Comment

0 Comments