गणेशोत्सवात जिवंत देखाव्यांनी भरला रंग
कमानी, झालरी, विद्युत रोषणाईने शहरात उत्सवी वातावरण
नगर : गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. तसेच शहरातील रस्ते कमानी,झालरींनी सजले होते. त्यानंतर दोन-तीन दिवसातच विशाल गणपती मंदिर, शमी गणपती मंदिर, विश्व हिंदू परिषदेचे गणेश मंदिर आणि दिल्ली दरवाजा आदि विविध रस्त्यातून विद्युत रोषणाईचा साज चढल्याने शहराला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले.
उत्सवाच्या सुरुवातीपासूनच डीजेच्या कांठाळ्याना आळा बसल्याने संपूर्ण गणेशोत्सव पारंपारिक वाद्याच्या पथकांच्या निर्णयात दुमदुमला, त्यातच यंदा बहुतेक ठिकाणी जिवंत देखावे सादर करण्यात आल्याने निरनिराळ्या कलापथकांमध्ये उत्तर उत्साहाचे वातावरण दिसून आले. नगरकरांनी ही या कलापथकांचे देखावे पाहण्यासाठी गर्दी केल्याने कलाकारांचा उत्साह द्विगुणित होताना दिसला.
खरंतर शनिवार-रविवारी या कलापथकांच्या देखाव्याना उद्घाटनाने सुरुवात झाली. मात्र सोमवारी शहरात झालेल्या मुसळधार पावसाने प्रेक्षकांच्या आनंदावर विरजण पडल्याचे चित्र निर्माण झाले, मात्र मंगळवारी पावसाने उघडीप दिल्याने गणेश भक्तांनी देखावे पाहण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे गणेश भक्तांच्या गर्दीने नगरचे रस्ते फुलून गेल्याचे दृश्य पहावयास मिळाले.
माणिक चौक येथील जय हिंद तरुण मंडळाने विष्णूचा दशावतार हा जिवंत देखावा सादर केला या मंडळाचा देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती. देखावा सादर झाल्यानंतर प्रेक्षकातून टाळ्यांच्या कडकडाटाने पसंतीची पावती दिली जायची. तर माळीवाड्यातील नवजवान तरुण मंडळाचे महिषासुराचा वध हा जिवंत देखावा सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली. कपिलेश्वर मंडळाने यंदा भेसळमुक्त महाराष्ट्र या विषयावरील जिवंत देखावा सादर केला. माळीवाडा युवक मंडळांनी वटपौर्णिमेचा हलता देखावा सादर करून भक्तांची गर्दी खेचली.
टिळक रस्त्यावरील टिळक मित्र मंडळांनी यंदा खंडेरायाच्या विवाहाचा सोहळा हा जिवंत देखावा सादर केला. या देखाव्यातील गीतांनी आणि नृत्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
तोफखान्यातील जंगूभाई तालीम येथील सिद्धेश्वर मित्र मंडळाने यंदा पावनखिंड हा जिवंत देखावा सादर केला ऐतिहासिक प्रसंग आणि त्याचे सादरीकरण यामुळे या ऐतिहासिक प्रसंगांना नव्याने उजाळा मिळत असल्याने गणेश भक्तही त्यात रममाण होताना दिसले. रंगार गल्ली येथील वरद विनायक ट्रस्टने यंदा शिवराज्याभिषेकाचा जिवंत देखावा सादर केल्याने तिथेही गणेश भक्तांनी अलोट गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. राज्याभिषेकानंतर प्रेक्षकातूनही छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जल्लोष होताना दिसला.
यंदा पारंपारिक देखाव्यांपेक्षा जिवंत देखाव्यांचे सादरीकरण जास्त झाल्याने प्रेक्षकांमध्येही कुतुहलाचे वातावरण होते. यावर्षी हा प्रयोग काहीसा नवीन असल्याने गणेश भक्तांनी ही भरभरून प्रतिसाद दिला. हा प्रयोग खरच यशस्वी ठरला असेल तर पुढील वर्षी यापेक्षा जास्त ठिकाणी जिवंत देखाव्यांचे सादरीकरण होईल . यानिमित्ताने या नव्या प्रयोगाला सुरुवात झाली हे या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
0 Comments