'मॉडरन फामिली' चा नाट्यप्रपंच प्रेक्षकांना भावला
नगर केंद्रातील 64 व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सभागृह हास्यकल्लोळ,टाळया,शिट्यांनी दुमदुमले
एका जुनाट घरात मध्यमवर्गीय परचुरे कुटुंब राहते कुटुंबात सदानंद परचुरे त्यांची बायको दोन मुले आणि त्यांचा चुलत भाऊ असे पाच सदस्य राहत असतात. वडिलोपार्जित घर असल्याने घर जुनाट वाटते अशातच सुधा परचुरेंच्या बहिणीचा फोन येतो, गप्पामध्ये तिने घर बांधायला काढल्याचे सांगते. तुम्ही पण तुमचे घर नवीन करा असे सुचवते. ही गोष्ट सुधा परचुरेच्या डोक्यात घर करून बसते. तसेच ती घरातील सदस्यांना नवीन घर बांधण्यासाठी आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करते आणि नवऱ्याच्या मागे लागते सुरुवातीला नवरा टाळाटाळ करतो. मात्र सुधा परचुरे आणि तिच्या मुलांच्या डोक्यात नवीन घर करण्याची आणि मॉडर्न बनण्याचे पक्क बसलेले असते.
एकदा सुधा परचुरे पिकनिक साठी मैत्रिणींबरोबर महाबळेश्वरला जातात आणि जाताना बजावते की मी दोन दिवसांसाठी जात आहे मी येईपर्यंत घराचा निर्णय झाला पाहिजे. ती महाबळेश्वरला जाते इकडे परमानंद परचूरे आपल्या नामांकीत इंजिनियर मित्राला घरी बोलवतो आणि घराच्या नूतनीकरणाची कल्पना सांगतो बाळूकाका, पमाकाका आणि इंजिनियर यांच्यामध्ये चर्चा होते. मात्र घर नूतनीकरणाचा खर्च वाढीव सांगितल्याने बाळूकाका काही कमी होणार नाही का अशी विचारणा करतात. तसं तो इंजिनियर ऐपत नसेल तर नवीन घर बांधू नका अशी त्यांची हेटाळणी करतो त्यावर पमाकाका चिडून बाळूकाकांकडून मोबाईल घेऊन त्यांच्या एका खात्यातील रक्कम तीन करोड असल्याचे दाखवतो आणि बाळूकाका हे एका सरकारी खात्यात प्रथमवर्ग अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले असल्याचे सांगतो. तो इंजिनियर निघून जातो पण तेवढ्यात अभिनंदन परचुरे तिथे येतो आणि तो या तिघांचे संभाषण ऐकल्यावर आपल्याकडे इतके पैसे आहेत? असं आश्चर्याने विचारतो तेव्हा बाळूकाका आणि पमाकाका काही -बाही बोलून विषय बदलतात पण अभिनंदन परचुरेला आपल्या वडिलांकडे बक्कळ रक्कम असल्याची कल्पना येते. आणि त्या आधारे तो आपल्या मॉडर्न होण्याचे स्वप्न रंगवतो .
इतक्यात सुधा परचुरे महाबळेश्वर हून परत येते. तेव्हा तिचा पेह राव बदललेला असतो. त्या मॉडर्न झालेल्या असतात . डोळ्यावर गॉगल,अंगात जीन्स टी-शर्ट,हातात लिपस्टिक आणि मोबाईलवर तोंडाचा चम्बू करून सेल्फी काढत असताना त्या प्रवेशतात त्यामुळे घरातून सदस्यांची त्यांना ओळखण्यात त्रेधा उडते आणि तसे सगळेच कुटुंबीय मॉडर्न होण्याच्या नादात बाळूकाकांच्या मागे घराच्या नूतनीकरणासाठी लकडा लावतात. नाईलाजाने बाळूकाका घराचे नूतनीकरण करण्यास राजी होतात. पुन्हा एकदा इंजिनियरला बोलून नूतनीकरणाचा प्रस्ताव पुढे सरकावला जातो. त्यासाठी इंजिनियरशी करार करण्यात येतो. घरातील सामानाची इतरत्र हलवाहलव करावी लागणार असते ' बाळूकाकांना आपल्या जुन्या आठवणी उचंबळून येतात ते काही प्रसंग सांगतात आणि टीव्हीकडे बोट दाखवत म्हणतात की हा टीव्ही आपण देऊन नवीन टीव्ही घेऊ. तेव्हा सुधा परचूरे यांना त्यांच्या लग्नानंतरचा किस्सा आठवतो ,नाही आपण हा टीव्ही बदलायचा नाही.
लाकडी सोफ्याच्या ऐवजी लेदरचा सोफा घेऊ असे बाळूकाका म्हणतात तेव्हा शुभेच्छा परचुरे त्याला विरोध करते. असे होताहोता प्रत्येकालाच मॉडर्न होण्याच्या नादात आपण कसे वाहवत गेलो याची जाणीव होते . आणि सगळ्यांच्या तोंडून आपण हे जुने घर पाडायला नको असा विचार पुढे येतो तेव्हा बाळूकाका म्हणतात की आपण करार करून बसलोय तेव्हा पमाकाका म्हणतो तो करार रद्द करण्यासाठी आपण काहीही करू इतक्यात इंजिनियर तेथे येतो. तो सामानाची हलवा हलवायची कल्पना देतो तेव्हा बाळूकाका त्यांना घराच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव रद्द झाल्याचे सांगतात, तेव्हा तो इंजिनियर मग कशासाठी हा टाइमपास केलात ,माझा वेळ आणि आर्थिक नुकसान केलं असा त्रागा करतो. मग त्याचवेळी बाळूकाका त्याला सांगतात की घराच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव रद्द झाला असला तरी नवीन जागेत नवीन घर बांधायचे आहे, तेव्हा तुमचे आर्थिक नुकसान होणार नाही. असे म्हणतात आणि सर्वच परचूरे कुटुंबात आनंद निर्माण होतो. अशा आशयाच्या कथानकावर बेत लेली ही विपुल महापुरुष यांची हलकीफुलकी संहिता नगरच्या अहमदनगर फिल्म फाऊंडेशन च्या नाट्य संघाने सादर केली .
तिचे दिग्दर्शनही त्यांनीच केले असल्याने कथानक खुलवण्यात आणि नाटकात हास्याची खसखस पिकवण्यात ते यशस्वी झाले आहेत . कथानकातील सदानंद परचूरे बाळूकाका हे पात्र श्रेणिक शिंगवी यांनी अत्यंत संयत अभिनयाने वटवल्याने ते अगदी या भूमिकेत चपखल बसले. सुधा परचुरेंच्या भूमिकेत आणि मॉड भूमिकेत उज्वल कुलकर्णी ठीक वाटल्या .,शुभेचछाच्या भूमिकेत अद्वैता सुद्रिक, संगीता मावशी च्या भूमिकेत चिन्मयी खताळ, बाबूराव भाऊजीच्या भूमिकेत अक्षय मस्के, रोहित बिल्डरच्या भूमिकेत तेजस आंधळे, बंडू घाडगे च्या भूमिकेत अक्षय म्हस्के बबलूच्या भूमिकेत सोहम सब्बन , बोबड्याच्या भूमिकेत अजय घंगाळे यांनी आपापल्या भूमिका जबाबदारीने पार पाडल्याने सादरीकरणातील रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. सर्वांचे अचूक संवादफेकीतून वाचिक विनोदाची निर्मिती उत्तम होत होती. बबलूच्या भूमिकेत काम करताना सोहम सब्बन यांनी कायिक अभिनयातूनही उत्तम विनोद निर्मिती केली. नाटकाची प्रकाशयोजना भारती लिमकर, पार्श्वसंगीत अविष्कार ठाकूर, रंगभूषा आबा सैंदाणे, वेशभूषा भक्ती आणि ग्रीष्मा महापुरुष ,नृत्यदिग्दर्शन सागरआलचिट्टी आणि नेपथ्य आनंद रिसे यांनी आपापल्या जबाबदाऱ्या चोख पार पाडल्याने नाटकाला एक वेगळा आयाम मिळाला. गीतकार संगीतकार म्हणून विपुल महापुरुषांनीच काम पाहिल्याने प्रत्येक प्रवेशानंतर वाजणारे संगीत कथानकाला पुढे घेऊन जाण्यासाठी सहाय्यभूत ठरले. तसेच सागर आलचीट्टी यांचे नृत्य दिग्दर्शन नाटकाला सिनेमॅटिक फील देण्यात यशस्वी झाले. फिल्मी स्टाईल नृत्य आणि उत्तम विनोद निर्मिती यामुळे मॉडरन फामिलीचा फार्सिकल नाट्य प्रपंच प्रेक्षकांना खेळवून ठेवण्यात यशस्वी झाला.

.jpg)



0 Comments