“…तर मी भाजपाचा प्रचार करेन”, अरविंद केजरीवाल

  “…तर मी भाजपाचा प्रचार करेन”, अरविंद केजरीवाल 

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर केजरीवाल दिल्लीतील जनतेशी संपर्क साधत आहेत. 

नवी दिल्ली  : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी रविवारी (६ ऑक्टोबर) छत्रसाल स्टेडियमवर जनता न्यायालयाचं आयोजन केलं होतं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच ते थेट पंतप्रधान मोदी यांना आव्हान देत म्हणाले, “आज मी नरेंद्र मोदींना एक आव्हान देऊ इच्छितो. फेब्रुवारी २०२५ मध्ये दिल्ली विधानसभेची निवडणूक होणार आहे. दिल्लीच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी २२ राज्यांमध्ये वीज मोफत केली तर मी दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाचा प्रचार करेन”.

अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत वाढलेल्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला धारेवर धरलं. त्यांनी दिल्लीतल्या गुन्हेगारीच्या घटनांची आकडेवारी मांडली आणि म्हणाले, दिल्लीतलं वातावरण गंभीर आहे. इथल्या रस्त्यांवर दिवसाढवळ्या गोळीबाराच्या घटना घडत आहेत. ठिकठिकाणी गुंड्डांनी त्यांचे अड्डे  बनवले आहेत. ९० च्या दशकात मुंबईची जशी अवस्था होती अगदी तशीच अवस्था आज दिल्लीची करून ठेवली आहे. गुन्ह्यांची कित्येक प्रकरणं पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचतच नाहीत. अनेक प्रकरणांमध्ये पोलीस एफआयआर दाखल केले जात नाहीत. सामान्य जनता दिल्लीत सुरक्षित नाही. त्यांचं सुरक्षित जगणं कठीण झालं आहे. दिल्ली पोलीस भाजपासाठी काम करत आहेत.

भाजपा गरीबविरोधी आहे : केजरीवाल

बस मार्शलच्या मुद्यावरून भाजपावर हल्लाबोल करत केजरीवाल म्हणाले, राजकारणात यायच्या आधी मी १० वर्षे येथील झोपडपट्ट्यांमध्ये काम केलं आहे. दिल्लीतली बससेवा मोडकळीस आली आहे. एखादी महिला बसमध्ये चढते आणि तिला बसमध्ये जागा मिळत नसल्यामुळे ती उभी राहते. त्यानंतर तिच्याशी कसा व्यवहार होतो? महिला सुरक्षेचा मुद्दा आपल्यासमोर आहेच. याबाबत मी तीन-चार वेळा उपराज्यपालांशी चर्चा केली. त्यांना म्हणालो, बस मार्शलना थांबवू नका, महिला सुरक्षेसाठी मार्शल गरजेचे आहेत. ही सर्व गरीब मुलं आहेत. मार्शल म्हणून काम करतात आणि त्यांना महिन्याला १५ हजार रुपये मिळत होते. मात्र भाजपाने हे सगळं बंद केलं. कारण भाजपा गरीबविरोधी आहे.

यावेळी केजरीवाल दिल्लीमधील जनतेला आश्वासन देत म्हणाले, “मी आता तुमच्यासमोर आलो आहे. तुमची सगळी कामं करेन. तुमच्या नोकऱ्या तुम्हाला परत करेन, पगारही द्यायला लावेन”. कामावरून काढून टाकलेल्या बस मार्शलना केजरीवाल म्हणाले, “तुमचा थोरला भाऊ परत आला आहे. आता आपण सगळेजण मिळून ही लढाई लढुया”.

Post a Comment

0 Comments