तिरुपती लाडू प्रकरणी आज सर्वोच्च सुनावणी
गेल्या सुनावणीत आंध्र सरकारला दिला होता सल्ला
नवी दिल्ली : तिरुपतीमध्ये प्रसादाचे लाडू बनवताना प्राण्यांच्या चरबीच्या कथित वापराची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी सुनावणी करणार आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला शुक्रवारी सकाळी 10:30 वाजता सुनावणी घेण्याची विनंती केली.
यापूर्वी या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता होणार होती. मेहता यांनी न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला सांगितले की, तुम्ही परवानगी दिली तर मी शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता उत्तर देऊ शकतो का? खंडपीठाने ही विनंती मान्य करत शुक्रवारी यावर सुनावणी करणार असल्याचे सांगितले.
30 सप्टेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी करताना, खंडपीठाने मेहता यांना राज्य नियुक्त केलेल्या एसआयटीचा तपास सुरू ठेवायचा की स्वतंत्र एजन्सीद्वारे तपास करावा हे ठरवण्यास मदत करण्यास सांगितले होते, तसेच सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने विचारले होते की काय आहे लाडू बनवताना भेसळयुक्त तूप वापरल्याचे दाखवणारे पुरावे? निदान देवांना राजकारणापासून दूर ठेवलं जाईल, अशी आम्हाला आशा आहे. चौकशीचे आदेश दिले होते तर मग प्रेसमध्ये जाण्याची काय गरज होती? तिरुपती लाडू वादावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, हा विश्वासाचा विषय आहे. जर भेसळयुक्त तूप वापरले गेले असेल तर ते अस्वीकार्य आहे.
आंध्र प्रदेश सरकारला अनेक प्रश्न विचारण्यात आले
सुप्रीम कोर्टाने आंध्र प्रदेश सरकारला विचारले की, प्रसाद लाडू बनवण्यासाठी दूषित तूप वापरले जाते की नाही? टीडीपीची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा म्हणाले की, लाडूंची चव चांगली नसल्याच्या तक्रारी लोकांनी केल्या होत्या. लोकांना याची माहिती नव्हती, तुम्ही फक्त विधान केले आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. प्रसादासाठी दूषित तूप वापरल्याचा कोणताही पुरावा नाही.
0 Comments