अर्णव गोस्वामींच्या व्हाट्सअॅप चॅटिंगचे काय झाले ?देशाला कळेल का ?
वेब टीम मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरून सध्या राज्यातील सत्ताधारी व विरोधकांमध्ये राजकारण रंगलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यानंतर आता काँग्रेसही भाजपला कोंडीत पकडण्यासाठी सरसावली आहे. 'व्हॉट्सअॅप चॅट'चे हवाले देऊन आर्यन खानच्या जामिनास सध्या विरोध केला जात आहे. तोच धागा पकडून काँग्रेसनं रिपब्लिक टीव्हीचे मालक अर्णब गोस्वामी यांच्या 'व्हॉट्सअॅप चॅट'बद्दल तपास यंत्रणांना प्रश्न केला आहे.
'नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) ही संस्था भाजप सरकारच्या सांगण्यावरून बॉलिवूडमधील कलाकारांना त्रास देत आहे. त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करत आहे. भाजपसाठी ही संस्था वसुलीचा धंदा करत आहे', असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या आरोपांनंतर आता काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅटचा हवाला देऊन एनसीबीनं त्याला कोठडीत अडकवलं आहे. त्याला जामीन मिळू देण्यास विरोध केला जात आहे. आर्यन खाननं एनसीबीच्या युक्तिवादाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. 'माझ्या व्हॉट्सअॅप संदेशांचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. त्यातून कुठलीही गुप्त माहिती पुढं आलेली नाही, असा दावा आर्यन खाननं उच्च न्यायालयात केला आहे.
हे सगळं सुरू असतानाच अतुल लोंढे यांनी टीआरपी घोटाळा प्रकरणातील व्हॉट्सअॅप चॅटचा मुद्दा चव्हाट्यावर आणला आहे. टीआरपी घोटाळ्यात बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून अनेक गोष्टी पुढं आल्या होत्या. रिपब्लिक टीव्हीचे मालक, संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासोबत दासगुप्ता यांच्याशी झालेले व्हॉट्सअॅप संभाषणही व्हायरल झाले होते. त्यानंतर देशभर खळबळ उडाली होती. या चॅटमध्ये टीआरपी कृत्रिमरित्या बदलविषयी चर्चा होती. पंतप्रधान कार्यालयाचाही त्यात उल्लेख होता. मात्र, पुढं यातून काहीच निष्पन्न झालं नाही. अर्णब गोस्वामी यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. हाच मुद्दा अतुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे. 'अर्णब गोस्वामींच्या त्या चॅटचे काय झाले? हे देशाला कळेल का?,' असा सवाल अतुल लोंढे यांनी केला आहे.
0 Comments