३९ सदस्यांचे व्हीपच्या विरोधात मतदान

३९ सदस्यांचे व्हीपच्या विरोधात मतदान

"लोकशाहीची पायमल्ली केली हे इतिहास कधी विसरणार नाही": सुनील प्रभू 

वेब टीम मुंबई : विधीमंडळाचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी शिवसेना पक्षाकडून राहुल नार्वेकर यांचे विधानसभा अध्यक्ष झाल्याबद्दल अभिनंदन केले, यावेळी त्यांनी “या सदनात आमचा व्हीप झुगारून ३९ सदस्यांनी या व्हीपच्या विरोधात मतदान केलं, लोकशाहीची पायमल्ली केली हे देखील इतिहास कधी विसरणार नाही. त्यामुळे याची देखील खंत ही संपूर्ण विधीमंडळाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात असेल.” असं म्हणत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.

आमचं दु:ख विसरून आम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल दु:ख वाटलं –

सुनील प्रभू म्हणाले, “आपला राजकारणातील प्रवास जर बघितला तर आपण कधीकाळी आमच्या शिवसेनेत होता, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलात आणि भाजपात काम करत असताना, त्या बाकावरून इकडे बघत असताना ज्या पद्धतीने विधीमंडळात आपण आपले विचार मांडत होता. कायदा समजावून सांगण्याचा प्रयत्न तिकडे असणाऱ्या सभापतींच्या समोर मांडण्याचा प्रयत्न आपण करत होता. त्यावेळी कधीतरी असं वाटलं होतं आणि सत्तांतराचे वारे जेव्हा दहा-पंधरा दिवसांपूर्वी वाहू लागले होते, तेव्हा असं वाटलं होतं की राहुल नार्वेकर हे कदाचित या राज्याचे कायदामंत्री होतील. परंतु दुर्दैवं आहे. दुर्दैवं असं आहे की नशीबाचे फेरे कधीही फिरू शकतात आणि नियती कधीही कोणावरही आघात करू शकते, या राज्यात असंही घडू शकतं की, ज्यांना आम्ही मुख्यमंत्री म्हणून बघत होतो, त्यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. ज्यांना कायदामंत्री म्हणून आम्ही बघत होतो त्याला विधानसभा अध्यक्ष व्हावं लागलं. ही पण एक अतिशय चांगली बाब आहे, पण दुर्दैवाने आम्ही जेव्हा वृत्तवाहिनीवर बघत होतो, ज्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना दूर व्हावं लागलं. त्या ठिकाणी या सदनामध्ये विरोधी पक्षनेते म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी स्वत:ची एक चमक, स्वत:चं एक कर्तृत्व संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला दाखवलं, ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटलं पण त्यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. हे ऐकून आमचं दु:ख विसरून आम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल दु:ख वाटलं, हे एक मित्र म्हणून मला या ठिकाणी सांगावास वाटलं.”

…त्यामुळे आम्हाला जास्त न्याय देण्याचा प्रयत्न कराल असं वाटतं –

तसेच, “अध्यक्ष महोदय आज ज्या खुर्चीवर आपण विराजमान झालात, त्याबद्दल या सभागृहातील सर्व सदस्य आणि महाराष्ट्राच्या जनतेला फार मोठी आपुलकी आणि अभिमान आहे. आपल्या बद्दलचा जो मान, सन्मान आणि लोकशाही पद्धतीने आपल्याला असलेला अधिकार आहे. त्या अधिकाराचा वापर या विधीमंडळातील सत्ता पक्षाचे आणि विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निश्चित कराल, असा विश्वास आम्हाला आहे. त्यामळे ज्या अतिउच्च स्थानावर आपण बसलात, त्या ठिकाणी बसल्यानंतर योगायोग असा आहे, की आपण ज्या स्थानावर बसला आहात त्याच्या बरोबर समोरच्या स्थानावर आम्ही बसलो आहोत. त्यामुळे आमच्याकडे आपलं जास्त लक्ष असेल, कारण आपण पूर्वीचे आमचे नैसर्गिक मित्र होता आणि त्यामुळे आम्हाला जास्त न्याय देण्याचा प्रयत्न कराल असंही या ठिकाणी वाटतं.” असं यावेळी सुनील प्रभू यांनी म्हटलं.

त्या खुर्चीवर आपण कितीकाळ बसाल या बद्दलची शंका देखील राज्याच्या जनतेला –

याचबरोबर, “आज या अध्यक्षपदाच्या निवडीत ज्या पद्धतीचा सुरुवातीपासून ते आतापर्यंतचा क्रम होता. त्या क्रमामध्ये ज्या पद्धतीने ही निवडणूक झाली, त्या निवडणुकीत मला या ठिकाणी आपलं अभिनंदन करत असताना एक अभिमान आहे. परंतु, आपण अध्यक्ष होत असताना या सदनात आमचा व्हीप झुगारून ३९ सदस्यांनी या व्हीपच्या विरोधात मतदान केलं, लोकशाहीची पायमल्ली केली हे देखील इतिहास कधी विसरणार नाही. त्यामुळे याची देखील खंत ही संपूर्ण विधीमंडळाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात असेल, हे देखील या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं. ३९ सदस्यांनी जो व्हीप मोडून मतदान केलं आहे, त्यामुळे या संपूर्ण विधीमंडळाचा कार्यकाल किती काळ असेल आणि त्या खुर्चीवर आपण कितीकाळ बसाल या बद्दलची शंका देखील राज्याच्या जनतेला आहे हे दुर्दैवाने मला या ठिकाणी नमूद करावसं वाटतं.” असं देखील सुनील प्रभू यांनी यावेळी बोलून दाखवलं.

Post a Comment

0 Comments