कर्जाच्या वसुलीसाठी व्हायरल केली महिलेची नग्न छायाचित्रे

कर्जाच्या वसुलीसाठी व्हायरल केली महिलेची नग्न छायाचित्रे  

वेब टीम मुंबई : मुंबईतील एक महिला देशातील वाढत्या ‘लोन अ‍ॅप’च्या फसवणुकीची बळी ठरली आहे. या महिलेने अ‍ॅपवरून कर्ज घेतल्यानंतर, वसुली एजंटांनी वसुलीसाठी महिलेची मॉर्फ केलेली नग्न छायाचित्रे तिच्या संपर्कातील लोकांना शेअर केली. या महिलेने Kreditloan नावाच्या अ‍ॅपवरून ५ हजार रुपयांचे कर्ज मागितले होते, मात्र तिला केवळ ३ हजार रुपये मिळाले. कर्ज घेतल्यानंतर आठवडाभरातच कर्जाची परतफेड करण्यासाठी धमकीचे फोन येऊ लागले. या महिलेला वेगवेगळ्या १४ मोबाईल क्रमांकांवरून आक्षेपार्ह मेसेजही पाठवण्यात आले. याप्रकरणी महिलेने एफआयआर दाखल केला आहे.

काही दिवसांपूर्वी, उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये, लोन अ‍ॅपवरून २ हजार ४०० रुपयांचे कर्ज घेतलेल्या एका महिलेने वसुली एजंटांनी व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये तिचे नग्न फोटो शेअर केल्याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

लोन अ‍ॅप फ्रॉड नेटवर्क चीनमधून चालते :

देशात गेल्या काही काळापासून चायनीज लोन अ‍ॅपच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करून लुटल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोट्यवधी रुपयांचा हा व्यवसाय चीनमधून चालतो. भारतात काम करणाऱ्या या चिनी लोन अ‍ॅप्सचे एजंट परदेशात बसलेल्या त्यांच्या मालकांना क्रिप्टोकरन्सीद्वारे पैसे पाठवतात.

या वर्षी एप्रिलमध्ये, दिल्ली पोलिसांनी कोट्यवधी रुपयांच्या चिनी लोन अ‍ॅप फसवणुकीच्या आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचा पर्दाफाश केला आणि देशभरातून एका महिलेसह आठ जणांना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लोकांना कर्ज दिल्यानंतर धमकावत असे, पैसे देण्याच्या नावाखाली पैसे उकळायचे. पोलिसांनी म्हणण्यानुसार, या अ‍ॅप्सचे मास्टरमाईंड चीनमध्ये आहेत, तसेच त्यांचे दुबई, हाँगकाँग, नेपाळ आणि मॉरिशसशीही लिंक आहेत. या लोन अ‍ॅप्सचे एजंट भारतातून क्रिप्टोकरन्सीद्वारे चीन, हाँगकाँग आणि दुबईला पैसे पाठवतात.याप्रकरणी दिल्लीत झालेल्या अटकेत पोलिसांना एकाच खात्यातून ८.२५ कोटी रुपये जमा झाल्याचे आढळून आले, तर इतर २५ खाती गोठवण्यात आली होती.

Post a Comment

0 Comments