यंदा बारावीचा निकाल ९४.२२ टक्के,कोकण एक नंबर
अनेक दिवसांपासून प्रतीक्षीत असलेला बारावी परीक्षेचा निकाल आज १ वाजता जाहीर झाला आहे.
वेब टीम मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) बारावीचा निकाल आज बुधवारी ८ जून २०२२ रोजी जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजता हा निकाल जाहीर झाला . निकालासंदर्भातील सर्व अपडेट्स या ठिकाणी पाहू शकता.
बारावी निकालात अमरावती विभाग तिसऱ्या स्थानी
अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. अमरावती विभागाचा निकाल ९६.३४ टक्के लागला आहे. निकालाच्या टक्केवारीत नऊ विभागीय मंडळांमध्ये अमरावती विभाग तिसऱ्या स्थानी आहे.
मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेसाठी अमरावती विभागातून एकूण १ लाख ५१ हजार २६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात १ लाख ५० हजार ११० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एकूण १ लाख ४४ हजार ६१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.३४ इतकी आहे. गेल्या वर्षी बारावीचा अमरावती विभागाचा निकाल ९९.३७ टक्के लागला होता, पण निकालाच्या टक्केवारीत अमरावती विभागाची घसरण आठव्या स्थानी झाली होती.
बारावीच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा; अपयशी विद्यार्थ्यांचे वाढवलं मनोबल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केलं आहे. तसेच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या असून अयशस्वी झालेल्या विद्यार्थ्याचं मनोबल वाढवलं आहे.
निकालाची एकूण आकडेवारी किती?
यावर्षी एकूण १४४९६६४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली, त्यापैकी १४३९७३१ विद्यार्थी बसले आणि १३५६६०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.२२ झाली आहे.
बारावीच्या निकालात मुलींची बाजी
बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी ९६.३५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर, ९३.२९ टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहेत.
गेल्यावर्षीच्या तुलनेत ५.३१ टक्क्यांनी यंदा कमी निकाल
राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२ टक्के लागला आहे, जो गेल्यावर्षीच्या तुलनेत ५.३१ टक्क्यांनी कमी झाला आहे. मागील वर्षी हा निकाल ९९.५३ टक्के लागला होता. २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
0 Comments