मानसिक व आर्थिक छळा विरोधात शिक्षकांचे उपोषण

मानसिक व आर्थिक छळा विरोधात शिक्षकांचे उपोषण 

वेब टीम नगर : अभिनव विद्यालय शिरापूर येथील सहशिक्षक शिनारे संतोष शंकर आणि कनिंगध्वज राम हरीभाऊ यांनी संस्थेकडून होणाऱ्या आर्थिक व मानसिक छळवादा विरुद्ध आज गुरुवार पासून शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. 

कर्जदारांनी बँकेचे कर्ज भरून आम्हास या प्रकरणातून मुक्त करावे.तसेच अभिनव विद्यालय शिरापूरच्या मुख्याध्यापकांनी आमची पगार कपात थांबवून कपात केलेली रक्कम परत द्यावी.तसेच या मुख्याध्यापकांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, बँकेने कर्जदारांकडून कर्जाची वसुली करावी, आम्हाला सहकर्जदार या जबाबदारीतून मुक्त करावे या मागण्यांचा साठी हे उपोषण सुरू केले आहे. 

अभिनव विद्यालय शिरापूर ता.पारनेर या विद्यालयाचे संस्थापक श्री.उचाळे मधुकर म्हातारबा यांनी आपले भागीदार चेमटे रावसाहेब व बाचकर  राजेंद्र या तीन व्यक्‍तींनी दूध प्रक्रिया केंद्रासाठी ३० लाख रुपये एवढे कर्ज जिजामाता सहकारी महिला बँक, शिरूर शाखा यांच्याकडून घेतले.या कर्जासाठी आम्हाला मुख्याध्यापकांच्या सहकार्याने जामीनदार करून घेतले.मुख्याध्यापक साठे कैलास रामचंद्र यांनी आमचे खोटे पगार दाखले परस्पर बँकेत पोहोच केले.  संस्थापक अध्यक्ष उचाळे मधुकर यांच्या संगनमताने व बळजबरीने आम्हाला सह्या करण्यास भाग पाडले.सदरचे कर्ज २००६ साली थकीत मध्ये गेल्याने आम्हांस बँकेच्या नोटिसा आल्या.या नोटिसा घेऊन उचाळे यांच्याकडे गेलो असता तुम्ही काळजी करू नका, मी कर्ज भरतो.असे तर कधी अरेरावीने तुमच्या जमिनी नावावर करून घेतलेल्या नाहीत अशी उत्तरे देऊन आम्हास कधी बँकेपर्यंत जाऊ दिले नाही. 

त्यानंतर सहा वर्षापर्यंत धनको बँकेने कर्जदारांकडे कोणताही पाठपुरावा केला नाही.  दि. २०-११-२०१२ रोजी शिनारे शंकर व कनिंगध्वज राम हरीभाऊ यांच्या पगारातून रुपये २५००/- प्रत्येकी असा वसुली आदेश काढला.या आदेशाला आम्ही वकिलांमार्फत रीतसर उत्तर दिले. 

या कर्ज प्रकरणासाठी कर्जदारांची करोडो रुपयांची मालमत्ता बँकेने तारण म्हणून घेतली आहे.तिचा लिलाव बँकेने २०१३ साली पुकारला होता. मात्र कोणीही ग्राहक मिळाला नाही असे गुळमुळीत उत्तर बँकेकडून मिळाले.सलग दोन वर्षे लिलाव पुकारल्यानंतर धनको बँकेने सर्व मालमत्ता स्वतःच्या नावे करणे अपेक्षित होते.मात्र, कर्जदार व बँक यांचे साटेलोटे असल्याने त्यांनी मालमत्ता आपल्या नावे न करता तशीच ठेवली.याचा परिणाम म्हणून २०१६ साली कर्जदारांना पैकी चेमटे रावसाहेब व बाचकर राजेंद्र यांनी त्यांच्या मालकीची बँकेस तारण असलेली मालमत्ता इतरांच्या नावे फिरवली किंवा विकली.  वास्तविक पाहता बँकेच्या परवानगी शिवाय तारण मालमत्तेचे व्यवहार होऊ शकत नाही.मात्र या प्रकरणात मालमत्ता दुसऱ्यांच्या नावावर झाल्यानंतर सातबारावर बँकेचा बोजा किंवा नाव दिसत नाही.त्याचा अर्थ कर्जदारांची मालमत्ता विकण्यास बँकेची संमती होती. 

मालमत्ता विकल्यानंतर पुन्हा बँक तीन वर्ष शांत राहिली.२५ जुलै २०१९ रोजी संतोष शिनारे व राम कनिंगध्वज यांच्या पगारातून रुपये २२,०००/- कपात करण्याचा आदेश काढला.विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास साठे यांनी कोणतीही शहानिशा न करता व पगार कपात केल्यानंतर शिक्षकांच्या हातात येणाऱ्या १०००/- रुपयात उदरनिर्वाह चालू शकतो की नाही याचा विचार न करता नियम व कायदे पायदळी तुडवून गेली तीन वर्षे आजतागायत ही कपात सुरू ठेवली आहे. 

गेल्या तीन वर्षापासून आम्ही दोघे सहशिक्षक तीनही कर्जदारांकडे कर्ज भरण्यासाठी गयावया करत असून त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही.उलट कर्जदार, बँक व मुख्याध्यापक "तुमच्या पद्धतीने काय करायचे ते करा" अशी बेजबाबदार उत्तरे देतात. 

या प्रकरणामुळे आमची परिस्थिती बिकट झाली असून पगाराव्यतिरिक्त कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने आणि आम्हा दोघांवर प्रत्येकी सहा जण अवलंबून असल्याने आमचे कुटुंबीयही प्रचंड मानसिक तणावात आहेत.या परिस्थितीत आमचे व आमच्या कुटुंबीयांपैकी कोणाचेही काही बरेवाईट झाल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी कर्जदार, बँक व विद्यालयाचे मुख्याध्यापक यांच्यावर राहील असे शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

Post a Comment

0 Comments