मोबाईलसाठी महिलेचं हिसकावलं मंगळसूत्र

मोबाईलसाठी  महिलेचं हिसकावलं मंगळसूत्र


वेब टीम पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आरोपी तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. नवीन मोबाइल संच खरेदी करण्यासाठी त्यानं महिलेचं मंगळसूत्र हिसकावल्याची धक्कादायक माहिती पोलीस चौकशीत दिली आहे.अजय राजू शेरावत असं अटक केल्या १८ वर्षीय आरोपी तरुणाचं नाव आहे. तो पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील हिंगणगाव येथील रहिवासी आहे. त्यानं दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर परिसरात एका पादचारी महिलेचं मंगळसूत्र हिसकावलं होतं. मंगळसूत्र हिसकावल्यानंतर तो दुचाकीवरून फरार झाला होता. याप्रकरणी पीडित महिलेनं पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

दुचाकीच्या क्रमांकावरुन तपास केला असता अजय शेरावत यानेच महिलेचं मंगळसूत्र हिसकावल्याची माहिती ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी धीरज जाधव यांना मिळाली.त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी आरोपीला अटक केली. शेरावतची चौकशी केली असता, मोबाइल संच नसल्याने त्यानं महिलेचं मंगळसूत्र हिसकावल्याची कबुली पोलिसांना दिली.


मोबाइल नसल्याने गेम खेळता येत नव्हते .दागिने विकून येणाऱ्या पैशांतून मोबाइल संच खरेदी करणार होतो, असं त्यानं पोलिसांना चौकशीत सांगितलं. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके, उपनिरीक्षक शिवाजी ननावरे, अतुल डेरे, विजय कांचन, अमोल शेडगे आदींनी ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments