काश्मिरी पंडितांची सामूहिक स्थलांतराची मागणी

काश्मिरी पंडितांची सामूहिक स्थलांतराची मागणी 

सर्वत्र निदर्शने करण्याचा इशारा दिला

वेब टीम श्रीनगर :  टार्गेट किलिंगमुळे संतप्त झालेल्या काश्मिरी पंडितांनी जम्मू-काश्मीर सरकारला इशारा दिला आहे. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीर सरकारने २४ तासांत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा योग्य निर्णय घेतला नाही, तर ते खोऱ्यातून समूहाने स्थलांतर करतील.मंगळवारी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी आणखी एक टार्गेट किलिंग केली. याबाबत घाटीत प्रचंड संताप व्यक्त होत आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलगाममध्ये एका हिंदू शिक्षकाची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. यानंतर काश्मिरी पंडित पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. काश्मिरी पंडित खोऱ्यात ठिकठिकाणी निदर्शने करत आहेत.

जम्मू-काश्मीर सरकारने २४ तासांच्या आत त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा योग्य निर्णय न घेतल्यास ते खोऱ्यातून समूहाने स्थलांतर करतील, असा इशारा त्यांनी दिला. काश्मीरमध्ये पंतप्रधान रोजगार पॅकेज अंतर्गत काम करणाऱ्या काश्मिरी पंडितांनी कामावर बहिष्कार टाकला आहे. त्यांना घाटीत कैद्यांचे जीवन जगायचे नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांना खोऱ्या बाहेर हलवण्यात यावे. सरकार त्यांना मोठमोठी आश्वासनं देतं, पण त्यामुळे त्यांचा जीव सुरक्षित होत नाही.

श्रीनगरच्या बटवारा भागात काश्मिरी पंडितांनी रास्ता रोको केला आहे. येथे त्यांनी आपल्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको केला. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा खोळंबा झाला आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

12 मे रोजी काश्मिरी पंडित कर्मचारी राहुल भट यांची हत्या झाल्यापासून खोऱ्यात काश्मिरी पंडित आंदोलन करत आहेत. जोपर्यंत काश्मीरमधील परिस्थिती सामान्य होत नाही, तोपर्यंत त्यांची काश्मीरच्या बाहेर कुठेही बदली करावी, अशी त्यांची मागणी आहे. याविरोधात काश्मिरी पंडितांकडून खोऱ्यात ठिकठिकाणी निदर्शने सुरू आहेत.

शिक्षकाच्या हत्येचा निषेध करत मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विट केले की, "काश्मीरमधील सामान्य स्थितीबद्दल भारत सरकारचे खोटे दावे असूनही, हे स्पष्ट आहे की लक्ष्यित नागरी हत्या वाढत आहेत आणि चिंतेचे खोल कारण आहे. या भ्याड कृत्याचा निषेध करावा तितका कमी आहे.

दुसरीकडे, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी शिक्षकाच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे. ओमर अब्दुल्ला यांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले की, 'खूप दुःखी. निष्पाप नागरिकांवरील अलीकडील हल्ल्यांच्या दीर्घ यादीतील ही आणखी एक  हत्या आहे. निषेध आणि शोक व्यक्त करणारे शब्द पोकळ होत आहेत. परिस्थिती सामान्य होईपर्यंत ते स्वस्थ बसणार नाहीत, असे सरकारकडून केवळ आश्वासन आहे.

Post a Comment

0 Comments