अहमदनगर शहराच्या ५३२ व्या स्थापना दिनानिमित्त नगर जल्लोष २०२२ सांस्कृतिक कार्यक्रमाचे २८ मे ला आयोजन

अहमदनगर शहराच्या ५३२ व्या स्थापना दिनानिमित्त नगर जल्लोष २०२२ सांस्कृतिक कार्यक्रमाचे २८ मे ला आयोजन

सिनेअभिनेत्री मानसी नाईक यांचा नृत्याविष्कार तर डॉ.धामणे- नगरभूषण , डॉ. बागुल -एज्युकेशन आयकॉन,जितेंद्र तोरणे - बिझनेस आयकॉन पुरस्काराचे मानकरी 

वेब टीम नगर : येत्या २८ मे ला अहमदनगर शहराचा ५३२ वा स्थापना दिन मोठ्या धुमधडाक्यात आणि उत्साहात साजरा करण्याचे नियोजनच्या सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू ठरणाऱ्या नगर जल्लोष ट्रस्ट परिवाराने केले असून त्या अंतर्गत जॉगिंग ट्रक,सावेडी अहमदनगर येथे 'नगर जल्लोष २०२२ कला, संस्कृती, परंपरा' या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री मानसी नाईक यांचा नृत्याविष्कार, महाराष्ट्राची महागायिका सन्मिता शिंदे , मराठी इंडियन आयडॉल फेम कैवल्य केजकर यांचे बहारदार गीत गायन तर महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम गौरव मोरे आणि विनीत खरात या भन्नाट जोडीचे हास्याचे फवारे हे यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असल्याचे या उत्सवाचे स्वागताध्यक्ष तथा माजी महापौर बाबासाहेब वाकळे व नगर जल्लोष परिवाराचे अध्यक्ष व प्रमुख आयोजक सागर बोगा यांनी सांगितले.

शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असणाऱ्या नगर जल्लोष परिवाराच्या वतीने देण्यात येणारा मानाचा 'नगर भूषण' या पुरस्काराचेही वितरण या सांस्कृतिक कार्यक्रमात केले जाणार असून आपल्या सामाजिक कामाच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आणि देशात पोहचणारे डॉ धामणे यांना यंदाचा 'नगर भूषण २०२२' या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे तर विविध क्षेत्रात नगरचे नाव उंचावणाऱ्या डॉ.अमोल बागूल यांना एज्युकेशन आयकॉन तसेच उद्योजकीय  क्षेत्रात रोजगार व व्यवसाय कौशल्याच्या माध्यमातून मानदंड प्रस्थापित करणारे उद्योजक श्री जितेंद्र तोरणे यांना बिझनेस आयकॉन पुरस्कार जाहीर झाल्याची  माहिती आयोजकांनी दिली आहे.तसेच या वर्षीपासून वर्षभर चालणाऱ्या अनेक सामाजिक वैद्यकीय उपक्रमांचा होणार शुभारंभ होणार आहे.

     यावेळी प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री मुक्ता बर्वे, संदीप पाठक, नंदू माधव आणि सुहास शिरसाठ,ओंकार गोवर्धन हे ही उपस्थित राहणार असूनस्थानिक नगरकर कलाकारांना देखील यामध्ये प्रामुख्याने संधी देण्यात आलेली आहे, नगरकर रसिक प्रेक्षकांनी आपला ऐतिहासिक वारसा, आपली संस्कृती जपत साजऱ्या केल्या जाणाऱ्या या उत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक मेजवानीचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले.

       या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी शिंगवी ज्वेलर्स (मुख्य प्रायोजक ), लेट्स अप( प्रायोजक ),अहमदनगर महानगरपालिका व गौतम मुनोत प्रोडक्शन (सह प्रायोजक), रोज गोल्ड(हॉस्पिटॅलिटी पार्टनर), ब्रम्हा भोज(फुड पार्टनर ) ,रेडिओ सिटी ( रेडिओ पार्टनर ), व्यंकटेश मल्टीस्टेट ( विशेष सहकार्य ) आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.

        गेल्या बारा वर्षांपासून अहमदनगर शहराच्या स्थापना दिनानिमित्त विविध सांस्कृतिक, सामाजिक, पर्यावरण हिताच्या  कार्यक्रमांचे आयोजन करणारा नगर जल्लोष हा एक सामाजिक बांधिलकी जपणारा परिवार आहे. या परिवाराच्या माध्यमातून वर्षभर वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व सायकल वाटप, रक्तदान शिबिर, गरजू कुटुंबांना फराळ व अन्नधान्य वाटप या सारख्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले जाते. कोरोना काळात परिवाराने गरजू कुटुंबांना व व्यक्तींना अन्न पाकिटे, अन्नधान्य, आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथीक औषधीचे मोफत वितरण करण्याबरोबरच कोरोना काळात जीवावर उदार होऊन अहमदनगर शहर व शहरवासीयांसाठी झटणाऱ्या डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही मानपत्र व पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. 

       कार्यक्रमासाठी सर्वांना मोफत प्रवेश असून निमंत्रितांसाठी काही आसनं राखीव ठेवण्यात आल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.अधिक माहितीसाठी संयोजक सागर बोगा यांच्याशी  986061 2045 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments