राममंदिरासाठी देणगीपोटी दिलेले १५,००० चेक वटलेच नाहीत

राममंदिरासाठी देणगीपोटी दिलेले १५,००० चेक वटलेच नाहीत 

वेब टीम नवी दिल्ली : अयोध्येत साकारण्यात येणाऱ्या राम मंदिरासाठी देशभरातून देणगी गोळा करण्यात आली आहे. जवळपास पाच हजार कोटींहून अधिक निधी देणगीस्वरुपात 'श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला प्राप्त झाला आहे. मात्र त्यात एक धक्कादायक बाब आता समोर आली आहे. देणगीस्वरुपात प्राप्त झालेल्या एकूण चेक्सपैकी (धनादेश) तब्बल १५ हजार 'चेक बाउन्स' झाल्याचे निष्पन्न झाले आहे. बाउन्स झालेल्या चेक्सचे एकूण मूल्य २२ कोटी रुपयांच्या आसपास आहे.

सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निकालानंतर अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला होता. या भव्य मंदिर निर्माणासाठी केंद्र सरकारने 'श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ची स्थापन केली होती. काही महिन्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन सोहळा पार पडला होता.

श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरात लोकवर्गणीची मोहीम राबवण्यात आली. विश्व हिंदू परिषद आणि इतर सहयोगी संघटनांनी १५ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत देशभरातून राम मंदिरासाठी देणगी गोळा केली. ट्रस्टकडे जवळपास पाच हजार कोटींहून अधिक रक्कम देणगी स्वरूपात प्राप्त झाली आहे.

दरम्यान, देणगीमध्ये प्राप्त झालेल्या एकूण चेक्सपैकी तब्बल १५००० चेक बाउंस झाले आहेत. १५ हजार धनादेश न वटल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. या १५ हजार धनादेशांमध्ये एकूण २२ कोटींची देणगी अडकली आहे. विशेष म्हणजे यापैकी २००० चेक हे अयोध्येतून प्राप्त झाले होते.

'श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'च्या लेखापरीक्षणानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. देणगी देणाऱ्यांच्या खात्यात पुरेसे पैसे नसणे , चेकवर खाडाखोड, स्वाक्षरीमध्ये तफावत अशा कारणांनी चेक बाउन्स झाले असल्याची माहिती ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी दिली. ट्रस्ट बँकांशी समन्वय साधून काम करत आहे. चेक क्लिअर करण्याबाबत चुका सुधारण्यात येतील. ज्यांचे चेक बाउन्स झाले अशा व्यक्तींना चुका सुधारण्यासाठी बँका चेक परत करतील, असे डॉ. मिश्रा यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments