तीन खुनाच्या मालिकेने शहर हादरले ; तीन गुन्ह्यांत सात संशयित ताब्यात

तीन खुनाच्या मालिकेने शहर हादरले ; तीन गुन्ह्यांत सात संशयित ताब्यात

वेब टीम नाशिक : शहरात सोनसाखळी चोरी आणि घरफोडय़ांचे सत्र कायम असताना त्यामध्ये आता एका पाठोपाठ एक घडलेल्या तीन खुनाच्या घटनांची भर पडली आहे. म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच आनंदवल्ली भागात औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा खून झाला. शुक्रवारी पहाटे नाशिक-पुणे रस्त्यावरील पौर्णिमा बस थांब्यालगत टोळक्याने पुणे येथील एका व्यक्तीचा खून केला. या घटनाक्रमाने शहरात खळबळ उडाली आहे. या तीनही गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून एकूण सात संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिली आहे.

गुन्हेगारीचा आलेख उंचावत असून खूनाच्या मालिकेने शहर हादरले आहे. बुधवारी रात्री िदडोरी रस्त्यावर मित्रासमवेत गप्पा मारत बसलेल्या यश गांगुर्डेला संशयितांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. खूनाची दुसरी घटना आनंदवल्ली जवळील बंडकुळे मळा भागात घडली. औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या प्रथमेश खैरे या विद्यार्थ्यांचा मृतदेह आढळून आला होता. वैद्यकीय तपासणीत डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. शुक्रवारी पहाटे नाशिक-पुणे रस्त्यावरील पौर्णिमा बस थांब्याजवळ खूनाची तिसरी घटना घडली. त्यात हरिश पाटील (४४, वारजे जकात नाका, पुणे) या व्यक्तीचा एका टोळक्याने खून केल्याचे समोर आले. वातानुकूलीत यंत्राच्या दुरुस्तीसाठी शहरात आलेल्या पाटील यांची द्वारका चौकात नशेत असणाऱ्या काही युवकांशी बाचाबाची झाली. त्यातून टोळक्याने केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

तीन्ही घटनांमध्ये कारणे वेगळी

उपरोक्त तीनही गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून एकूण सात जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. म्हसरूळ पोलीस ठाण्यात दाखल यश गांगुर्डे या युवकाच्या खुनाच्या गुन्ह्यात तीन संशयितांना पकडण्यात आले. त्यांचा एक साथीदार अद्याप फरार आहे. गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रथमेश खैरे या विद्यार्थ्यांचा मृतदेह आढळून आला होता. वैद्यकीय तपासणीत डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यात एका संशयिताला ताब्यात घेतले गेले असून दोघांचा शोध सुरू आहे. संबंधित युवक आणि संशयित हे परिचयातील आहेत. घरच्यांकडे चुगली करतो, या कारणावरून संशयितांनी प्रथमेशचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे नाईकनवरे यांनी सांगितले. प्रेम प्रकरणातून ही घटना घडल्याची चर्चा असल्याच्या प्रश्नावर त्यांनी तपासात कारणांची स्पष्टता होईल असे नमूद केले. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पौर्णिमा बस थांब्यावर पहाटेच्या सुमारास घडलेला गुन्हा आव्हानात्मक होता. पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत तिघांना ताब्यात घेतले असून अन्य एकाचा शोध सुरू आहे. वातानुकूलीत यंत्रणेचे काम करणारे हरीश पाटील हे पुण्याहून पहाटे द्वारका चौकात उतरले होते. तिथे काही कारणास्तव दुचाकीवरील युवकांशी त्याची बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसन खूनात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वेगवेगळय़ा भागात घडलेल्या तिन्ही खुनाच्या घटनांचा परस्परांशी कुठलाही संबंध नाही. त्यात कुठलाही समानधागा आढळून आला नसल्याचे नाईकनवरे यांनी नमूद केले.

पोलीस रस्त्यावर

सोनसाखळी चोरीच्या घटनांना लगाम घालण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे. सोनसाखळी चोरटय़ांमध्ये काही स्थानिक व बाहेरील इराणी टोळय़ांचाही सहभागी आहे. त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहे. शहरात टोळय़ांसह गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या व्यक्तींवर कारवाई केली जात आहे. पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरली असून गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी त्याचा उपयोग होईल याकडे पोलीस आयुक्तांनी लक्ष वेधले.

मुलाचा खून करून पित्याची आत्महत्या

वादातून वडिलांनी मुलाची हत्या करत स्वत: आत्महत्या केली. पंचवटीत ही घटना घडली असून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचवटीतील सीता गुंफा परिसरात जगदीश जाधव हे एका इमारतीत पत्नी आणि मुलांसमवेत राहत होते. बुधवारी रात्री जाधव कुटूंबियांनी एकत्रित जेवण केले. जेवणानंतर सर्वजण आपआपल्या खोल्यांमध्ये झोपण्यासाठी गेले. बुधवारी सकाळी जाधव यांची पत्नी उठल्यानंतर त्यांना पती जगदीश (४८) हे पंख्याला लटकलेले दिसले. हा प्रकार पाहून त्या घाबरल्या. प्रणव (१८) या मुलास उठविण्यासाठी त्या दुसऱ्या खोलीत गेल्या असता तोही मृतावस्थेत आढळला. यामुळे धास्तावलेल्या पत्नीने आजूबाजूच्या लोकांना ही माहिती दिली. पंचवटी पोलिसांना हा प्रकार कळविल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याविषयी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी माहिती दिली. मुलाचे आणि वडिलांचे वाद होते. यातून बऱ्याचदा हमरीतुमरी व्हायची. मुलगा रागाच्या भरात वडिलांना मारहाणही करत होता. याचा राग मनात असल्याने जगदिश यांनी मुलगा प्रणव याचा खून करत स्वत: आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments