मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट

वेब टीम सांगली : सध्या मशिदींवरील भोंग्यांविरोधातील भूमिकेमुळे चर्चेत असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट काढलं आहे. २००८ मध्ये राज ठाकरेंच्या अटकेनंतर झालेल्या आंदोलनप्रकरणी हे वॉरंट काढण्यात आलं आहे. सांगलीमधील शिराळा कोर्टाने हे अजामीनपात्र वॉरंट काढलं आहे.

६ एप्रिलला हे वॉरंट काढण्यात आलं आहे. एक महिना उलटल्यानंतरही पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. शिराळा कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं आहे की, “सुप्रीम कोर्टाने पाच ते दहा वर्षांपूर्वीची प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्याचे आदेश आहेत. त्यानुसार हे प्रकरण निकाली काढण्यासाठी अजामीनपात्र वॉरंट पाठवलं आहे”.

राज ठाकरेंनी भोंग्यासंबंधी अल्टिमेटम दिला असून बुधवारी संपूर्ण राज्यभरात आंदोलन होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत आज बैठक होणार आहे. या बैठकीत राज ठाकरेंविरोधातील या अजामीनपात्र वॉरंटंसंबधीही चर्चा होण्याची शक्यता आहे.

२००८ सालचं आहे प्रकरण : 

२००८ मध्ये रेल्वे भरतीत स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्या या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनात कल्याण कोर्टाच्या आदेशाने राज ठाकरेवर अटकेची कारवाई झाली होती. या अटकेच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी गावात मनसे कार्यकर्त्यांनी बंद पुकारला आणि जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास दुकानदारांना भाग पाडलं होतं.

विनापरवाना बंद पुकारल्यामुळे शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी शिराळा प्रथमवर्ग न्यायालयात राज ठाकरे यांच्यासह १० मनसे कार्यकर्त्यांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

Post a Comment

0 Comments