"दुसरा व्हिडीओ बॉम्ब एकदोन दिवसात " : चंद्रकांत पाटील

"दुसरा व्हिडीओ बॉम्ब एकदोन दिवसात " : चंद्रकांत पाटील 

वेब टीम मुंबई : विरोधकांविरोधात खोटे गुन्हे रचून त्यांना अडकवण्याचा डाव सत्ताधाऱ्यांकडून रचला जातोय, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. हा आरोप करताना फडणवीस यांनी ८ मार्च रोजी भाजपा नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात कट रचला जाता असल्याचे सांगत विधानसभा अध्यक्षांना वेगवेगळ्या व्हिडीओ फुटेजने भरलेला पेनड्राईव्ह दिला. फडणवीस यांच्या या व्हिडीओ बॉम्बने चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी उद्या किंवा परवा आणखी एक व्हिडीओ बॉम्ब येणार असल्याचं म्हटलंय. तसेच हा व्हिडीओ पहिल्यापेक्षाही स्ट्रँग असल्याचंही पाटील म्हणाले आहेत.

“केंद्रीय तपास यंत्रणांकडून तुम्ही आम्हाला त्रास देता म्हणून आम्ही तुम्हाला त्रास देतो असं सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडीओ बॉम्ब टाकला. एका व्हिडीओ बॉम्बमुळे सगळं चिडीचूप झालंय. दुसरा व्हिडीओ उद्या-परवा येतोय. दुसरा व्हिडीओ तर खूपच स्ट्रँग आहे. फडणवीस यांच्या पाठीमागे पूर्ण भाजपा तसेच जनता आहे,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले. टीव्ही ९ मराठीने याबाबतचे वृत्त प्रसारित केले आहे.

तसेच पुढे बोलताना फडणवीस यांना मुंबईतील वांद्र-कुर्ला पोलिसांनी बजावलेली नोटीस तसेच त्यांची होत असलेली चौकशी यावरही पाटील यांनी भाष्य केलंय. “देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. फडणवीस विरोधी पक्षनेते असल्यामुळे कायद्याप्रमाणे त्यांना माहितीचा सोअर्स कोठून मिळाला हे विचारता येत नाही. मात्र त्यांना ही माहिती कोठून मिळाली हे विचारण्यासाठी चौकशीला बोलवलं आहे. लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्षाची निर्मिती झाली. घटनेप्रमाणे विरोधी पक्षनेत्याला मुख्यमंत्र्याच्या प्रमाणे दर्जा आहे. त्यामुळे त्याला माहिती कोठून मिळाली हे विचारायचं नसतं. मात्र अंधेर नगरी चौपट राजा असा प्रकार सुरु आहे,” अशी टीका चंद्रकांत पटील यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी उद्या, परवा आणखी एक व्हिडीओ बॉम्ब येणार असल्याचे म्हटल्यामुळे राजकीय गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ नेमका कशाचा आहे. या व्हिडीओमध्ये काय आहे ? याबाबात अधिक माहिती मिळालेली नाही.

Post a Comment

0 Comments