शेत जमिनी घेऊन पड ठेवणार्‍यांचा मालकी हक्क सरकारने घ्यावा

शेत जमिनी घेऊन पड ठेवणार्‍यांचा मालकी हक्क सरकारने घ्यावा

महाराष्ट्रात शेत जमीन कुळकायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी  

वेब टीम नगर :  धनदांडगे राजकीय पुढारी व सावकार मोठ्या प्रमाणात काळ्या पैश्याची जमिनीमध्ये गुंतवणुक करत असून, महाराष्ट्रात शेत जमीन कुळकायदा 1948 चे कलम 65 ची अंमलबजावणी करुन जमिनीतील काळ्या तिजोरीविरोधात भू डिच्चू कावा राबविण्याचा आग्रह पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने धरण्यात आला आहे. दोन वर्षापेक्षा जास्त काळावधी शेतजमिन पड ठेवल्यास अशा जमिनीचे व्यवस्थापन सरकारकडे घेता येणार आहे. या जमीनी पुढे जाऊन गरजू लोकांना कसण्यासाठी देण्याची तरतूद असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

जमिनी पड ठेवल्यास त्याची मालकी संपून, अशा जमिनीवर सरकारी मालकी येते.  महाराष्ट्रात शेत जमीन कुळकायदा 1948 चे कलम 65 ची अंमलबजावणी होत नसल्याने धनदांडगे राजकीय पुढारी व सावकार आपल्याकडील काळा पैसा जमीनीत गुंतवीत आहे. सत्तापेंढारी बँकांमध्ये पैसे ठेवण्याऐवजी प्रत्येक शहराच्या आसपास जमिनी कमी किमतीत घेतात. या जमिनी वर्षानुवर्षे पड ठेवतात, महाराष्ट्रात लाखो एकर जमिनी वर्षानुवर्षे पडीक ठेवल्यामुळे मत्तापेंढारी आणि सत्तापेंढारी यांनी सजीवसृष्टीचे नुकसान केले आहे. त्यांनी घेतलेल्या मोठ्या प्रमाणात जमिनीमुळे जमिनीच्या काळ्या तोजोर्‍या निर्माण झाले आहेत. निवडणुकीच्या वेळेला अशा जमिनी कोट्यवधी रुपयांना विकून पैसा उभा केला जातो आणि मतांची खरेदी केली जात असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

देशातील कोट्यवधी लोकांना राहण्यासाठी घरे नाहीत, त्याचबरोबर सुशिक्षित बेकारांना स्वयंरोजगारासाठी औद्योगिक भूखंड उपलब्ध होत नाही. याला सत्ता व मत्ता पेंढारी जबाबदार असून, मोठ्या प्रमाणात काळ्या तिजोर्‍या निर्माण करुन काळे धन वाढविले आहेत. या विरोधात संघटनेच्या वतीने भू डिच्चू कावा जारी केला आहे. महाराष्ट्रात शेत जमीन कुळकायदा 1948 चे कलम 65 अन्वये अनेक वर्षापासून पड असलेल्या जमिनी सरकारने ताब्यात घ्याव्या. त्यातून घरकुल वंचितांना घरांसाठी व बेकारांना औद्योगिक भूखंड स्वस्त दरात देऊन गरिबी व बेकारी हटविण्याचा कार्यक्रम राबविण्याची संघटनेची मागणी आहे. यासाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, हिराबाई ग्यानप्पा, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, पै. नाना डोंगरे, जालिंदर बोरुडे, विजय भालसिंग, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले प्रयत्नशील आहेत.

Post a Comment

0 Comments