३० वर्षांनंतर तुमच्या मुलींनाही हिजाब घालणे अनिवार्य होईल : अनिल बोंडे
वेब टीम अमरावती : देशभर गाजलेल्या हिजाब प्रकरणावर काही दिवसांपूर्वी कर्नाटक हायकोर्टाच्या खंडपीठाने निकाल दिला. यावेळी हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, असं न्यायालयाने निकाल देताना म्हटलं होतं. हायकोर्टाने हिजाबसंबंधी निर्णय दिलेला असतानाही अद्याप वाद शमलेला नाही. विद्यार्थी हिजाबवर ठाम असताना त्यावरुन होणारी राजकीय वक्तव्यंही सुरु आहे. नुकतंच भाजपा नेते अनिल बोंडे यांनी यावर प्रतिक्रिया देताना विधान केलं आहे.
“परिस्थिती अशी आहे की तुम्ही आम्ही फक्त भारतमाचे पुत्र आहोत म्हणाल आणि नुसतं हातावर हात देऊन उभे राहिलात तर ३० वर्षानंतर तुमच्या मुलींनाही इतर देशांमध्ये ज्याप्रमाणे हिजाब, बुरखा घालणं अनिवार्य आहे त्याप्रमाणे घालावा लागला तर त्यात नवल वाटणार नाही,” असा इशाराच अनिल बोंडे यांनी दिला आहे. मोर्शी येथे ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “एक गोष्ट लक्षात ठेवा अमरावतीला आम्ही होतो, त्यावेळी आम्ही समर्थपणे ताकद दाखवली, तेव्हा तरुण होतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय आपण म्हणतो. कोणी कमी आवाजात म्हणतो, कोणी मोठ्या आवाजात म्हणतो. पण छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून पंढरपूरचा विठोबा वाचला, तुळजापूरची भवानी वाचली, कोल्हापूरची महालक्ष्मी वाचली”.
“जिथं शिवाजी महाराज नव्हते, तिथं मंदिराच्या बाजूला मशीद तयार झाली. अयोध्येचं राम मंदिर, मथुरा किंवा काशी विश्वनाथ असो तिथे शेजारी मशीद तयार झाली”, असं सांगताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणताना आपले पोरं पोरी मजबूत राहिले पाहिजे, याचंही भान ठेवलं पाहिजे, असं ते म्हणाले.
0 Comments