काश्मिरी पंडितांसाठी फक्त हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीच आवाज उठवला होता : उद्धव ठाकरे

काश्मिरी पंडितांसाठी फक्त हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीच आवाज उठवला होता : उद्धव ठाकरे 

वेब टीम मुंबई : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची देशभरात चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करताना दिसत आहे. तर दुसरीकडे या चित्रपटावरुन राजकारणही चांगलेच तापले आहे. काश्मीरमधील पंडितांवर १९९० साली झालेल्या अत्याचारांसंदर्भातील कथानकावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटावरून आणि काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांवरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.  

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, “काश्मिरमध्ये केवळ काश्मिरी पंडितांवरच अत्याचार झाले नाहीत. तर काश्मिरी पंडितांपूर्वी आपल्या देशाच्या बाजूने असणाऱ्या मुस्लिमांवर अत्याचार झाले होते. तेव्हा जगमोहन काश्मीरचे राज्यपाल होते. त्यावेळी त्यांनी काश्मिरी पंडितांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी काश्मीर सोडून निघून जावं, असं म्हटलं होतं. मात्र जेव्हा हे सगळं घडत होतं, तेव्हा केंद्रात भाजपा समर्थित व्हीपी सिंग यांचं सरकार होतं. आम्ही व्हीपी सिंग यांना विरोध केला होता. कारण सिंग हे पंतप्रधान झाल्यानंतर कोणत्याही मंदिरात गेले नव्हते तर दिल्लीच्या जामा मशिदीत जाऊन शाही इमामला भेटून आले होते. भाजपाने त्यावेळी व्हीपी सिंग यांच्याबद्दल एक अवाक्षरही काढलं नव्हतं, कारण त्यांचा त्यांना पाठिंबा होता,” असा आरोप ठाकरे यांनी केला.

“खोऱ्यात तेव्हा काश्मिरी पंडितांवर अत्याचार सुरू होते, मात्र भाजपाने त्याबद्दल एक अवाक्षर काढलं नव्हतं. तेव्हा त्यांच्यासाठी फक्त हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आवाज उचलला होता. बाकी कोणताही मायेचा पूत जो आज त्या काश्मिरी पंडितांबाबत कितीही अश्रू ढाळत असला तरी त्याने त्यावेळी एक शब्दही बोलण्याची हिंमत केली नव्हती आणि हेच सत्य आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Post a Comment

0 Comments