खोटी ओळख सांगत घरात घुसला आणि .....

खोटी ओळख सांगत घरात घुसला आणि ..... 

चेन, अंगठ्या, ५ लाख रक्कम घेऊन फरार

वेब टीम ठाणे : ऑनलाइन खाद्यपदार्थ घेऊन आल्याचा बहाणा करत एका तरुणाने घरात शिरून घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन १० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लुटून नेल्याचा गंभीर प्रकार ठाण्यातील पाचपाखाडी भागात उघडकीस आला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने परिधान केलेल्या टी-शर्टवर खाद्यपदार्थ घरपोहोच करणाऱ्या एका नामांकित कंपनीचे चिन्ह होते. त्यामुळे ऑनलाइन वस्तू, पदार्थांच्या घरपोहोच सुविधेविषयी नागरिकांच्या मनात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

पाचपाखाडी भागात तक्रारदार या त्यांचे पती, १७ वर्षीय मुलगी आणि १४ वर्षीय मुलासोबत राहतात. बुधवारी दुपारी तक्रारदार आणि त्यांचा मुलगा घरी असताना त्यांच्या घराबाहेर ऑनलाइन खाद्यपदार्थ घेऊन एक तरुण आला. त्याने मुलाला खाद्यपदार्थाच्या ऑर्डरविषयी माहिती दिली. परंतु आपण खाद्यपदार्थ मागविले नसल्याचे सांगत मुलाने दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी संबंधित तरुणाने दरवाजाला धक्का दिला आणि तो घरामध्ये शिरला. हा तरुण चोर असल्याचा संशय मुलाला आल्याने त्याने घरामधील जेवणाच्या टेबलवर ठेवलेला चाकू तरुणाला दाखवला. तसेच त्याला घरातून निघून जाण्यास सांगितले. परंतु त्या तरुणाने मुलाचा हात पिरगळला. त्यामुळे त्याच्या हातातील चाकू खाली पाडला. त्यानंतर तरुणाने हा चाकू हातात घेतला. तसेच मुलाचा गळा आवळला.

तक्रारदार या मुलाला वाचविण्यासाठी आल्या असता त्याने मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन घरातील सोन्याचे दागिने आणण्यास सांगितले. त्यामुळे तक्रारदार यांनी घरातील सोनसाखळी, चार अंगठ्या, हिऱ्याची अंगठी, पाच लाख रुपयांची रोकड आणून त्या तरुणाला दिली. या तरुणाने तक्रारदार आणि त्यांच्या मुलाचा मोबाइलही काढून घेतला. त्यानंतर तो तरुण घरातून पळून गेला.

या घटनेप्रकरणी तक्रारदार यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात सर्व दिशेने तपासाची चक्रे फिरविली आहेत. आरोपीने परिधान केलेल्या टी शर्टवर खाद्य पदार्थ घरपोहोच करणाऱ्या एका नामांकित कंपनीचे चिन्ह होते. त्यामुळे संबंधित कंपनीतील कर्मचाऱ्यांचीही माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments