एसटी महामंडळासाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा!

एसटी महामंडळासाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा!

वेब टीम मुंबई : सरकारसोबत झालेल्या चर्चेच्या अनेक फेऱ्या आणि न्यायालयीन सुनावणीनंतर देखील एसटी कर्मचाऱ्यांचं समाधान झालेलं नसून अद्यापही संप मिटलेला नाही. राज्य सरकारने चर्चेच्या मधल्या टप्प्यावर एसटी कर्मचाऱ्यांसाठी वेतन हमी आणि वेतन निश्चितीची अट मान्य करून त्यानुसार आदेश देखील दिले. मात्र, तरीदेखील राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीवर संपकरी एसटी कर्मचारी ठाम असल्यामुळे संप अद्याप संपलेला नाही. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये एसटी महामंडळासाठी आर्थिक तरतूद जाहीर करण्यात आली आहे.

अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेल्या घोषणेनुसार यंदाच्या अर्थसंकल्पात तब्बल ३ हजार पर्यावरणपूरक बसेस महामंडळाला उपलब्ध करून देण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे.

परिवहन विभागासाठी ३००३ कोटी रुपये

राज्याच्या परिवहन विभागासाठी अर्थसंकल्पामध्ये ३ हजार ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी ४ हजार १०७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यातून एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. तसेच, बसस्थानकांचा दर्जा सुधारण्यासाठी, त्यांच्या पुनर्बांधणीसाठी अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिलं जाईल, असं देखील अजित पवार यांनी जाहीर केलं.

वाहतूक व्यवस्थेतील सुधारणेसाठी तरतूद!

याशिवाय, राज्यातील वाहतूक व्यवस्थेसंदर्भात देखील विविध उपाययोजनांसाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये गडचिरोलीमध्ये नवीन विमानतळाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तसेच, विद्युत वाहनांची संख्या वाढवण्याचा देखील प्रस्ताव आहे. २०२५ सालापर्यंत महाराष्ट्रात विद्युत वाहनांसाठी ५ हजार चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा निर्धार अजित पवार यांनी यावेळी बोलून दाखवला.

Post a Comment

0 Comments