“आता जगानं दीर्घकाळ युद्धासाठी तयार राहावं”

“आता जगानं दीर्घकाळ युद्धासाठी तयार राहावं”

फ्रान्सचा गंभीर इशारा; UN सदस्य देशांच्या फौजा युक्रेनच्या मदतीला!

वेब टीम पॅरिस : रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला आता फक्त द्विपक्षीय स्वरूप न राहाता या युद्धाचा आवाका आता जागतिक होऊ लागला आहे. संयुक्र राष्ट्रांच्या २८ सदस्य राष्ट्रांनी युक्रेनला युद्धविषयक मदत करण्यास सहमती दिली आहे. या पार्श्वभूमीवर रशियाविरोधात आता युक्रेनच्या बाजूने जगातल्या इतर देशांनी एकजूट होताना पाहायला मिळत आहे. अमेरिकेनं देखील रशियाविरोधात युक्रेनला शस्त्रास्त्रांची आणि फौजांची मदत करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आता रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या युद्धाला एक मोठं वळण मिळालं आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी “हे युद्ध आता दीर्घकाळ चालेल”, असा गंभीर इशारा दिला आहे.

एएफपी न्यूज एजन्सीनं दिलेल्या वृत्तानुसार फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी रशियाला इशारा दिला आहे. त्यासोबतच, जगभरातल्या इतर देशांना देखील त्यांनी सतर्क राहण्यास बजावलं आहे. “जगानं आता दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धासाठी तयार राहायला हवं. युक्रेनमधलं युद्ध आता बरंच वाढणार आहे”, असं ते म्हणाले आहेत.

मॅक्रॉन यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात युक्रेनच्या बाजूने उतरण्याचा निर्धार केला आहे. यासाठी युक्रेनला शक्य ती सर्व मदत करण्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. “जर आज मी तुम्हाला कुठली गोष्ट सांगू शकत असेल तर ती हीच आहे की हे युद्ध दीर्घकाळ चालणार. ही संग्राम दीर्घकाळ चालणार. या युद्धामुळे आणि त्याअनुषंगाने उद्भवणाऱ्या पेचप्रसंगांमुळे दूरगामी परिणाम होतील”, असं इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले आहेत.

मॅक्रॉन यांनी देशवासीयांना संबोधित करताना या युद्धावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “आपण रशियानं छेडलेल्या या कृतीला खंबीरपणे विरोध करू. हा विरोध संयमी, ठाम आणि एकत्रितपणे केला असेल”, असं ते म्हणाले. “सध्या घडत असलेल्या घडामोडी युरोप आणि फ्रान्सच्या इतिहासातला टर्निंग पॉइंट ठरतील. रशियाकडून युक्रेनवर करण्यात आलेला हल्ला हा त्यांनी आत्तापर्यंत दिलेल्या सर्व आश्वासनांच्या विरोधी आहे”, असं मॅक्रॉन म्हणाले.

“पुतीन यांनी येत्या अनेक दशकांसाठी युरोपमधील स्थैर्य आणि शांततेवरच हा घाला घातला आहे. फ्रान्स आणि त्याच्या सहकारी देशांनी हे संकट टाळण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. पण पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला करण्याचा निर्णय घेऊन थेट युक्रेनच्या सार्वभौमत्वावरच हात घातला आहे”, असं देखील मॅक्रॉन यांनी नमूद केलं आहे.

Post a Comment

0 Comments