आ.संग्राम जगतापांवर गुन्हा दाखल करण्यासाठी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार
वेब टीम नगर : वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप यांनी शिवप्रेमींची पुतळा अनावरणाची खोटी आवई उठवत फसवणूक केल्याबद्दल, चुम्मा चुम्मा दे दे सारख्या अश्लिल गाण्यावर नाच करून शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या बद्दल आक्रमक भूमिका घेणाऱ्या शहर काँग्रेसने कोतवाली पोलिस स्टेशन गाठले. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी किरण काळे यांनी संग्राम जगताप यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करण्याबाबत तक्रार अर्ज पोलिसांना दिला आहे. यावेळी काळे यांच्यासह मनोज गुंदेचा, खलील सय्यद ,दशरथ शिंदे, प्रवीण गीते पाटील, अनिस चुडीवाला, अनंतराव गारदे, उषाताई भगत, जरिना पठाण, कौसर खान, बिबीशन चव्हाण, प्रशांत जाधव, सागर ईरमल, जुबेर सय्यद, रवींद्र पवार, हनीफ जागीरदार, शंकर आव्हाड यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
फसवणूक झालेल्या शिवप्रेमी, शिवभक्तांच्या वतीने फिर्यादी होण्याची तयारी काँग्रेसच्या वतीने किरण काळे यांनी पोलिसांना दाखविली आहे. संग्राम जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत असतानाच काँग्रेसने म्हटले आहे की, त्यादिवशी घडलेले कृत्य व कायदा उल्लंघन हे इसम नामे संग्राम अरुण जगताप याने व त्याच्या साथीदारांनी संगनमताने केले आहे.
सबब अन्य कोणतीही धार्मिक संघटना, समस्त समाज, तसेच शिवप्रेमी व शिवभक्तांवर कोणत्याही स्वरूपाचा गून्हा दाखल करू नये. कारण इसम संग्राम अरुण जगताप याने सर्वांचीच फसवणूक आपल्या साथीदारांसह संगनमत करून केलेली आहे.
त्यामुळे निर्दोष संघटना, समस्त अखंड हिंदू समाज, शिवप्रेमी व शिवभक्तांवर गुन्हा दाखल करून अन्याय होणार नाही या संदर्भामध्ये योग्य ती काळजी घेण्यात यावी अशी मागणी काळे यांनी पोलिसांकडे केली आहे.
0 Comments