इतिहासाच्या पाऊलखुणा : हुतात्मा छत्रपती शिवाजी (चौथे) - भाग ३
इंग्रज अधिकारी भयंकर संतापला व त्याने आपले उपाय अमलात आणले. हे सर्व करत असताना बाहेर राजा वेड्यासारखा वागतो ह्या सर्व गोष्टी आपल्या डायरीत नमूद केल्या आहेत. तरुण पत्नीला पलंगावरून दूर करणे, राजाला खाली पाडून औषध पाजणे, राजा विरुद्ध पत्नीकडून तक्रारी अर्ज सक्तीने लिहून घेणे ,सतत मानहानी व अवहेलना करणे असे अमानुष प्रकार राजाने धीरोदात्तपणे सोसले.
कोक्सने मदतीला आडदांड सोल्जर ग्रीनला घेऊन छळ व मान हानीची परिसीमा गाठली होती व राजाला जिणे असहय्य केले होते. राजांवरील अत्याचार आटोकाट प्रयत्न करूनही लपून राहू शकले नाहीत . समाजामध्ये वाऱ्यासारखे वार्ता पसरल्या कोल्हापूर जनता खवळून उठली. पुण्याच्या वर्तमान पत्रांनी राजांचे दुःख वेशीवर टांगले. सभांमधून दाद मागण्यात आली. लोकप्रक्षोभाची आग भडकली म्हणून राजाला मुंबईला नेले . या काळात राजांची जनक आई त्यांना भेटली. दत्तक आईने मिठाई पाठवली, आबासाहेब घाटगे समक्ष भेटले. मुंबईचे गव्हर्नर भेटले. राजाच्या प्रकृतीबद्दल सर्वच चांगले, परंतु राजा वेडा आहे वेड्यासारखे वागतो असे मात्र कुणीही म्हणाले नाही. राजांना नंतर कोल्हापूरला आणले स्वागत समारंभाचे नाटक केले गेले आणि लोकांचा क्रोध शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा सर्व सांगोपांग की देखावा चालू असतानाच राजांचा निर्दयपणे चालविलेला छळ थांबला नाही.
राजांच्या छळाच्या बातम्या अधिक वेगाने पसरल्या लोकांमध्ये कमालीचा असंतोष भडकला, वर्तमानपत्रे पेटून उठली, तेव्हा इंग्रजानी आपल्या कावेबाज राजनीतीचे धूर्तपणे टाकले. खवळलेल्या लोकसमुदायपुढे कारभारी बर्वे आणि रीजंट घाडगे या कळसूत्री बाहुल्या नाचवून त्यांच्याकरवी टिळक, आगरकरांना पेचात पकडून कारावास भोगावयास पाठविले . इंग्रज न्यायाधीशांकडून याचे पूरेपूर नाटक वटविले. यावेळी राजांना पुण्यात आणले होते. तिथे समाजाच्या उठावाची धग लागल्याने राजांना लगेच अहमदनगरच्या किल्ल्यात कडेकोट बंदोबस्तात डांबून टाकले . अनेक अत्याचारांचे आघात करूनही हा तरुण शिवाजीराजा शरण येत नाही . नाना उपाय केले तरी याला वेड लागत नाही. एवढासा पोरगा असंतोषाची आग भडकली तर आपणच त्यात खाक होऊ अशी बेसूर परिस्थिती निर्माण झाली. याची इंग्रजांना फार भीती वाटत होती अतीव निराशेच्या आणि लज्जास्पद नामुष्कीच्यापोटी अखेरीस त्यांनी निर्णय घेतला की या सर्व प्रलयाचे मूळ हा राजा याचाच काटा काढून टाकायचा. प्रचंड इंग्रजी राजसत्तेच्या विरोधी हा कोवळा तरूण झगडता झगडता पार थकून गेला होता,दुबळा झाला होता. तरीही अत्यंत चिवटपणे दिवस उगवल्यापासून मावळेपर्यंत आणि पुन्हा दुसरा दिवस उगवे पर्यंत छळवाद सोशीतच होता . शेवटपर्यंत राजाने स्वाभिमान कधी सोडला नाही, शरणागती पत्करली नाही. क्रूरकर्मा कॉक्स दुसरीकडे निघून गेला. पण राजा मात्र न थकता आपल्या जागी खंबीरपणे उभा राहिला .
अखेर २५ डिसेंबर १८८३ या अशुभ दिवशी आडदांड ग्रीन आणि अश्राप राजा यांच्या झटापटी मध्ये दुर्दैवी राजावर ग्रीनने निर्दयी आघात करून त्यांचा अमानुषपणे वध केला. १८५७ च्या क्रांतीयुद्ध पासूनच्या परंपरेची प्रेरणा धारण करून आयुष्यभर बलाढ्य इंग्रजांना खंबीरपणे तोंड देणारा आणि लढत लढत प्राण अर्पण करणारा हा पहिला हुतात्मा - मोडला पण वाकला मात्र नाही . या महान हुतात्म्यांच्या अपूर्व बलिदानाच्या प्रेरणे मधूनच आदर्श शांतीयुद्धाच्या अलौकिक मार्गाने असहकार आणि सत्याग्रह या प्रेरणांनी भारत स्वतंत्र झाला. या महान मानवाला हुतात्मा छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन.
जय हिंद
लेखक : नारायण आव्हाड
मोबाईल :९२७३८५८४५७
संदर्भ : संग्रहालय लायब्ररी अहमदनगर
(संपूर्ण )
0 Comments