गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन

कलाविश्वावर शोककळा पसरली 

वेब टीम मुंबई : भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती. त्यांना करोनाची सौम्यं लक्षणं जाणवत होती. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. उपचारासाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. पण उपचादारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

लता मंगेशकर यांचे आज सकाळी ८.१२ मिनिटांनी निधन झाले. त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्या बऱ्याही झाल्या होत्या. मात्र त्यानंतर सर्व अवयव निकामी होत गेले. त्यानंतर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.

लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. लता, आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांमध्ये लतादीदी सर्वात मोठ्या. लता मंगेशकर यांचे मूळ नाव हेमा असे ठेवण्यात आले होते. पण काही वर्षांनंतर दिनानाथ यांच्या नाटकातील ‘लतिका’ या पात्राच्या नावावरुन त्यांनी लता नाव ठेवल्याचे म्हटले जाते.

लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये होती आणि त्यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. त्यांनी १०,००० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती. तसेच २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले होते. लता मंगेशकर यांचे संपूर्ण कुटुंबच संगीतासाठी प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.

शासकीय इतमामात शिवाजी पार्कवर लता दीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी , राज्यपाल कोशियारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , शरद पवार , उपमुख्यमंत्री अजित पवार , खा.सुप्रिया सुळे, मनसेना अध्यक्ष राज ठाकरे , पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सिनेजगतातील , संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थित होऊन आपल्या लाडक्या लता दीदींना श्रद्धांजली वाहून साश्रू नयनांनी निरोप दिला. हृदयनाथ मंगेशकर यांच्या चिरंजीव आदिनाथ यांनी  लता दीदींना मुखाग्नी दिला,        

Post a Comment

0 Comments