"कोणताही साथीचा रोग कायमस्वरुपी नसतो, लवकरच करोनाही संपेल ”

"कोणताही साथीचा रोग कायमस्वरुपी नसतो, लवकरच करोनाही  संपेल ”

: विषाणूशास्त्रज्ञ डॉ.कुतुब मेहमूद यांचा  दावा

वेब टीम  वॉशिंग्टन : देशात करोना रुग्णांची वाढ सातत्याने सुरू आहे. देशात गेल्या २४ तासांत अडीच लाखांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सध्या करोनापासून बचावासाठी लसीकरण आणि खबरदारी घेणे एवढेच पर्याय आहेत. महत्वाचं म्हणजे भारतातील लसीकरण मोहिमेला आज एक वर्ष पूर्ण होतंय. भारतात वर्षभरात १५६ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. दरम्यान, करोनाविरोधात लसीकरण हे सर्वात मजबूत शस्त्र असल्याचं वॉशिंग्टनमधील शास्त्रज्ञ आणि विषाणूशास्त्रज्ञ डॉ. कुतुब महमूद यांनी एएनआयशी बोलताना म्हटलंय. तर, कोणताही साथीचा रोग कायमस्वरुपी नसतो आणि लवकरच करोना संपेल, असंही त्यांनी सांगितलं.

“करोना कायमस्वरूपी राहू शकत नाही, आणि तो संपेल. हा एक प्रकारचा खेळ आहे आणि या खेळात कोणीही विजेता नाही,ही मॅच  ड्रॉ होणार आहे. एक वेळ येईल जेव्हा हा विषाणू लपून जाईल आणि आपण खरोखरच जिंकू. आपल्याला आपल्या मास्कच्या मागे लपून राहावं लागणार नाही, त्यापासून आपली सुटका होईल. या क्षणाच्या आपण खूप जवळ आलोय, असं मला वाटतं. जसजसे आपण या वर्षात पुढे जाऊ, तसतसं आपण लवकरच महामारीतून बाहेर येऊ,” असं डॉ. कुतुब म्हणाले.

“विषाणूवर उत्परिवर्तित होण्यासाठी आणि मानवातील बदलत्या प्रतिकारशक्तीशी जुळवून घेण्याचा दबाव असतो आणि मग तो या नवीन प्रकारांना बनवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून ते सुटू शकतील. हा एक बुद्धिबळाच्या खेळासारखा खेळ आहे. विषाणू आणि मानव यांच्यात हे एक साधर्म्य आहे, असं मी म्हणेल. मानवाच्या आणि विषाणूंच्या हालचाली सुरू आहे. आपण बचावासाठी मास्क, हँड सॅनिटायझर्स, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करत आहोत. आपल्याकडे लस, अँटीव्हायरल आणि अँटिबॉडिज ही शस्त्रे आहेत, जी आपण करोना विरुद्ध वापरली आहेत,” असं डॉ. कुतुब यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी भारतानं वर्षभरात तब्बल ६० टक्के लसीकरणाचं ध्येय गाठल्याबद्दल कौतुक केलं. “देशासाठी आणि भारतातील लस उत्पादकांसाठी ही खरोखर मोठी उपलब्धी आहे. भारतीय लसी जागतिक स्तरावर वापरल्या जातात. आणि गेल्या वर्षी यावेळी आपण या लसींना भारतीय DCGI मार्फत मंजुरी मिळवण्याच्या प्रक्रियेत होतो. त्यानंतर आपातकालीन वापराची परवानगी मिळाली आणि १२ महिन्यांत आपण जवळपास ६० टक्के लसीकरण साध्य केले आहे, ही भारत सरकार, आरोग्य मंत्रालय आणि लस उत्पादकांसाठी मोठी उपलब्धी आहे,” असं ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments