पबजी गेम खेळण्यावरून केली आई आणि तिघा भावंडांची हत्या

पबजी गेम खेळण्यावरून केली आई आणि तिघा भावंडांची हत्या

`

वेब टीम लाहोर : पबजी गेम हा प्रकार आताशा जवळपास प्रत्येकाला माहिती झाला असावा. मोबाईलवरच्या या गेममुळे लहान मुलांना त्याचं वेड लागल्याची तक्रार अनेकदा पालक करताना दिसतात. पबजी गेमच्या अनेक दुष्परिणामांमुळे भारतात या गेमवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरी देखील या गेममुळे जगभरातल्या तरुणाईला आणि लहान मुलांना वेडं करून सोडलं आहे. अशा पराकोटीच्या प्रभावामुळे अनेकदा गंभीर दुर्घटना घडल्याचे प्रकार समोर आले असून पाकिस्तानमध्ये अशीच एक भीषण घटना घडली आहे. या गेमच्या नादात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलानं आपल्याच कुटुंबाला संपवल्याचं समोर आलं आहे.

नेमकं काय घडलं?

ही घटना घडलीये पाकिस्तानच्या लाहोरमध्ये. लाहोरमधील काहन भागामध्ये गेल्या आठवड्यात ४५ वर्षीय नाहिद मुबारक, त्यांचा २२ वर्षांचा मुलगा तैमुर आणि त्यांच्या इतर दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह पोलिसांना त्यांच्या राहत्या घरात आढळून आले होते. एकाच कुटुंबातल्या चौघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली होती. या सर्व कुटुंबात सर्वात लहान १४ वर्षीय अल्पवनीय आरोपी जिवंत राहिला होता. त्यामुळे पोलिसांनाही संशय आला. मात्र, या मुलाची चौकशी केली असता खरा प्रकार समोर आला.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पबजी गेमच्या आहारी जाऊन त्याच्याच प्रभावाखाली आई, मोठा भाऊ आणि दोन बहिणींची हत्या केल्याची कबुली या मुलानं दिली आहे. दिवसभर तासनतास पबजी गेम खेळल्यामुळे त्याच्यावर मानसिक परिणाम झाला होता, असं देखील पोलिसांनी सांगितलं आहे.

ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी आरोपी मुलाचं त्याच्या आईशी पबजी खेळण्यावरून भांडण झालं होतं. मोबाईल गेम खेळण्यामध्ये जास्त वेळ न घालवता अभ्यासाकडे लक्ष देण्यास नाहिद त्याला बजावत होत्या. यातून रागाच्या भरात या मुलानं आईच्या कपाटातून पिस्तुल काढलं आणि आपल्या आईवर, तसेच झोपलेल्या तिघा भावंडांवर गोळ्या झाडल्याचं पोलिसांनी सांगितलं. ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपी मुलानं कांगावा करत आपल्याला काहीच माहिती नसल्याचं भासवलं. मात्र, पोलिसांनी तपास केल्यानंतर हे सगळं प्रकरण स्पष्ट झालं.

Post a Comment

0 Comments