सुरक्षेतील त्रुटीमुळे पंतप्रधानांची पंजाब मधील रॅली रद्द

सुरक्षेतील त्रुटीमुळे पंतप्रधानांची पंजाब मधील रॅली रद्द 

वेब टीम भटिंडा : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत मोठी त्रूट राहिल्याने पंजाबमधील रॅली रद्द करण्यात आली आहे. आंदोलकांनी ताफा अडवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ ते २० मिनिटं उड्डाणपूलावरच अडकले होते. नरेंद्र मोदींच्या दौऱ्याची कल्पना असताना आणि सुरक्षेचं आश्वासन दिलेलं असतानाही इतकी मोठी घोडचूक झाल्याने भाजपाकडून संताप व्यक्त केला जात आहे. याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत असून भाजपा नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदीही भटिंडा विमानतळावर पोहोचले असून त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भटिंडा विमानतळावर पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेथील कर्मचाऱ्यांना तुमच्या मुख्यमंत्र्यांचे मी जिवंत पोहोचलो यासाठी आभार सांगा असं सांगितलं. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे. मोदी विमानतळावरील कर्मचाऱ्यांना म्हणाले की, “तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, की मी भटिंडा विमानतळावर जिवंत पोहोचू शकलो”.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर येथे प्रचारसभा होणार होती. सकाळी पंतप्रधान मोदी भटिंडा येथे पोहोचले, तेथून ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते. परंतु पाऊस आणि खराब दृश्यमानतेमुळे पंतप्रधानांनी हवामान स्वच्छ होण्याची सुमारे २० मिनिटे वाट पाहिली. मात्र, हवामानात सुधारणा न झाल्याने त्यांनी रस्त्याने राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्याचे ठरले. हा रस्त्याचा प्रवास तब्बल २ तासांचा होता.

गृह मंत्रालयाने सांगितले की, डीजीपी पंजाब पोलिसांकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची पुष्टी करण्यात आली होती. यानंतर पंतप्रधान रस्त्याने प्रवास करण्यासाठी निघाले. हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे ३० किमी अंतरावर पंतप्रधानांचा ताफा फ्लायओव्हरवर पोहोचला तेव्हा काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचे दिसून आले. त्यात पंतप्रधान मोदींना १५-२० मिनिटे फ्लायओव्हरवर अडकून राहावे लागल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही मोठी त्रुटी होती. 

गृह मंत्रालयाने सांगितले की, पंतप्रधानांचे वेळापत्रक आणि प्रवासाची योजना पंजाब सरकारला आधीच कळवण्यात आली होती. प्रक्रियेनुसार, त्यांची सुरक्षा तसेच आकस्मिक योजना तयार ठेवण्यासाठी आवश्यक व्यवस्था पंजाब सरकारला करावी लागणार होती. त्यामुळे पंजाब सरकारला रस्त्याने पंतप्रधानांचा दौरा सुरक्षित करण्यासाठी आणि वाहतूक रोखण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करायला हवी होती. मात्र, तसेच घडले नाही.

मंत्रालयाने सांगितले की, या सुरक्षेतील त्रुटींनंतर पंतप्रधान मोदींचा ताफा भटिंडा विमानतळावर परत आणण्यात आला. सुरक्षेतील या गंभीर त्रुटीची दखल घेत गृह मंत्रालयाने राज्य सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. या गैरप्रकाराची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, असेही राज्य सरकारला सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुसळधार पावसामुळे मोदींची फिरोजपूर रॅली रद्द करण्यात आली आहे.

सुरक्षेतील त्रुटी मुळे नव्हे ,मैदान ओस पडल्याने पंतप्रधान माघारी गेले : युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.व्ही.श्रीनिवास यांचा दावा 

मोदींच्या सभेच्या ठिकाणी पाऊस पडू लागल्याने अनेकांनी खुर्चा, बॅनर्स आणि इतर प्रचार साहित्य डोक्यावर धरुन पावसापासून आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी सभेला हजारो लोक उपस्थित राहतील अशापद्धतीने आयोजन करण्यात आलं होतं. हजारो खुर्चा या ठिकाणी लोकांना बसण्यासाठी ठेवण्यात आलेल्या. या खुर्चांचा वापर अनेकांनी पाऊस पडायला लागल्यानंतर आसरा घेण्यासाठी केला.

याच पावसाचा आणि त्यामुळे सभेच्या ठिकाणी उडालेल्या गोंधळाचा व्हिडीओ युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बि. व्ही. यांनी ट्विटरवरुन शेअर केलाय. पंतप्रधान मोदींच्या हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाच्या ठिकाणी होणाऱ्यासभेमधील हा व्हिडीओ शेअर करत श्रीनिवास यांनी मोदींवर निशाणा साधलाय.

Post a Comment

0 Comments