आ.लंकेंनी दोन नगरसेवक आणल्याने आता पारनेर नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा

आ.लंकेंनी दोन नगरसेवक आणल्याने आता पारनेर नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा 

 वेबटीम पारनेर : पारनेर नगरपंचायतमधील शहर विकास आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेविका सुरेखा भालेकर व नगरसेवक भूषण शेलार या दोघांनी आज, गुरुवारी आमदार नीलेश लंके व जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीचा पारनेरमधील सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रवेश केलेल्या दोघांसह राष्ट्रवादीच्या एकूण ९ नगरसेवकांची गटनोंदणी करण्यात आली. गटनेता म्हणून श्रीमती भालेकर यांची तर त्यांचे पती अर्जुन भालेकर यांची पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस ७, शिवसेना ६, शहर विकास आघाडी २, भाजप व अपक्ष प्रत्येकी १ असे संख्याबळ झाल्याने पारनेर नगर पंचायतीत त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्याचे चित्र होते. मात्र निवडणूक निकालानंतर लगेचच आ. नीलेश लंके यांनी सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या. त्यांनी शहर विकास आघाडीचे प्रमुख चंद्रकांत चेडे, उद्योजक अर्जुन भालेकर यांच्यासह अपक्षांनी राष्ट्रवादीला साथ द्यावी असे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत चेडे, भालेकर पती-पत्नी, नगरसेवक शेलार यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर आ. लंके व जिल्हाध्यक्ष फाळके यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांकडे ९ जणांची गटनोंदणी करण्यात आली.

१७ सदस्यसंख्या असलेल्या नगर पंचायतीत बहुमताचा आकडा गाठण्यात आ. लंके यांना निकालानंतर अवघ्या काही तासात यश मिळाले. त्यामुळे पारनेरमध्ये राष्ट्रवादी स्वबळावर सत्ता स्थापन करणार हे निश्चित झाले आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आत्मा समितीचे अध्यक्ष, वकील राहुल झावरे, लंके प्रतिष्ठानचे कारभारी पोटघन, राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार नितीन अडसूळ, बाळासाहेब मते, डॉ. बाळासाहेब कावरे, डॉ. सादिक राजे, सतीश भालेकर यांनी प्रयत्न केले.

शहराचा पाणी प्रश्न महत्त्वाचा आहे. राष्ट्रवादी व आ. लंके यांच्यामुळे शहराची पाणी योजना लवकर मार्गी लागेल याची खात्री वाटते. आ. लंके यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला चालना मिळेल, या विश्वासाने राष्ट्रवादीला साथ देण्याचा निर्णय घेतला.

– सुरेखा भालेकर, नगरसेविका

पारनेर नगर पंचायतीत त्रिशंकू अवस्था नव्हतीच. आम्ही वेगवेगळे लढलो तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ व शिवसेनेचे ६ असे महाविकास आघाडीचे १३ नगरसेवकांचे संख्याबळ आमच्याकडे होते. राष्ट्रवादी व शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरून आम्हाला महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी सुचवण्यात आले. मात्र राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित सदस्य तसेच शिवसेनेच्या उमेदवारांकडून थोडय़ा फार फरकाने पराभूत झालेल्या उमेदवारांनी शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन करण्यास विरोध दर्शवला. नुकताच संघर्ष झाला असल्याने नाराजीची भावना तीव्र होती. त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला मात्र ते ठाम राहिले. शहर विकास आघाडीचे प्रमुख तसेच दोन्ही नगरसेवक राष्ट्रवादीच्याच विचारांचे आहेत. त्यांना बरोबर घेत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

– आमदार नीलेश लंके.


Post a Comment

0 Comments