दिनविशेष : स्वराज्य जननी राजमाता जिजाबाई

दिनविशेष : स्वराज्य जननी  राजमाता जिजाबाई

देवगिरी येथे राजा वैभवाचे घराणे म्हणून श्रीमंत लखुजी जाधव यांचे घराणे प्रसिद्ध होते.  या काळामध्ये 12 जानेवारी रोजी त्यांच्या घराण्यात जिजाबाईंचा  जन्म झाला.  त्या लहानपणापासून पहात व अनुभवत आल्या होत्या की ,यवन हिंदू धर्माविषयी अनादर करतात.  त्यातच  निजामशहाने त्यांच्या पित्यास व बंधूस ठार मारले . त्यामुळे त्यांचा यवन  द्वेष फार वाढला होता. 

 कालांतराने त्यांचा भोसले कुळातील शहाजीराजे यांच्याशी विवाह झाला.  त्यांचे ही राजवैभव यवनांच्या पाइ  नष्ट झाले होते.  शहाजीराजे स्वतः बाहुबलाने त्यांच्याशी दोन हात करत होते.  परंतु यवनांचे  सैन्य खूप असल्यामुळे शहाजी राजास हार खावी लागत होती व परत नाईलाजास्तव यवनांची  ताबेदारी पतकरावी लागत होती.

याच धामधुमीच्या काळात त्यांच्या मनात एक सारखा विचार येत होता की,भोसल्यांच्या कुळात शककर्ता पुरुष निर्माण व्हावा.  त्याने सर्व हिंदू समाजास या त्रासापासून मुक्त करावे असा भवानीदेवीचा  वर होता.  तो आता लवकर पूर्ण करण्याची वेळ आली आहे.  अशी आशा जिजाबाईंच्या मनात काहीवेळा येत होती.

जिजाबाई सात आठ महिन्याच्या गरोदर असताना शहाजीराजांनी निजामशाही सोडली.  त्यामुळे लखुजी जाधव आणि मोगल सैन्य त्यांच्या पाठीशी लागले.  त्यावेळेस शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरी किल्ल्यावर ठेऊन पुढे कूच केले.  आपल्या पतीवर प्रसंगा आला व आपल्या तीन चार वर्षाचा मुलगा त्यांच्या बरोबर आहे.  त्याची सारखी चिंता त्यांना वाटत होती . या परिस्थितीमध्ये तिने शिवाई देवीला नवस केला की राजांवरचे संकट टळू दे व सुरक्षित राहू दे मला मुलगा झाला की त्याला तुझे नाव देईन .

पुढे शके १५४९ प्रभव नाम संवत्सर वैशाख शुद्ध पंचमी सोमवार तारीख २० एप्रिल १६२७ या दिवशी मराठी साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांचा  जन्म झाला.  जिजाबाईस  मुलगा झाल्यामुळे त्यांच्या जवळील व आसपासच्या गावातील सर्व मंडळीना  खूप आनंद झाला.   त्या धामधुमीच्या काळात व परिस्थितीस अनुकूल असा थोडासा उत्सव त्यांनी केला.  गावातील बाया माणसे  दहा बारा दिवस हेल  टाकत होते.  त्या मंडळींना घेऊन लुगडे खणानारळाने ओटी भरून त्यांना बक्षीस देऊन पाठवले जात होते.  शहाजीराजांना विजापुरास हुजरे पाठवून पुत्ररत्न झाल्याची बातमी कळविण्यात आली.  शहाजीने बातमी आणणाऱ्यास  कडी, वस्त्रे, बक्षीसे दिली व खूप दानधर्म केला.  शिवाई देवीचा  प्रसाद समजून नवसा  प्रमाणे मुलाचे  नाव शिवाजी ठेवले.  जिजाबाई या किल्ल्यात तीन वर्षे होत्या .

मोगलांचे व शहाजीराजांची युद्धे  होऊ लागली.  सगळीकडे धामधुमीचे वातावरण, याही परिस्थितीत जिजाबाई  आपल्या माहेरी गेल्या नाहीत.  त्या फार मानी होत्या आणि जाधवांचे घराणे  मोगलांच्या आश्रयाने राहत होते.  शिवाजी महाराजांचे जन्मापासून पुढील दहा बारा वर्षे जिजाबाई पतीच्या ताब्यातील किल्ल्यामध्ये राहत असल्याने राहत असे जेणेकरून जिजाबाईला सुरक्षित ठेवल्याचे समाधान मिळत असे.

शहाजीराजास आदिलशाही मध्ये आश्रय  मिळाल्यामुळे त्यांना विजापूरला  जावे लागले . आदिलशहाकडून मिळालेल्या जहागिरीची व्यवस्था लावून शहाजीराजे कर्नाटकात गेले.  त्यावेळेला त्यांनी जिजाबाई व शिवाजी यांना  आपला विश्वासू दादोजी कोंडदेव  यांच्याकडे ठेवले .

 जिजाबाई व बाल-शिवाजी यांना  दादोजी कोंडदेव यांनी पुण्यात आणले व त्यांच्यासाठी खूप मोठा वाडा बांधला व त्याभोवती सुंदर बाग तयार केली. जिजाबाई  या  फार धर्मनिष्ठ होत्या.  त्या घरी नेहमी सकाळ-संध्याकाळ पोथी पुराण  वाचत.  त्यातील रामायण, महाभारत यातील काही कथा, युद्ध प्रसंगातील वर्णन व आपल्या वडिलांचे पराक्रम युद्धप्रसंगीची  वर्णन शिवाजींना ऐकवून दाखवत होत्या.  शिवाजी मूळचे हुशार व बुद्धिमान असल्यामुळे आईने सांगितलेल्या गोष्टी व दादोजी कोंडदेव यांनी प्रजा आबादीआबाद कशी राहील ,शेतकऱ्यांस उत्तेजन कसे द्यावे, जनावराची जोपासना कशी करावी, शिपाई प्यादे, नोकर पारखणे, पागा, लष्कर कशी राखावी याची  अल्पवयातच शिवरायांना चांगली माहिती मिळाली परंतु धर्मरक्षणाचे बाळकडू त्यांना आपल्या माते कडूनच मिळाले.

लेखक नारायण यशवंत आव्हाड

संदर्भ ऐतिहासिक वस्तू संग्रहालय, अहमदनगर

  फोन नंबर : ९२७३८५८४५७

Post a Comment

0 Comments