पंतप्रधानांनी स्वत: विमानप्रवास नाकारला : पंजाब सरकारचा उलट दावा

पंतप्रधानांनी स्वत: विमानप्रवास नाकारला : पंजाब सरकारचा उलट दावा

वेब टीम चंदीगड : पंतप्रधानांचा पंजाब दौरा आणि त्यांना रस्त्यातून सभा न घेताच परतावं लागलं, ही गोष्ट गेल्या काही दिवसांपासून देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्याबद्दल माहिती असूनही त्यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा करण्यात आल्याचा आरोप पंजाब सरकारवर केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण आता गेलं आहे. मात्र या सगळ्यावर पंजाब सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे. पंतप्रधानांनी स्वतःच विमानप्रवास नाकारल्याचं सरकारचं म्हणणं आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधानांचं हेलिकॉप्टर हे कोणत्याही हवामानात चालणारं आहे. मात्र पंतप्रधानांनी स्वतःच विमानप्रवास नाकारला, असं पंजाब सरकारचं म्हणणं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भटिंडा ते फिरोझपूर असा विमानप्रवास करणार होते. त्यानंतर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये सभा घेणार होते. मात्र ऐनवेळी त्यांनी आपल्या दौऱ्यात बदल केला आणि विमानप्रवासाऐवजी रस्त्याने जाणं निवडलं.

हवामान खराब असल्याने रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे पंतप्रधान मोदी हेलिकॉप्टरऐवजी कारने आपल्या सभेच्या ठिकाणी जाऊ लागले. मात्र त्यांच्या सुरक्षेत काही गंभीर त्रुटी राहिल्याने एका फ्लायओव्हरवर काही आंदोलकांनी पंतप्रधान मोदींचा रस्ता अडवला. त्यामुळे पंतप्रधानांना आपले सगळे कार्यक्रम रद्द करून परतावे लागले.

Post a Comment

0 Comments