सामाजिक जाणीव ठेवून काम केल्यास पत्रकारांना उज्ज्वल भविष्य

सामाजिक जाणीव ठेवून काम केल्यास पत्रकारांना उज्ज्वल भविष्य

वेब टीम नगर :  कोरोनानंतर पत्रकारिता क्षेत्रात झपाट्याने अमुलाग्र बदल झाले. टाळेबंदीत वृत्तपत्र बंद असतानाही ऑनलाईन बातम्याच्या माध्यमातून पत्रकारिता सुरू होती.पत्रकारिता क्षेत्रात नव्याने येणार्‍या युवकांनी लोकाभिमुख पत्रकारिता सुरु ठेवावी. जमिनीशी मुळे घट्ट ठेवून व सामाजिक जाणीव ठेवून पत्रकारिता करणार्‍यांचे भवितव्य उज्वल असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. बोलताना आमदार जगताप म्हणाले की, टिव्हीवर बातम्या पाहिल्यानंतरही सकाळी उठल्यावर सविस्तर बातमी वृत्तपत्रातून कळते. सध्या ऑनलाईन बातम्या वाचण्यात वाढ झाली आहे.

पत्रकारितेची व्याप्ती वाढली असून, पत्रकारांची जबाबदारी देखील वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रारंभी कोरोना काळात मृत्यू झालेले पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते तसेच नुकतेच निधन झालेल्या समाजसेविका सिंधूताई सपकाळ, ज्येष्ठ पत्रकार सुधीर मेहेता व प्रकाश भंडारे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. 

पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे म्हणाले की, पारतंत्र्यात प्रबोधनाचे कार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी केले. यामुळे अनेक चळवळी उभ्या राहून क्रांतिकारक निर्माण झाले. आजही पत्रकारितेचे महत्व कमी झाले नसून, क्रांती घडविण्याची शक्ती पत्रकारितेत आहे. बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा असा पुढे सुरु राहून समाजाला दिशा मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments